एकनाथ शिंदेंचा शिवसेनेवरच दावा!
– शिवसेनेच्या अधिकृत पक्षप्रतोदांना हटविण्याची घोषणा करत, आपले समर्थक आ. भरत गोगावलेंना केले पक्षप्रतोद
– सरकारसह पक्षावरदेखील कब्जा मिळविण्याचा एकनाथ शिंदेंचा प्रयत्न
– गुवाहाटीतील रेडिसन ब्लू हॉटेल सहा दिवसांसाठी बूक
गुवाहाटी/मुंबई (विशेष राजकीय प्रतिनिधी) : महाराष्ट्रात मंगळवारी सुरु झालेला हाय होल्टेज राजकीय ड्रामा बुधवारी दिवसभरदेखील सुरु होता. गुवाहाटी येथून बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेला चक्क आव्हान देत, शिवसेनेने नियुक्त केलेले पक्षप्रतोद (व्हीप) सुनील प्रभू यांना हटवित असल्याची घोषणा करत, स्वतःच त्या जागी त्यांचे समर्थक आमदार भरत गोगावले यांना नियुक्त केले. आपल्याला ३४ आमदारांचे समर्थन असल्याचे पत्रच त्यांनी राज्यपालांना पाठवले आहे. शिंदे यांनी दावा केला आहे, की त्यांच्याकडे एकूण ४६ आमदार असून, गुवाहाटी येथे शिवसेनेचे ३५ आमदार, दोन अपक्ष आमदार त्यांच्यासोबत आहेत. त्यामुळे शिवसेनेच्या गोटात चिंता निर्माण झाली आहे. दुसरीकडे, शिवसेनेचे आणखी तीन आमदार हे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील सोबत घेऊन गुवाहाटीला जात आहेत, अशी खात्रीशीर माहिती हाती आली आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी आणखी तीन आमदार कोणते फोडले? याबाबत पुन्हा उलटसुलट चर्चा सुरु झाली होती.
आपल्याला मुख्यमंत्रीपदाचा मोह नाही, बंडखोरापैकी कुणीही पुढे येऊन मुख्यमंत्री व्हावे, असे भावनिक आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केल्यानंतर महाविकास आघाडीचे शिल्पकार शरद पवार यांनी ठाकरे यांची भेट घेतली. तब्बल एक तास दोघांत चर्चा सुरु होती. या बैठकीत एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्याचा सल्ला, पवारांनी ठाकरेंना दिला. यावेळी खासदार सुप्रिया सुळे यादेखील त्यांच्यासोबत होत्या. राष्ट्रवादी काँग्रेसने उद्या (दि.२३) आमदारांची बैठक बोलावली असून, या बैठकीत शरद पवार व सुप्रिया सुळे यादेखील सहभागी होणार आहेत. या बैठकीत पवार हे महत्वपूर्ण घोषणा करण्याची शक्यता आहे. काँग्रेसचीदेखील महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या बंगल्यावर बैठक झाली. या बैठकीला दिल्लीतून आलेले पक्षनिरीक्षक कमलनाथ यांनी आमदारांना मार्गदर्शन केले. दरम्यान, गुवाहाटी येथील रेडिसन ब्लू हे हॉटेल सहा दिवसांसाठी बूक करण्यात आलेले आहे. याच हॉटेलात शिवसेनेचे बंडखोर आमदार थांबलेले आहेत.
आम्ही शिवसेना आमदारांच्या संपर्कात नाही : भाजप
शिवसेना बंडखोरांना कुणाची फूस आहे, हे महाराष्ट्राच्या लक्षात आले असले तरी, भाजप नेतृत्व मात्र साळसुदपणाचा आव आणत आहे. आम्ही एकनाथ शिंदे यांच्याशी संपर्क साधलेला नाही. आम्ही कुणाही शिवसेना आमदारांच्या संपर्कात नाही. सद्या जे काही सुरु आहे, तो शिवसेनेचा अंतर्गत मामला आहे. त्यासाठी भाजपला काहीही देणेघेणे नाही. आम्ही सरकार बनविण्याचा दावा दाखल करणार नाही, अशी माहिती केंद्रीय मंत्री तथा भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी दिली. मुंबई येथे देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर ते बोलत होते. फडणवीस यांनी सर्व भाजप आमदारांची आपल्या निवासस्थानी बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी भाजपची पुढील रणनीती त्यांच्या आमदारांना स्पष्ट केली असल्याचे सांगण्यात येते.
—————