कवठळ येथे कानिफनाथांच्या यात्रेनिमित्त अलोट गर्दीला महाप्रसाद वितरण
– कानिफनाथ संस्थानकडे जाणारा रस्ता करून देणार – आ. श्वेताताई महाले
चिखली (एकनाथ माळेकर) – तालुक्यातील कवठळ येथे कानिफनाथांची यात्रा उत्साहात व भाविक भक्तांच्या अलोट गर्दीत पार पडली. यानिमित्त आज (दि.२१) रोजी पंधरा क्विंटल गहूपुरी व नऊ क्विंटलच्या वांगेभाजीचा महाप्रसाद (भंडारा) वाटप करण्यात आला. चिखलीच्या आमदार सौ. श्वेताताई महाले पाटील यांच्याहस्ते हे महाप्रसाद वितरण झाले. कवठळ येथील कानिफनाथ संस्थानकडे जाणारा रस्ता आपण आपल्या आमदार निधीतून करून देऊ, असे आश्वासन त्यांनी ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’शी बोलताना दिले आहे.
सविस्तर असे, की चिखली तालुक्यातील कवठळ येथे तीस हजार भाविक भक्तांनी तब्बल १५ क्विंटल गव्हाच्या पुर्या व नऊ क्विंटल वांग्याच्या भाजीच्या महाप्रसादाचा लाभ घेतला. कानिफनाथ संस्थान कवठळ येथे मेरा बुद्रुक सर्कलमधील सर्वात मोठी यात्रा भरते. कानिफनाथांची यात्रा म्हणून सर्वदूर ही यात्रा ओळखली जाते. यंदा महाप्रसाद वितरणासाठी चिखली तालुक्याच्या आमदार श्वेताताई महाले पाटील तसेच माजी बालकल्याण सभापती ज्योतीताई पडघान, गजानन वायाळ, अशोकराव पडघान माजी सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती चिखली तसेच भाजपचे तालुका अध्यक्ष कृष्णकुमार सपकाळ, सुधीर पडघान आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती. पंचक्रोशीतील हजारो भाविक भक्तांची गर्दी येथे ओसांडली होती. महाप्रसादासाठी पंधरा क्विंटल गावाच्या पुर्या व नऊ क्विंटल वांग्याची भाजी तयार केली होती. शिस्तबद्ध अशा वातावरणामध्ये आज महाप्रसादाचे वितरण झाले. महाप्रसादासाठी आमदार श्वेताताई महाले पाटील आल्या असता त्यांनी कानिफनाथ संस्थानकडे जाणारा रस्ता हा येत्या काळात पूर्ण करून देऊ, असे आश्वासन दिले.
कवठळ येथील महाप्रसादाचे नियोजन वाखणण्याजोगे होते. कानिफनाथ संस्थान येथे आज भाविकभक्त महाप्रसाद घेण्यासाठी आले असता, कवठळ येथील नागरिकांनी योग्य ते नियोजन व महाप्रसादाचे शिस्तबद्ध असे वितरण केले होते. त्यामुळे त्यांचे कार्य वाखणण्याजोगे आहे, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या माजी बालकल्याण व बांधकाम सभापती ज्योतीताई पडघान यांनी ब्रेकिंग महाराष्ट्रशी बोलताना केले. आज २१ जानेवारीरोजी सौ.ज्योतीताई पडघान या कवठळ येथे आले असता त्यांनी कवठळ येथील नागरिकांचे महाप्रसादाचे नियोजन पाहून कौतुक केले. या महाप्रसादासाठी प्रथम नागरिक श्रीरामभाऊ गावंडे सरपंच कवठळ तसेच ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य व ग्रामसेवक, सहकारी सोसायटीचे सदस्य, जिल्हा परिषद शाळा समितीचे सर्व सदस्य व गावातील सर्व मंडळी यांनी या महाप्रसादासाठी विशेष सहकार्य करून गावाचा भंडारा हा योग्य तो आणि चांगला झाला पाहिजे, अशी भूमिका घेतल्यामुळे महाप्रसादाचे नियोजन योग्य प्रकारे झाले.
अंढेरा पोलिसांची हलगर्जी, भाविक-भक्तांना वाहतूककोंडीचा मनस्ताप
महाप्रसादानंतर वाहतूक कोंडाचा सामना भाविक भक्तांना करावा लागला. त्यामुळे नागरिकांनी अंढेरा पोलीस स्टेशनच्या कर्मचार्याविषयी नाराजी व्यक्त केली. अंढेरा पोलीस स्टेशनचे कर्मचारी हे यात्रेमध्ये होते. परंतु ज्या वेळेस महाप्रसाद घेऊन लोक परत जात होते त्यावेळेस रोडवर गाड्या निघण्यासाठी अर्धा तास लागत होता. त्यामुळे अंढेरा पोलीस स्टेशनचे कर्मचारी नेमके कुठे होते, ट्रॅफिकमध्ये अडकलेल्या लोकांना पोलीस कर्मचारी यांचे नियोजन नसल्यामुळे नाहक मनस्ताप सहन करावा लागला, असा संताप भाविक भक्तांनी व्यक्त केला.
—————–