चिखली (तालुका प्रतिनिधी) – रायपूर पोलीस स्टेशनमध्ये ठाणेदार आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली २८ जानेवारी रोजी शांतता समितीची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये ठाणेदार यांनी उपस्थित मंडळींना मार्गदर्शन केले की, रायपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत कोणत्याही महापुरुषांचे पुतळे अवैधरीत्या बसविण्यात येवू नये. पुतळे बसवायचे असल्यास शासनाकडून रितसर परवानगी घ्यावी, अशा सूचना देण्यात आल्या.
रायपूर पोलीस स्टेशन परिसरामध्ये शांतता टिकून राहावी, तसेच प्रत्येक समाजाच्या लोकांनी एकमेकात एकोपा जोपासावा, या निमित्याने ठाणेदार आठवले यांनी शांतता समितीच्या बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीला परिसरातील पोलीस पाटील, ग्रामसेवक, सरपंच, उपसरपंच, तंटामुक्ती अध्यक्ष तथा प्रतिष्ठित मंडळीनी हाजेरी लावली होती. मीटिंगमध्ये सूचना देण्यात आल्या की, अनेकजण शासनाकडून कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता गावामध्ये महापुरुषांचे पुतळे अवैधरीत्या बसवितात. मात्र असे करू नये. यासाठी जर कोणालाही महापुरुषाचा पुतळा बसवायचा असेल तर पुतळा धोरण २०१७ च्या शासन निर्णयानुसार बसवावा. महापुरुषांचा पुतळा बसविण्यासाठी ग्रामपंचायत ठराव, ना हरकत प्रमाणपत्र, स्वतःच्या मालकीची अथवा संस्थेच्या नावावर जागा असावी, पुतळा हा शासनाचे रीतसर परवानगी असलेल्या शिल्पकाराकडून घ्यावा, सोबत कला संचलनालयाचे प्रमाणपत्र, पुतळा समिती गठित करून पोलीस अधीक्षकांची परवानगी, मुख्य वास्तुशास्त्र यांची परवानगी, अशा विविध कागदपत्रांची पूर्तता करून जिल्हाधिकारी यांच्याकडून कायदेशीररित्या परवानगी घेवूनच गावात महापुरुषांचा पुतळा बसवण्यात यावा. प्रत्येक गावातील सरपंच, उपसरपंच, तंटामुक्ती अध्यक्ष, पोलीस पाटील यांनी ग्रामसेवक यांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे मार्गदर्शन सूचना देण्यात आल्या. यावेळी बैठकीला परिसरातील पोलीस पाटील, ग्रामसेवक, सरपंच, उपसरपंच, तंटामुक्ती अध्यक्ष तथा प्रतिष्ठित मंडळीनी महिला मंडळ आदींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.