सोलापूर ‘झेडपी’च्या ‘सीईओं’नी तीन वर्षात बदलले चार स्वीय सहाय्यक!
सोलापूर (संदीप येरवडे) – सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी आपल्या सव्वादोन वर्षाच्या कार्यकाळात जवळपास चार स्वीय सहाय्यक बदलले आहेत. हे स्वीय सहाय्यक कोणत्या कारणामुळे बदलले याचे मात्र रहस्य अद्याप समजू शकले नाही. पण आत्ता नव्याने नियुक्त करण्यात आलेल्या शिवानंद मगे यांना खुर्ची देण्यासाठी तीनवेळा पदभार बदलल्याबद्दल आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
सोलापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकार्यांचे स्वीय सहाय्यक म्हणून शिवानंद मगे यांच्याकडे जबाबदारी सोपविण्यात आली आहे. तसा आदेश प्रशासन विभागाकडून काढण्यात आला आहे. विशेष म्हणजे, जिल्हा परिषदेमध्ये मगे यांची कृषी सभापती, अर्थ सभापती यांच्याकडे स्वीय सहाय्यक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर त्यांची बदली समाजकल्याण विभागात झाली. त्यानंतर पुन्हा प्रशासन विभागात, तेथून अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकार्यांचे स्वीय सहाय्यक म्हणून त्यांनी केवळ महिनाभर काम केले. तेथून लगेच पुन्हा सीईओचे स्वीय सहाय्यक पदाची जबाबदारी देण्यात आली आहे.
तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी वायचळ यांची बदली सप्टेंबर २०२० मध्ये झाली. त्यानंतर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून स्वामी हे रुजू झाले. त्यावेळी त्यांच्याकडे स्वीय सहाय्यक म्हणून अविनाश गोडसे, त्याच्यानंतर चंदनशिवे आणि त्याच्यानंतर मल्लिकार्जुन तळवार आणि आता मगे असे जवळपास चार स्वीय सहाय्यक झाले आहेत. पण झेडपीत स्वीय सहायक आणि त्या आडून होणारे राजकारण हे कोणाला माहित नाही असे नाही.
कोण आहेत मगे?
कर्मचारी संघटनांच्या राजकारणावरून गोडसे यांना पदावरून हटविण्यात आल्याची झेडपीत चर्चा रंगली होती. त्यावेळीच मगे यांना या पदावर आणण्याचे प्रयत्न सुरू होते. पण याला वेगळे वळण लागत आहे, हे लक्षात आल्यावर ऐनवेळी चंदनशिवे हे नाव पुढे आले. थोडेच दिवस काम करून चंदनशिवे आपल्या मूळ ठिकाणी म्हणजे शिक्षण विभागात दाखल झाले. मगे यांनी समाज कल्याण विभागात दलित वस्ती विकास योजनेचे टेबल सांभाळले आहे. याबाबत तक्रारी आल्यावर समाज कल्याण सहाय्यक उपायुक्त मनीषा फुले यांनी चौकशी केली आहे. शिवाय मगे यांच्याविरुद्ध सदर बझार पोलीस ठाण्यात वैयक्तिक तक्रारीचा चौकशी अर्ज प्रलंबित असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यानंतर त्यांची बदली प्रशासन विभागात व तेथून अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे स्वीय सहायक आणि तिथून आत्ता सीईओंचे स्वीय सहाय्यक असा तीन महिन्यात प्रवास झाला आहे. मगे यांच्यावर इतकी मर्जी का दाखविण्यात आली, याबद्दल वेगवेगळी चर्चा रंगली आहे. झेडपीवर मोहिते- पाटील गटाच्या राजकारणाचे वर्चस्व आहे. असे असताना स्वीय सहाय्यक नियुक्तीची ही पद्धतशीर खेळी झाली, अशी चर्चा आता झेडपीच्या कर्मचारी वर्तुळात रंगली आहे. एकूणच मगे यांची नियुक्ती हा विषय आता वादळी ठरण्याची शक्यता आहे.
स्वामी म्हणाले होते…
गोडसे यांची पदोन्नती झाल्यामुळे त्यांच्या मूळ ठिकाणी सोडण्यात आल्याचे सीईओ स्वामी यांनी त्यावेळी स्पष्टीकरण दिले होते. स्वीय सहाय्यक हे पद प्रशासन अधिकारी दर्जाच्या अधिकार्याचे नाही, असेही ते म्हणाले होते. मग आता मगे यांचे पद कुठले? त्यांच्या वादग्रस्त कारकिर्दीचे काय? अशी व्यक्ती सीईओंचे स्वीय सहाय्यक या पदावर चालते काय? असे सवाल झेडपीच्या कर्मचार्यातून उपस्थित केला जात आहेत. याशिवाय या पदावर बसविण्यासाठी एखाद्या कर्मचार्याची किती वेळा बदली करता येते? असाही सवाल उपस्थित केला जात आहे.
——————