चिखली (विशेष प्रतिनिधी) – अंढेरा पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या चिखली तालुक्यातील मुरादपूर येथील उपसरपंच विष्णू भगवान गाडेकर यांनी गावाच्या सरपंच तसेच सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांची सामाजिक माध्यमाच्या माध्यमातून म्हणजेच सोशल मीडियावर बदनामी केल्याची तक्रार मुरादपूरच्या सरपंच सौ. ज्योती अनंता गाडेकर यांनी अंढेरा पोलीस स्टेशनला दिल्यावरून अंढेरा पोलिसांनी उपसरपंच विष्णू भगवान गाडेकर यांच्याविरुद्ध कलम ५०० नुसार कारवाई केली आहे.
या संदर्भात अंढेरा पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुरादपूर येथील सरपंच ज्योती अनंता गाडेकर यांनी १९ जानेवारी २०२३ रोजी अंढेरा पोलीस स्टेशनला तक्रार दिली की, मी मौजे मुरादपूर येथील रहिवासी असून, मागील २ वर्षापूर्वी ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीमध्ये निवडणूक जिंकून मुरादपूर गावची सरपंच म्हणून माझी निवड झाली. माझ्यासोबत माझे पती अनंता गाडेकर हे सुद्धा सदस्य म्हणुन निवडून आलेले आहेत. माझे पती राष्ट्रवादी काँग्रेस व माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या अतिशय जवळचे कार्यकर्ते आहेत. त्यामुळे आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या माध्यमातून गावामध्ये विविध विकास योजनांसाठी निधी आणण्याचे काम करीत आहे. गावामध्ये विकास कामे होत असल्यामुळे गावकरीसुद्धा सोबत आहेत. परंतु विष्णु भगवान गाडेकर हे माझ्याच ग्राम पंचायतचे उपसरपंच आहेत. त्यांना होत असलेली विकासकामे सहन होत नसल्यामुळे सातत्याने कामांमध्ये अडथळा निर्माण करण्याचे काम करत असतात. माझ्यावर व माझ्या पतीवर कुठलाही कागदी पुरावा नसतांना व कोणताही आरोप सिद्ध झालेला नसतांना मनघडन कहानी रचून भ्रष्टाचाराचे खोटेनाटे आरोप करुन माझी व माझ्या पतींची बदनामी करण्याचे काम सामाजिक माध्यमांच्या (सोशल मीडिया) माध्यमातून करत राहतात. मी महिला सरपंच असल्यामुळे सभागृहामध्ये व शासकीय कार्यालयांमध्ये गावकर्यांच्या कामासाठी मला सातत्याने जावे लागते. ज्यावेळी माझे पती सोबत नसतात तेव्हा गैरअर्जदार अर्वाच्य भाषेमध्ये बोलतात व सातत्याने मानहानी करतात. गावकर्यांना ग्रामपंचायतची कर वसुली भरण्यास विरोध करतात. एक प्रकारे ज्या सभागृहाचे ते प्रतिनिधी आहेत, त्याच सभागृहाचे नुकसान करण्याचे काम ते करतात. त्यांच्या कर्तव्यामध्ये कसूर करण्याचे काम करतात. गावामध्ये मागील काळामध्ये दलित वस्ती सुधार योजने अंतर्गत कॉक्रेट रस्त्याचे काम मंजूर झाले होते. सदर कामाची रितसर ई-निविदा काढून कंत्राटदार नेमून कंत्राटदाराला काम ग्रामपंचायतने दिले होते. त्या कामामध्ये सुद्धा गैरअर्जदाराने अडथळा निर्माण केला होता. व अधिकार्यांना फोनद्वारे धमकावण्याचे काम केले होते. माझ्या पतींनासुद्धा धमकवण्याचा प्रयत्न केला होता. आतासुद्धा गावामध्ये आमदार डॉ.राजेंद्र शिंगणे यांच्या स्थानिक विकास निधीमधून काँक्रेट रस्त्याचे काम सुरु आहे. त्या कामामध्येसुद्धा गैरअर्जदाराने अडथळा निर्माण करण्याचे काम व आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी गावासाठी निधी दिला म्हणून त्यांचीसुद्धा बदनामी करण्याचा काम गैरअर्जदार करत आहेत. त्यांच्या अशा विक्षिप्त वागण्यामुळे मी एक महिला असल्यामुळे सरपंच म्हणून काम पहाणे अडचणीचे ठरत आहे. माझ्या पतींनासुद्धा सदर गोष्टीचा मनस्ताप होत आहे व माझ्या कुटुंबाची सातत्याने होणारी मानहानी असह्य होत आहे. त्यामुळे पोलिसांनी अशा विक्षिप्त मानसिकतेच्या व्यक्तीवर कडक कारवाही करुन मला न्याय देण्यात यावा, अशी तक्रार अंढेरा पोलिसांत दाखल झाली आहे. या तक्रारीवरून अंढेरा पोलिसांनी दिनांक १९ जानेवारी २०२३ रोजी अपराध क्रमांक १८ / २०२३ कलम ५०० अन्वये गुन्हा नोंद करून कारवाई केली आहे. पुढील तपास पोलिस करत आहेत.
——————