Breaking newsHead linesMumbai

अ. भा. मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष शशिकांत पवार यांचे निधन

मुंबई (प्रतिनिधी) – अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष शशिकांत उर्फ अप्पासाहेब पवार (वय ८२) यांचे मंगळवारी सायंकाळी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. पवार हे आज (दि.७) कोकणातील मंडणगडवरून कारने मुंबईकडे निघाले असताना त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला, व त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पार्थिवावर बुधवारी सकाळी ११ वाजता दादर येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्यामागे पत्नी तसेच वीरेंद्र व योगेश हे मुलगे, एक मुलगी, सुना, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे. मराठा समाजासाठी आयुष्य वाहणारे नेते म्हणून त्यांची ओळख होती. राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार, मराठा महासंघाचे प्रदेशाध्यक्ष संभाजीराजे दहातोंडे व इतर नेत्यांनी त्यांना आदरांजली अर्पण केली आहे.

शशिकांत पवार हे मराठा समाजाप्रति समर्पित आणि कायम अग्रेसर असणारे नेते होते. मराठा महासंघाच्या स्थापनेत त्यांचा सहभाग होता. मराठा आरक्षणासाठी प्राणपणाने लढणारे नेते अशी त्यांची ओळख असली तरी बहुजनांची नेहमी बाजू घेणारे अशीही त्यांची ओळख होती. त्याच्या निधनाने मराठा चळवळीतील एक हुशार व संयमी नेता गमावला असल्याची भावना व्यक्त होत आहे. विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी यासंदर्भात ट्वीट करुन श्रद्धांजली अर्पण केली आहे. महाराष्ट्राच्या सामाजिक प्रश्नांची जाण असलेलं नेतृत्व हरपल्याने दुःख झाल्याच्या भावना पवारांनी व्यक्त केल्या.

शशिकांत पवार हे रत्नागिरी येथे मराठा बिझनसमेन फोरमच्या बैठकीसाठी परवा मुंबईहून तेथे गेले होते. आज संध्याकाळी तेथून परत येताना वाटेतच त्यांना पाली परिसरात हृदयविकाराचा झटका आला. उपचारासाठी खोपोली येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्यापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली होती. मराठा आरक्षणाचा विषयातील गुंतागुंत पाहून तो विषय लांबत असल्याने मराठ्यांना ओबीसी कोट्यातून आरक्षण मिळावे, या मताचे ते होते. त्यासाठी या वयातही आंदोलन केले व आंदोलन प्रखर करण्याचा इरादा त्यांनी यापूर्वीच जाहीर केला होता. मराठा महासंघाच्या निवडणुका सध्या सुरु असून, त्यासाठी त्यांनी त्यात मार्गदर्शन केले होते. कट्टर मराठा नेते असले तरी अन्य समाजांबरोबर त्यांनी समन्वयाची भूमिकाही घेतली होती. शाहू-फुले-आंबेडकर यांच्या विचारांचे नेते अशी त्यांची ख्याती होती. काही महिन्यांपूर्वी राज्यातील काही नेत्यांनी महापुरुषांबाबत अनुदार उद्गार काढल्यामुळे वादंग झाला होता. त्यावेळीही त्यांनी या विधानांचा निषेध करताना सर्व जातींसंदर्भात समतोल भूमिका घेतली होती. मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराबाबत त्यांनी घेतलेल्या समन्वयाच्या भूमिकेमुळे त्यांना नंतर राज्य सरकारने दलितमित्र पुरस्कारही दिला होता.


राजर्षि शाहू महाराज, महाराजा गायकवाड आदींच्या पुढाकाराने सन १९०० च्या आसपास क्षत्रिय मराठा ज्ञाती समाज ही संस्था सुरु झाली. सन १९८१ मध्ये अखिल भारतीय मराठा महासंघ असे तिचे नाव बदलण्यात आले. मात्र त्यापूर्वीपासून म्हणजे सुमारे १९६४ पासूनच शशिकांत पवार हे संस्थेत काम करीत होते. अण्णासाहेब पाटील यांच्यानंतर १९९० च्या आसपास पवार यांनीच संस्थेच्या अध्यक्षपदाची धुरा स्वीकारली. मुंबई सेंट्रलच्या मराठा मंदिर या संस्थेमार्फतही त्यांनी १९८० पासून विविध सांस्कृतिक, शैक्षणिक व सामाजिक उपक्रम राबविले होते. या संस्थेचे ते उपाध्यक्ष होते. आपली वकिली आणि व्यवसाय सोडून पवार यांनी समाजाच्या कामासाठी स्वतःला झोकून दिले व अखिल भारतीय मराठा महासंघ ही संस्था नावारुपाला आणली होती. आरक्षणाच्या चळवळीत काहीकाळ अण्णासाहेब पाटील त्यांच्याबरोबर ते होते. सर्व मराठा उद्योजकांच्या मराठा बिझनेसमेन फोरम ही संस्था वाढवण्यातही त्यांचा मोठा सहभाग होता. त्यांच्या निधनाने मराठा समाजाची अतोनात हानी झाली आहे.
——————

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!