Breaking newsBULDHANAHead linesVidharbha

काँग्रेसचा उमेदवार भाजपमध्ये दिसेल – आ. रवी राणांच्या वक्तव्याने पदवीधर मतदारांच्या उंचावल्या भुवया!

बुलढाणा (एकनाथ माळेकर) – अमरावतीतील अपक्ष आमदार रवी राणा यांनी विधानसभेच्या पदवीधर मतदारसंघातील काँग्रेसचा उमेदवार हा या निवडणुकीनंतर भाजपमध्ये येईल, असे वक्तव्य काल प्रसारमाध्यमांशी बोलून खळबळ उडवून दिली आहे. त्यामुळे पदवीधर मतदार हा पुन्हा एकदा बुचकळ्यात पडला असून, नेमके मतदान कुणाला करावे? असा प्रश्न त्याच्यापुढे निर्माण झाला आहे. तर दलित, ओबीसी व बहुजन मतदार हे वंचित बहुजन आघाडीचे उच्चशिक्षित, विनम्र आणि प्रामाणिक उमेदवार प्रा. डॉ. अनिल अमलकार यांना भरभरून आशीर्वाद देतील, असे चित्र पाचही जिल्ह्यात निर्माण झालेले आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनीदेखील अमलकार यांच्यासाठी पदवीधर मतदारांना यापूर्वी साद घातलेली आहे.

दरम्यान, अमरावती येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना अपक्ष आमदार रवी राणा यांनी या निवडणुकीनंतर काँग्रेसचा उमेदवार हा भाजपमध्ये येईल, असे वक्तव्य करून खळबळ उडवून दिली आहे. भाजपचे उमेदवार रणजीत पाटील यांचीच विजयी रॅली निघेल व रणजीत पाटील यांच्याच नेतृत्वात काँग्रेसचा उमेदवार भाजपमध्ये प्रवेश करेल, असे खळबळजनक वक्तव्य आ. राणा यांनी केलेले आहे. त्यामुळे काँग्रेसच्या उमेदवाराला मतदान करावे की नाही? अशी संशयाची पाल आता पदवीधर मतदारांच्या मनात चुकचुकली आहे.

दुसरीकडे, एका अपक्ष उमेदवाराने व्हायरल केलेली ऑडिओ क्लिप पूर्णपणे खोटी आहे. तो आपला आवाजच नाही, याबद्दल काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे यांच्याशी आपले बोलणे झाले असून, ऑडिओ क्लिप खोटी असल्याचे त्यांनाही सांगितले आहे, असे स्पष्टीकरण धीरज लिंगाडे यांनी पत्रकारांशी बोलताना दिले आहे. तर अपक्ष उमेदवार शरद झांबरे यांनी लिंगाडे यांच्याशी झालेले संभाषण खरे असून, ती क्लीपही खरी असल्याची माहिती दिली आहे. त्यामुळे एकूणच ही निवडणूक प्रचंड चुरशीची होत असल्याचे राजकीय चित्र आहे.


अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यात मतदान होत आहे. ही निवडणूक भाजपचे डॉ. रणजित पाटील, महाविकास आघाडीचे धीरज लिंगाडे, वंचित बहुजन आघाडीचे प्रा. अनिल अमलकर यांच्यासह २३ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. सध्या तिहेरी लढतीचे चित्र असले तरी अपक्ष आणि बंडखोरांकडे लक्ष लागून आहे. मुळात डॉ. पाटील यांच्यासाठी भाजप कार्यकर्त्यांनी संपूर्ण विभाग पिंजून काढला. महाविकास आघाडीकडून लिंगाडे यांच्यासाठी जोर लावला जात आहे. त्यांनी स्वत:ही १२ दिवसांत पाचशेवर गावांना भेटी दिल्याचा दावा केला आहे. जुनी पेन्शन योजना ही निवडणूक प्रचारातील महत्त्वाची बाब राहिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!