Head linesKARAJATPachhim Maharashtra

परिस्थितीवर कष्टाने मात करत समाजहिताचे काम करणार्‍या राऊत कुटुंबीयाचा अमृत महोत्सव उत्साहात!

कर्जत (प्रतिनिधी) -हजारो माता व मुलांना जीवनदान देणार्‍या भामाबाई राऊत यांचे कार्य कौतुकास्पद आहे, असे प्रतिपादन पद्मश्री पुरस्कार विजेत्या राहीबाई पोपरे यांनी कर्जत येथे बोलताना केले. तालुक्यातील गोरगरीब जनतेची माय अशी ओळख असलेल्या भामाबाई चंद्रकांत राऊत व त्यांचे पती चंद्रकांत निवृत्ती राऊत यांचा त्यांनी केलेल्या सामाजिक कार्याबद्दल त्यांचा अमृत महोत्सव कार्यक्रम मोठ्या सन्मानाने करण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रस्ताविक करताना नगराध्यक्षा उषा राऊत यांनी म्हटले की मी राऊत कुटुंबीयांची सून आहे, मात्र मला कधीही सासरी आले आहे असे वाटत नाही असे वाटते मी माहेरी आहे. मी नातसून असूनही माझी उच्च शिक्षण पूर्ण व्हावे यासाठी आजोबा चंद्रकांत राऊत व आजी भामाबाई राऊत यांनी केवळ खंबीर साथ दिली नाही तर माझी व माझ्या मुलांची देखील काळजी घेतली. संपूर्ण समाजाला जोडण्याची काम या दोन थोर व्यक्तींनी केले आहे. राऊत कुटुंबीयांसाठी खर्‍या अर्थाने हे दोघे आधारवड आहेत.

यावेळी बोलताना राहीबाई पोपरे पुढे म्हणाल्या की, मीसुद्धा भामाबाई राऊत यांच्याच प्रमाणे अशिक्षित अडाणी आहे, मी ऊसतोडणीचे काम करत होते. मात्र मनामध्ये समाजासाठी काही करण्याची जीद्द असल्यामुळे मी हे कार्य केले, मात्र पुरस्कार मिळावा किंवा मिळेल यासाठी मी हे काम केले नव्हते. याच पद्धतीने भामाबाई राऊत यांनी देखील ४००० पेक्षा जास्त महिलांचे बाळांतपण करून एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे. अशिक्षित असताना देखील त्यांनी ग्रामीण भागामध्ये डॉक्टर नसताना खेड्यापाड्यामध्ये जाऊन अनेक महिलांची सोडवणूक केली आणि बाळ आणि बाळंतीण यांना सुखरूप ठेवले हे कार्य खूप मोठे आहे. आणि त्यांना या कार्यासाठी साथ देणारे त्यांचे पती चंद्रकांत राऊत यांचे देखील योगदान कुटुंबासाठी खूप मोठे आहे.

यावेळी बोलताना खासदार सदाशिव लोखंडे म्हणाले की, १९९० सालापासून माझा राऊत कुटुंबीयाशी संपर्क आहे. खर्‍या अर्थाने तालुक्यातील गोरगरीब जनतेसाठी भामाबाई राऊत यांनी खूप मोठे कार्य केले आहे. आणि त्याचा मी साक्षीदार आहे. अशिक्षित असताना देखील एखाद्या चांगल्या डॉक्टरांना शक्य होणार नाही अशी थक्क करणारे कार्य भामाबाई राऊत यांनी केले आहे. यावेळी आमदार रोहित पवार म्हणाले की, तालुक्यातील गोरगरीब जनतेची माय असे भामाबाई राऊत यांना का म्हणतात ते त्यांनी केलेल्या कार्यावरून लक्षात येते. समाजातील गोरगरीब वंचित नागरिकांसाठी खूप मोठे कार्य त्यांनी केले. अनेकांना जीवनदान देण्याचे काम करणार्‍या भामाबाई राऊत या खर्‍याअर्थाने दैवत आहेत.

माजी नगराध्यक्ष नामदेव राऊत यांनी त्यांचे वडील चंद्रकांत राऊत व आई भामाबाई राऊत यांचा जीवनपट या ठिकाणी अतिशय भावनिक शब्दांमध्ये मांडला. प्रतिकूल परिस्थितीवर मात करून त्यांनी कुटुंब व समाज यांच्यासाठी केलेले कार्य खूप मोठे असून आजचा क्षण हा राऊत कुटुंबासाठी सुवर्ण क्षण आहे असे यावेळी राऊत म्हणाले. यावेळी छोटी परी रवींद्र राऊत हिने आजी आजोबांविषयी व्यक्त केलेले मनोगत उपस्थित प्रेक्षकांची मने जिंकली. तर सायली नामदेवराव राऊत व भारती नामदेव राऊत या दोन नातीनी आजी आजोबांचे कवितेमधून केलेले वर्णन उपस्थित हजारो नागरिकांच्या हृद्याला भिडणारे होते. शेवटी डॉक्टर अश्विनी रवींद्र राऊत यांनी आभार मानले.

यावेळी कर्जत जामखेड इंटिग्रेटेड संस्थेच्या संचालिका सुनंदा पवार, जिल्हा बँकेचे संचालक अंबादास पिसाळ, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, भाजपचे जिल्हा सरचिटणीस सचिन पोटरे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे गायकवाड, प्रसाद ढोकरीकर, मोहनराव गोडसे, विनोद दळवी, काकासाहेब तापकिर, अल्लाउद्दीन काझी, बापूसाहेब नेटके, उद्योजक उद्धवशेठ नेवसे, अमृत लिंगडे, गोविंद सोनमाळी, दत्तात्रय सोनमाळी, उपनगराध्यक्ष रोहिणी घुले, विठ्ठलराव राऊत, हनुमंत राऊत, रामदास हजारे, विजय मोढळे, यांच्यासह राजकीय सामाजिक शैक्षणिक व्यापारी क्षेत्रातील अनेक मान्यवर व हजारोंच्या संख्येने महिला व नागरिक उपस्थित होते.


राऊत कुटुंबीयांनी आयोजित केलेला हा भव्य दिव्य सोहळा आणि त्यांच्यावर प्रेम करणारे हजारों नागरिकांची उपस्थिती पाहून सत्कारमूर्ती चंद्रकांत निवृत्ती राऊत हे भावना विवश झाले होते. संपूर्ण कार्यक्रम त्यांच्या डोळ्यांमधून आनंद अश्रू वाहत होते. अशाप्रकारे अतिशय दैदीप्यमान असे समाजासाठी व्रतस्थ भूमिका घेणारे व मोठ्या कष्टातून आपल्या कुटुंबातील सर्वांना समाजात मानाचे स्थान मिळवून देणारे चंद्रकांत निवृत्ती राऊत व भामाबाई चंद्रकांत राऊत यांचा अमृत महोत्सव कार्यक्रम मोठ्या उत्साहात अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!