Breaking newsBULDHANAHead linesMaharashtraPolitical NewsPoliticsVidharbhaWorld update

ठाकरे-आंबेडकर युतीमुळे भाजपच्या ‘मिशन 45’ला बसणार खीळ!

– बुलढाण्यात हर्षवर्धन सपकाळ, चिखलीत राहुल बोंद्रे यांचा केवळ ‘वंचित’मुळे झाला होता पराभव

पुरूषोत्तम सांगळे

बुलढाणा/मुंबई  – शिवसेना (ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे व वंचित बहुजन आघाडीचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांची अखेर युती झाली आहे. यापूर्वी ठाकरे यांनी संभाजी ब्रिगेड या कडवट बहुजनवादी संघटनेसोबतही राजकीय युती केलेली आहे. मागील विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार ३५ ते ४० जागांवर केवळ काँग्रेसच्या उमेदवारामुळे पडले होते. आता आंबेडकर यांना ठाकरेंची साथ मिळाल्याने या जागा जिंकण्याची आशा पल्लवीत झाली आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे, आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्रासाठी ‘मिशन-४५’चे लक्ष्य ठेवले आहे. भाजपच्या या मिशनला ठाकरे-आंबेडकर युतीचा सर्वाधिक फटका बसणार असून, यापूर्वी आठ लोकसभा मतदारसंघात भाजपला जो वंचित आघाडीचा फायदा झाला होता, तो आता होणार नाही. त्यामुळे या युतीचा सर्वात मोठा फटका भाजप व त्या खालोखाल काँग्रेसला बसणे निश्चित आहे.

मागील लोकसभा निवडणुकीचा विचार करता, वंचित बहुजन आघाडीला भाजपची ‘बी-टीम’ म्हणून हिनवले गेले होते. वास्तविक पाहाता, वंचित आघाडीच्या उमेदवारांना काँग्रेसचा फटका बसला होता. अन्यथा, नांदेड, सांगली, सोलापूर, परभणी, गडचिरोली-चिमूर, बुलडाणा, हातकणंगले या आठ मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीचे खासदार निवडून आले असते. या मतदारसंघात काँग्रेसने तिसर्‍या क्रमांकाची मते घेतली, ही मते वंचित आघाडीच्या पारंपरिक मतदारांची होती. आगामी लोकसभा निवडणुकीत वंचित आघाडीच्या उमेदवारांना शिवसेनेची साथ मिळाल्यास याच मतदारसंघात भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसचा उमेदवार पराभूत होणे निश्चित आहे. लोकसभेशिवाय विधानसभा निवडणुकीतही वंचित आघाडीने आपली राजकीय ताकद सिद्ध केली होती. काँग्रेसने वंचित आघाडीच्या उमेदवारांची मते खालली नसती तर, ३५ ते ४० जागांवर वंचित आघाडीचे उमेदवार विजयी झाले असते. त्यामध्ये मूर्तिजापूर, आर्णी, अकोला, बाळापूर, अकोट, बुलडाणा, वाशिम, खामगाव, सिंदखेडराजा, लोहा मतदारसंघात केवळ काही हजार मतांनी ‘वंचित’चे उमेदवार पराभूत झाले होते, हे विसरून चालणार नाही. काही ठिकाणी ‘वंचित’च्या उमेदवारांमुळे काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसला मतविभाजनाचा फटका बसला. पैठण, जिंतूर, फुलंब्री, परभणी मतदारसंघातही ‘वंचित’च्या उमेदवारांनी चांगली कामगिरी केली.
मागील विधानसभा निवडणुकीत बुलढाणा मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार संजय गायकवाड यांना ६७ हजार ३८ मते मिळाली. वंचित आघाडीचे विजयराज शिंदे यांनी तब्बल ४१ हजार १७३ मते घेतली. तर ३० हजार ८१० मते घेणारे काँग्रेसचे हर्षवर्धन सपकाळ हे तिसर्‍या स्थानावर राहिले. हर्षवर्धन सपकाळ यांनी वंचित आघाडीची मते खालली नसती तर विजयराज शिंदे हे नक्कीच विजयी झाले असते. आता विजयराज शिंदे हे भाजपमध्ये आहेत. तर विद्यमान आमदार संजय गायकवाड हे मुख्यमंत्री शिंदे गटात आहेत. त्यामुळे या मतदारसंघात शिवसेना व वंचित आघाडीचा जो कुणी उमेदवार राहील, तो निश्चितपणे निवडून येणार आहे. दुसरीकडे, चिखली मतदारसंघात वंचित आघाडीचे उमेदवार अशोक सुराडकर यांनी तब्बल साडेनऊ हजारांहून अधिक मते घेतली होती. या मतांमुळेच भाजपच्या श्वेताताई महाले यांनी काँग्रेसचे राहुल बोंद्रे यांचा सुमारे ६ हजार मतांनी पराभव केला होता. वंचित आघाडीने ही मते घेतली नसती तर या मतदारसंघात काँग्रेसचे राहुल बोंद्रे हे निवडून आले असते. आता या मतदारसंघात शिवसेना किंवा वंचित आघाडीने उमेदवार दिल्यास भाजप व काँग्रेस या दोन्ही पक्षाच्या उमेदवाराचा पराभव निश्चित आहे.
सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघात मागीलवेळी वंचित आघाडीकडून वंजारी समाजाच्या सविताताई मुंडे या उभ्या होत्या. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांना तब्बल ३९ हजारांहून अधिक मते घेत जोरदार लढत दिली होती. या मतदारसंघात वंजारी समाज व दलित समाजाचा मोठा प्रभाव आहे. त्यामुळे या वेळेस या दोन समाजाच्या मतांचे ध्रुवीकरण झाले नाही तर डॉ. शिंगणे यांचा पराभव निश्चित आहे. शिवाय, या मतदारसंघात भाजपकडून विनोद वाघ आणि शिंदे गटाकडून शशीकांत खेडेकर हे इच्छुक आहेत. त्यामुळे ही जागा भाजप लढविणार की शिंदे गट? हा प्रश्न आहे. तरीही जागा कुणीही लढविली तरी, शिवसेना व वंचित आघाडीच्या मतांच्या एकीकरणामुळे राष्ट्रवादी आणि भाजप किंवा शिंदे गट या तिघांनाही फटका बसणे निश्चित आहे. येत्या काळात राज्याच्या राजकीय घडामोडीनंतर सिंदखेडराजा मतदारसंघात कोणत्या पक्षाकडून कोणाला उमेदवारी दिली जाते. तिकीट मिळविण्याच्या लालसेपोटी कोण, कोणत्या पक्षात कोलांटउडी मारून बंडखोरी करतो, यावर विधानसभा निवडणुकीचे चित्र अवलंबून आहे. दुसरीकडे, खामगावमध्ये भाजपचे आकाश फुंडकर यांनी काँग्रेसचे ज्ञानेश्वर पाटील यांचा सुमारे १७ हजार मतांनी पराभव केला होता. या मतदारसंघात वंचित आघाडीचे शरद वसतकर यांना २५ हजार ८०० हून अधिक मते मिळाली होती. काँग्रेसने वंचित आघाडीची मते खालली नसती तर शरद वसतकार हे आज आमदार असते.
एकूणच ठाकरे-आंबेडकर युतीमुळे मागील विधानसभा व लोकसभा निवडणुकीत ज्या जागा थोडक्यात निसटल्या, त्या जिंकण्याची आशा निमा&ण झाली आहे. शिवाय, या युतीचा सवा&त मोठा फटका, काँग्रेस व त्या खालोखाल भाजपला बसणार आहे. राज्यात शिवसेनेतील बंडखोरीमुळे उद्धव ठाकरे यांच्याविषयी मोठी सहानुभूतीची लाट असून, दलित, ओबीसी आणि उपेक्षित जातींचा आंबेडकर यांना पाठिंबा आहे. किंबहुना, तेच आंबेडकरांचे एकगठ्ठा मतदान आहे. त्यामुळे शिवसेना व वंचित आघाडी या युतीमुळे राज्यातील राजकीय समिकरणे तर बदलणार आहेतच, पण त्याचे परिणाम थेट केंद्रीय सत्तेवरदेखील पडणार आहे. भाजपने हाती घेतलेल्या ‘मिशन-४५’ या लोकसभा निवडणुकीच्या मोहिमेला आजच्या ठाकरे-आंबेडकर युतीमुळे पहिला अपशकुन झालेला आहे.


पवार आणि काँग्रेस आंबेडकरांसोबत येणे कठीण!

सद्या उद्धव ठाकरे व प्रकाश आंबेडकर यांच्यात युती झाली आहे. ठाकरे यांचा पक्ष हा महाविकास आघाडीचा घटक पक्ष असून, भविष्यात लोकसभा व विधानसभेच्या जागावाटपांचा तिढा निर्माण होणार आहे. यापूर्वी प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसकडे आघाडीसाठी हात पुढे केला होता. ज्या जागा काँग्रेस वारंवार हरत आहे, त्या जागा आंबेडकरांनी मागितल्या होत्या. परंतु, त्या जागांवर पुन्हा पराभूत होणे काँग्रेसने पसंत केले पण त्या जागा आंबेडकरांना दिल्या नव्हत्या. प्रकाश आंबेडकर यांनी फक्त दलित समाजापुरतेच मर्यादीत रहावे, ओबीसी-बहुजनांचे नेतृत्व करू नये, अशी शरद पवार व काँग्रेसची भूमिका राहिलेली आहे. तर, या भूमिकेच्या पलिकडे जाऊन विचार करा, आणि सोबत घ्या, अशी सूचना आंबेडकर पवार व काँग्रेसला करत आले आहेत. याच वैचारिक विरोधामुळे आंबेडकर-पवार एकत्र येऊ शकले नाहीत. आतादेखील ठाकरे-आंबेडकर युतीबद्दल शरद पवारांनी सकारात्मक मत व्यक्त केलेले नाही. काँग्रेसने तर आम्ही आमच्या जागा सोडणार नाही, असा घोषा लावला आहे. त्यामुळे आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकांत जागावाटपाचा प्रश्न निर्माण होणार असून, काँग्रेस व पवारांनी हेका सोडला नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस एकत्र लढतील, आणि शिवसेना (ठाकरे) व वंचित बहुजन आघाडी हे दोघे संभाजी ब्रिगेडला घेऊन वेगळे लढतील. राज्याच्या तिरंगी लढतीत, सर्वात मोठा फायदा ठाकरे-आंबेडकर यांना होईल, तर नेहमीप्रमाणे काँग्रेसला फटका बसेल. शरद पवार यांची मते, मतदारसंघ व विजयी होणार्‍या जागा निश्चित आहेत. पवारांनी कितीही ताकद लावली तरी ते ५५-६० जागांच्या पुढे जात नाहीत. उद्या सरकार बनविण्याची वेळ आलीच तर हे तिघे पुन्हा एकत्र येऊ शकतात.

या उलट ठाकरे-आंबेडकर युती ही भाजपसाठी मोठी डोकेदुखी ठरलेली आहे. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना फोडून भाजपने मराठी माणसांचा संताप ओढावून घेतला असून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाला सोबत घेतले तर आहे त्या जागाही गमाविण्याची भीती आहे. त्यामुळे भविष्यात शिंदे गटच भाजपमध्ये विलीन करून विद्यमान आमदार व खासदार हे भाजपच्या कमळ निवडणूक चिन्हावर निवडणूक लढतील. ज्या मतदारसंघात मागील लोकसभा व विधानसभा मतदारसंघात वंचित आघाडीचा भाजपला फायदा झाला होता, तो फायदा आता होणार नाही. परिणामी, तिरंगी लढतीत भाजपला अनेक जागांवर पाणी सोडावे लागणार आहे. कारण, २०१९च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने शिवसेनेसोबत युती कायम ठेवत ४१ जागा जिंकल्या होत्या. आता पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. तरीही या जागांचे विश्लेषण केले असता, भाजप २३, शिवसेना (शिंदे गट) १३, शिवसेना (ठाकरे) ५ अशा जिंकलेल्या जागा झालेल्या आहेत. यातील शिंदे गटाच्या जागांवर भाजपचा डोळा आहे. कारण, त्या शिवाय भाजपचे मिशन-४५ हे पूर्णच होत नाही. शिवाय, देशपातळीवर भाजपकडे नरेंद्र मोदींसारखे नेतृत्व आहे. महाराष्ट्रात ते कुणाच्या नेतृत्वात लढणार? शिंदे की फडणवीस? आणि, हे दोन्ही नेते राज्यात चालणार का? हा देखील प्रश्न आहे.
—————–

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!