Breaking newsHead linesMaharashtraMumbaiPolitical NewsPoliticsWorld update

शिवसेना-वंचित बहुजन आघाडीची अखेर युती!

– लोकशाही जीवंत ठेवण्यासाठी, संविधानाचे महत्व-पावित्र्य अबाधित राखण्यासाठी आम्ही एकत्र – उद्धव ठाकरे

– शरद पवार आमच्यासोबत येतील, अशी आशा मी बाळगतो : प्रकाश आंबेडकर

मुंबई (प्राची कुलकर्णी) – भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आणि महाराष्ट्राला प्रबोधनाचा वारसा देणारे प्रबोधनकार ठाकरे यांचे नातूू आजपासून हातात हात घालून महाराष्ट्राचे राजकीय समीकरणे बदलण्यास सज्ज झाले आहेत. शिवसेना (ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते अ‍ॅड.प्रकाश आंबेडकर यांनी शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडीच्या युतीची घोषणा केली आहे. आज दुपारी या दोन्ही नेत्यांनी संयुक्तरित्या पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. यानिमित्ताने राज्याच्या राजकीय पटलावर शिवशक्ती आणि बहुजनशक्ती पुन्हा एकदा एकत्र आली आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या ९७ व्या जयंतीनिमित्त आज या युतीची घोषणा करण्यात आली. मुंबईत झालेल्या या पत्रकार परिषदेला उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत व्यासपीठावर शिवसेना ठाकरे गटाचे सुभाष देसाई, संजय राऊत, अरविंद सावंत तर वंचित बहुजन आघाडीकडून रेखाताई ठाकूर, अबुल खान उपस्थित होते.

यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, ‘देशातील लोकशाही जीवंत ठेवण्यासाठी म्हणून आम्ही दोघे एकत्र येत आहोत. पुढे राजकीय वाटचाल कशी असेल, याविषयी विचारविनिमय करुन आम्ही पुढे जाऊ.’ ‘शिवशक्ती आणि भीमशक्तीचा प्रयोग याआधी झाला होता. पण प्रकाश आंबेडकर आणि मी पहिल्यांदाच या वास्तूमध्ये एकत्र आलो आहे. पुढे एकत्रित चालण्यासाठी एकत्र येतोय.’ तर प्रकाश आंबेडकर म्हणाले की, ‘वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेना यांच्या युतीमुळे निवडणुकांमध्ये आता बदलाचे वातावरण सुरू होणार आहे.’ ‘गेली अनेक वर्षे उपेक्षितांचे राजकारण अशी चळवळ अमलात आणण्याचा प्रयत्न आमचा होता. पण आमच्याच मित्र पक्षाने ही चळवळ गिळंकृत करण्याचा प्रयत्न केला किंवा मर्यादित करण्याचा प्रयत्न केला.’ ‘शरद पवार आणि आमचं भांडण जुनं आहे. पण ते आमच्याबरोबर येतील, अशी अपेक्षा मी बाळगतो,’ असेही प्रकाश आंबेडकर म्हणाले. ‘आपण कोणीही अमरपट्टा घेऊन आलेलो नाही. सर्वांचा अंत होणार आहे. त्याचप्रमाणे नरेंद्र मोदींचाही एक दिवस अंत होणार आहे. त्यांनी त्यांच्या पक्षातील लीडरशीप संपवली,’ असेही आंबेडकर म्हणाले.

दरम्यान, शिवशक्ती आणि भीमशक्तीचा राजकीय प्रयोग पहिल्यांदा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या काळातच झाला होता आणि आता शिवसेनेतल्या फुटीनंतर पुन्हा एकदा हाच प्रयोग होताना दिसत आहे. मात्र एकीकडे वंचित आणि शिवसेनेची हात मिळवणी होत असली तरी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस मात्र यापासून अद्याप दूर असल्याचं दिसतं आहे. याबाबत विचारलं असता प्रकाश आंबेडकर म्हणाले की, “शरद पवार यांची प्रतिक्रिया वाचली. ते आमच्यासोबत येतील अशी आशा मी बाळगतो. आमची भांडणं जुनी आहे, शेतातली नाही. आता फक्त आम्ही दोघेच एकत्र आलो आहोत, काँग्रेस आणि राष्ट्रवादी सुद्धा आमच्यासोबत एकत्र येतील.”

लोकशाही जीवंत ठेवण्यासाठी युती- उद्धव ठाकरे

आज बाळासाहेब ठाकरे यांचा जन्मदिवस आहे. पुढील वाटचाल करण्यासाठी येथे आम्ही एकत्र येत आहोत. राजकारण जे चाललं आहे त्यावर आघात करून मोडून तोडून टाकण्यासाठी जे जीवाला जीव देणारे सहकारी आहेत ते एकत्र आले आहेत. देशातील लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी एकत्र येत आहोत, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं.  शिवसेना-वंचितची युती विजयी दिसणार आहे. हिम्मत असेल तर आता निवडणुका घ्या. गद्दारांना आणि बाकीच्यांना आव्हान आहे की एकदा निवडणुका घ्या, असं आव्हान उद्धव ठाकरेंनी शिंदे गट आणि भाजपला दिलं आहे. युतीची घोषणा करताना उद्धव ठाकरे म्हणाले, आज एका स्वप्नाची पूर्ती झाली आहे. महाराष्ट्रातील जनता या युतीची आतुरतेने वाट पाहत होते. प्रकाश आंबेडकर यांचे आजोबा आणि माझे वडील या दोघांनीही समाजातील वाईट चालीरितींवर घणाघाती प्रहार केले. आतादेखील राजकारणात काही वाईट चालीरीती शिरल्या आहेत. त्यांचा नायनाट करण्यासाठी या दोन्ही पिढ्यांचे वारसरार एकत्र आले आहेत.

शरद पवार आमच्यासोबत येतील अशी अपेक्षा – प्रकाश आंबेडकर

शरद पवार आमच्यासोबत येतील अशी अपेक्षा बाळगतो. आता आम्ही दोघेच एकत्र आलो आहोत, काँग्रेस-राष्ट्रवादीने स्वीकारावं, असं आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी केलं. आज ईडीच्यामार्फत पॉलिटिकल लीडर संपवण्याचा काम सुरु आहे. आपण कोणीही अमरपट्टा घेऊन आलेलो नाही.नरेंद्र मोदी यांचा देखील अंत होणार आहे, असंही आंबेडकर यांनी म्हटलं.

पवारांकडे पाहत राहिलो अन् माझ्याच लोकांनी दगा दिला

शरद पवारांसोबत माझे पूर्वी चांगलेल सख्य होते, असे वक्तव्य प्रकाश आंबेडकरांनी दिला. त्याचा दाखला देत मी तर शरद पवारांकडेच बघत राहिलो आणि माझ्याच लोकांनी मला दिगा दिला, असे वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केले. उद्धव ठाकरेंच्या या वक्तव्यावर चांगलाच हशा पिकला. वंचितच्या मविआतील समावेशाबाबत उद्धव ठाकरे म्हणाले, मोदी आणि भाजपविरोधात, हुकुमशाहीविरोधात आम्ही एकत्र आलो आहोत. त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही पक्ष वंचितला विरोध करतील असे वाटत नाही. लवकरच दोन्ही पक्षांची चर्चा करुन याबाबत भूमिका स्पष्ट करू. तसेच, वंचितसोबत व इतर मित्र पक्षांसोबत जागावाटप कसे होईल, याबाबत विचार करुनच वंचितसोबत युती केल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!