Head linesVidharbha

‘तुमचाही दाभोळकर करू’; श्याम मानव यांना व्हाटसअपवर धमकी!

– खरेच धमकी आली की कांगावा? पोलिसांनी सखोल तपासाची गरज!

नागपूर (विशेष प्रतिनिधी) – नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणावरून वादग्रस्त राहणारे आणि अलिकडेच बागेश्वर धामच्या धीरेंद्र महाराजांना आव्हान देण्याची भाषा करणारे, तसेच महाराजांनी आव्हान स्वीकारल्यानंतर ‘शाब्दिक पलटी’ मारणारे अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक अध्यक्ष श्याम मानव यांना जिवे मारण्याची धमकी आली आहे. ‘तुमचा दाभोळकर करू’, अशी धमकी मानव यांना देण्यात आली. त्यामुळे त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.

अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे सहअध्यक्ष श्याम मानव यांना व्हॉट्सअ‍ॅपवर एका अज्ञात व्यक्तीने ‘तुमचाही दाभोळकर’ करू अशी धमकी दिली आहे. अत्यंत अश्लील भाषेत मानव यांना व्हॉटसअपवर धमकावण्यात आले आहे. या धमकीनंतर त्यांच्या कार्यकर्त्यांनी तातडीने पोलिसांत धाव घेतली. त्यामुळे पोलिसांनी मानव यांच्या सुरक्षेत वाढ केली आहे. बागेश्वर धाममधील धीरेंद्र कृष्ण महाराज यांच्यावरील आरोपानंतर श्याम मानव यांना धमकीचे फोन येत असल्याची माहितीही मिळत आहे, त्या पार्श्वभूमीवरदेखील पोलिसांनी मानव यांच्या सुरक्षेत वाढ केली. सद्या श्याम मानव हे नागपूरच्या रवी भवन येथील कॉटेजमध्ये मुक्कामी असून, त्यांच्या कॉटेजबाहेर आणखी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. व्हाटसअपवर मिळालेल्या धमकीनंतर पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतले आहे. अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीने याबाबत रीतसर तक्रार नागपूर पोलिसात दाखल केली आहे. ‘आज अकरा वाजेपर्यंत तुमची हत्या करु, तुमचा दाभोळकर करु’, अशी धमकी श्याम मानव यांना देण्यात आल्याचे नमूद आहे.


दरम्यान, श्याम मानव हे सातत्याने वादग्रस्त ठरलेले आहेत. या आधी त्यांनी विवेकानंद आश्रमाचे संस्थापक अध्यक्ष पू. शुकदास महाराज यांच्यावरदेखील अश्लाघ्य आरोप केले होते. परंतु, ते कोर्टात टिकले नव्हते. कोर्टाने महाराजांच्या बाजूने निकाल देत, श्याम मानव यांनी शुकदास महाराजांवर टीका करू नये, असा हुकूम बजावला होता. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे हिवरा आश्रम येथे नियोजीत असताना, त्याही वेळेस श्याम मानव यांनी पू. शुकदास महाराजांवर टीकास्त्र डागले होते. परंतु, विवेकानंद आश्रमाचे तत्कालिन प्रवक्ते व ज्येष्ठ पत्रकार पुरूषोत्तम सांंगळे यांनी विविध वृत्तवाहिन्यांवर श्याम मानव यांना चांगलेच तोंडघशी पाडत, कोर्टाच्या आदेशाची त्यांना आठवण करून दिली होती. त्यानंतर मानवांचे तोंड बंद झाले होते.


आतादेखील मानव यांनी बागेश्वर धाम येथील धीरेंद्र शास्त्री महाराज यांना आव्हान दिले होते. ते आव्हान महाराजांनी स्वीकारत, बागेश्वर धाम येथील आपल्या दरबारात या, दिव्यशक्ती सिद्ध करून दाखवतो, असे उलट आव्हानच श्याम मानव यांना दिले होते. हे आव्हान स्वीकारून धीरेंद्र महाराजांच्या दरबारात जाण्याऐवजी श्याम मानव यांनी महाराजांनाच नागपुरात पत्रकारांसमोर या, असे सांगितले. त्यामुळे मानव यांच्या बोलण्याकडे धीरेंद्र महाराजांनी कानाडोळा करत आपले धर्म व ईश्वरीय कार्य सुरूच ठेवले आहे. धीरेंद्र महाराजांना हिंदू समाजाचा व्यापक पाठिंबा मिळत असल्याचे पाहाता, आता श्याम मानव यांच्या कार्यकर्त्यांनी मानव यांना जीवे मारण्याची धमकी आल्याची तक्रार दाखल केली आहे. या अनुषंगाने खरेच श्याम मानव यांना जीवे मारण्याची धमकी आली की ते कांगावा करत आहेत, याचा सखोल तपास पोलिसांनी करण्याची गरज असून, सत्य पुढे आणण्याची गरज आहे.
———————

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!