Breaking newsBULDHANAChikhaliVidharbha

चिखली-साकेगाव रोडवर भीषण अपघात, दोन तरूण जागीच ठार, तिघे गंभीर जखमी

चिखली (विशेष प्रतिनिधी) – चिखली येथील देव्हडे व पांडे कुटुंबीयांवर आज पहाटे मोठे संकट कोसळले असून, माजी नगरसेवक गोपाल देव्हढे यांचे बंधू सुनील देव्हडे (वय ३३) यांच्यासह हर्षद पांडे (वय ३०) यांचे आज पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास चिखली-साकेगाव रोडवरील वाघापूरजवळ भीषण अपघातात निधन झाले आहे. या निधनाने चिखली शहरावर शोककळा पसरली आहे.

साकेगाव येथील पप्पू राजपूत या आपल्या मित्राला घरी सोडण्यासाठी सुनील देव्हढे यांच्यासह त्यांचे मित्र मृतक हर्षद पांडे व अन्य यश वाधवानी, आकाश चिंचोले व पप्पू राजपूत हे साकेगावकडे जात होते. पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास त्यांच्या स्वीफ्ट डिझायर गाडीवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने ही गाडी भरधाव वेगात रस्त्याच्या खाली उतरून पळसाच्या झाडावर जाऊन आदळली. हा अपघात इतका भीषण होता, की गाडीचा चक्काचूर झाला व पळसाचे झाडही मुळासकट उपटले गेले. या भीषण अपघातात सुनील देव्हढे व हर्षद पांडे यांचा जागीच मृत्यू झाला तर इतर तिघे जण गंभीर जखमी झाले आहेत. रात्रीची वेळ असल्याने त्यांना तातडीची मदत मिळू शकली नाही. घटनेची माहिती चिखली पोलिसांना मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन तिघा जखमींना उपचारासाठी चिखली येथे हलवले व दोघांचे मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी चिखली येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. उत्तरीय तपासणीनंतर ते नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. दोन तरुणांच्या या अकाली मृत्यूनंतर देव्हढे व पांडे कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. तसेच, संपूर्ण चिखली शहरात हळहळ व्यक्त केली जात होती. अधिक तपास पोलिस करत आहेत.
———————–

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!