अल्पवयीन मुलीवरील बलात्कारप्रकरणी आसारामबापू दोषी, उद्या शिक्षा ठोठावणार!
गांधीनगर (प्रतिनिधी) – गुजरातमधील सूरत येथे २०१३ मध्ये झालेल्या अल्पवयीन मुलीवरील बलात्कार प्रकरणात गांधीनगर सत्र न्यायालयाने आसाराम बापूला दोषी ठरवले आहे. याप्रकरणी कोर्ट उद्या (दि.३१) शिक्षा सुनावणार आहे. याप्रकरणातील दुसर्या आरोपीची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. २०१३ मध्ये आसाराम बापूवर सूरतमधल्या एका मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. तर पीडित मुलीच्या लहान बहिणीवर त्यांचा मुलगा नारायण साई याने अत्याचार केल्याचा आरोप होता.
गांधीनगर सत्र न्यायालयाने आसाराम बापूला २०१३ मध्ये सुरतमधील दोन बहिणींवर बलात्कार केल्याप्रकरणी दोषी ठरवले आहे. आसारामची पत्नी लक्ष्मी, मुलगी भारती आणि ध्रुवबेन, निर्मला, जस्सी आणि मीरा या चार महिला अनुयायांनाही या प्रकरणात आरोपी करण्यात आले होते. पण गांधीनगर न्यायालयाने संबंधित सर्वांना निर्दोष मुक्त केले. आसाराम बापू सध्या जोधपूर तुरुंगात असून, उद्या त्यांना शिक्षा सुनावली जाणार आहे. महत्वाचे म्हणजे, आसाराम बापू याआधीच दुसर्या एका बलात्कार प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे. सध्या ते जोधपूर कारागृहात बंद आहेत. याआधीही जेव्हा-जेव्हा आसाराम बापू यांना न्यायालयाकडून दिलासा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती, तेव्हा त्यांना मोठा धक्का बसला आहे.
गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्येही सुप्रीम कोर्टात आसाराम बापूच्या जामीन याचिकेवर सुनावणी झाली होती. म्हातारपण आणि प्रकृती अस्वास्थ्यामुळे जामीन मिळायला हवा, असे त्यावेळी आसाराम बापू म्हणाले होते. मात्र न्यायालयाने प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेतले नव्हते. आता सूरत प्रकरणातही शिक्षा सुनावली जाणार आहे. त्यामुळे आसाराम बापूला सध्यातरी कोणताही दिलासा मिळताना दिसत नाही.
२०१३ मध्ये सुरतमधील दोन बहिणींनी आसाराम बापू आणि नारायण साई यांच्याविरोधात बलात्काराची तक्रार दाखल केली होती. २००२ ते २००५ दरम्यान नारायण साईने वारंवार तिच्यावर बलात्कार केल्याचे लहान बहिणीने तक्रारीत सांगितलं होतं. सुरतमधील आसारामच्या आश्रमात राहात असताना तिच्यावर बलात्कार झाला, असं पीडित मुलीने सांगितलं होतं. दुसरीकडे, मोठ्या बहिणीने तक्रारीत आसारामवर बलात्काराचा आरोप केला होता. अहमदाबाद येथील आश्रमात आसारामने तिच्यावर अनेकवेळा बलात्कार केल्याचं पीडितेनं सांगितले. दोन्ही बहिणींनी पिता-पुत्राच्या विरोधात स्वतंत्र तक्रारी केल्या आहेत.