BULDHANAChikhaliHead linesVidharbha

अंत्री खेडेकर, मेरा बुद्रूक परिसरात बेसुमार जंगलतोड!

– वनतस्करांना कोणत्या वनअधिकार्‍याचा आशीर्वाद?

चिखली (एकनाथ माळेकर) – चिखली तालुक्यासह अंत्री खेडेकर व मेरा बुद्रूक परिसरातील वन-जंगलांतून खुलेआम वृक्षतोड सुरू असून, शासनाच्या वनसंपदेची खुलेआम लूट सुरू आहे. हे वनतस्कर व माफिया कोणत्या वनअधिकार्‍याच्या आशीर्वादाने बेसुमार जंगलतोड करत आहेत? या भागातील वनपाल व वनकर्मचारी कुठे आहेत? असे संतप्त सवाल या भागातील शेतकरी व ग्रामस्थ करत आहेत. या भागातील जंगलतस्करीबाबत काही सुज्ञ नागरिक हे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे धाव घेणार आहेत.

चिखली तालुक्यातील अंत्री खेडेकर, मेरा बुद्रुक परिसरात सध्या काही वनतस्करांनी आपले जोरदार नेटवर्क तयार केलेले आहे. ग्रामीण भागात आज झाडांची बेसुमार कत्तल सुरू आहे. मात्र स्थानिक वनरक्षकांसह वनपालांचे या गंभीर प्रकाराकडे अर्थपूर्ण दुर्लक्ष सुरू आहे. वृक्ष लागवडीसह इतरही योजनेच्या कामात या परिसरात अनागोंदीचा कळस गाठला गेल्याचे बोलले जात आहे. राष्ट्रीय वननीती १९८८ नुसार वृक्ष आच्छादित वनाचे क्षेत्र एकूण क्षेत्रांपैकी ३३ टक्के असणे अनिवार्य आहे. मात्र कित्येक दिवसांपासून मेरा, अंत्री खेडेकर वनपरिक्षेत्राच्या हद्दीतील अनेक झाडांची कत्तल होताना दिसत आहे. या भागामध्ये डोंगराळ भाग असल्यामुळे या ठिकाणी आठ जातींची वृक्षे, झाडी भरपूर प्रमाणात आहेत. परंतु वनरक्षक यांचे कोणत्याही प्रकारचे लक्ष नसल्यामुळे या ठिकाणी वृक्षतोड माफियांनी चांगलेच आपले नेटवर्क उभे केले आहे. या ठिकाणी वनरक्षक शाळेमध्ये शाळेतील विद्यार्थ्यांवर माकडाने हल्ला केला होता त्यावेळेस दिसले, नंतर परत दिसलेच नाहीत. वनरक्षक हे कागदोपत्रीच आहेत का, असा संतप्त सवाल ग्रामस्थ करत आहेत.

महाराष्ट्र शासन रोजगार हमी योजना या अंतर्गत दरवर्षी लाखो वृक्ष लागवड करत असते. परंतु वनरक्षक व वनपाल यांच्या दुर्लक्षेतेमुळे या भागातील वृक्षतोड माफिया यांनी या भागातील आडजात लाकूड पूर्णतः नष्ट करून टाकले आहे. रोजगार हमी योजनेअंतर्गत महाराष्ट्र शासन शेतकर्‍यांना झाडे लावण्यासाठी अनुदानही देते आणि एकीकडे महाराष्ट्र शासनाचे वन अधिकारी हे वृक्ष थोडीस प्रोत्साहन देत आहेत का, असा सवाल निर्माण होत आहे. वनतस्करांची या भागात एवढी मुजोरी वाढली आहे, की ते दिवसाढवळ्या झाडांची कत्तल करतात. वनसंपदाची ही लूट कोणाच्या आशीर्वादाने चालू आहे, याची सुद्धा चौकशी करण्याची गरज निर्माण झालेली आहे. मेरा, अंत्री खेडेकर या भागामध्ये वनरक्षक व वनपाल हे कधी दिसत नाहीत. नेमके यांचे कार्य कुठे सुरू असते, वृक्षतोडीच्या धंद्यामध्ये आणखीन नवीनसुद्धा काही व्यवसायिक आपले पाय रोवू पाहत आहेत. त्यातून त्यांना दररोज लाखो रुपयांचा फायदा होत असल्यामुळे आणि वरिष्ठ अधिकारी हे मिलीभगत असल्यामुळे त्यांना कोणत्याही अधिकाराचा धाक राहिलेला नाही. त्यामुळे त्यांनी आपले नेटवर्क हे प्रत्येक गावामध्ये पसरवत चालले आहेत. काही गावांमध्ये त्यांचे एजंटसुद्धा आहेत. आज शेतकरी माकड, हरीण व रोह्यापासून खूप त्रस्त आहेत. त्यासाठी वन अधिकारी व वनपाल यांना शेतकर्‍याला मदत करण्यासाठीसुद्धा वेळ नाही. वनविभागाचे कोणतेही अधिकारी गावामध्ये फिरताना किंवा शेतामध्ये दिसत नाही. त्यामुळे शेतकर्‍यांची सुद्धा वनविभागावर तीव्र नाराजी आहे.

मेरा बुद्रुक, अंत्री खेडेकर भाग हा पूर्णतः निसर्गाच्या पावसावर अवलंबून असल्यामुळे या भागामधील वृक्षाची तोड जर अशीच चालू राहिली तर भविष्यामध्ये या भागामध्ये निसर्गाचा पाऊससुद्धा येणार नाही, अशी भीती या भागातील शेतकर्‍यांना वाटू लागली आहे. तरी या भागातील वनरक्षक व वनपाल यांनी या भागातील वृक्षतोड माफियांचा ताबडतोब बंदोबस्त करावा. अन्यथा या भागातील शेतकरी लोकशाही मार्गाने आंदोलन करतील, असा इशारा ग्रामस्थ व शेतकरी देत आहेत.
——————-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!