देऊळगावराजा (तालुका प्रतिनिधी) – तालुक्यातील दिग्रस बुद्रूक गावात गावठी दारूचा महापूर आला असून, अवैध देशी दारूची विक्री तातडीने बंद करण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांसह तंटामुक्ती समितीसह ग्रामपंचायत सदस्यांनी केली आहे. अन्यथा, तीव्र आंदोलनाचा इशारादेखील दिलेला आहे. अवैध गावठी दारूविक्रीमुळे गावात गंभीर समस्या निर्माण झालेल्या असून, पोलिस या दारूविक्रीकडे कानाडोळा करत असल्याने संताप व्यक्त होत आहे.
देऊळगावराजा तालुक्यातील वाळूतस्करीसाठी कुप्रसिद्ध असलेले दिग्रस बुद्रुक या गावाचे तंटामुक्ती अध्यक्ष व समिती सदस्य, गट ग्रामपंचायत सदस्य यांनी आता अवैध देशी दारूविक्री विरोधात एल्गार पुकारला असून, गावातील दारू तातडीने बंद करणेबाबत अंढेरा पोलीस स्टेशनला निवेदन सादर केलेले आहे. अंढेरा पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणारे दिग्रस बुद्रुक येथे अवैध देशी दारूचा ऊत आला आहे. त्यामुळे गावात गंभीर स्वरुपाच्या समस्या निर्माण झालेल्या असून, येथील अवैध देशी दारूविक्री बंद करणेबाबत पोलिसांना तोंडी सांगूनसुद्धा ही दारू बंद केली गेली नाही. त्यामुळे महात्मा गांधी तंटामुक्ती अध्यक्ष व समिती सदस्य, गट ग्रामपंचायत दिग्रस बुद्रुक येथील महिला नवयुव व इतर गावकर मंडळी यांनी अंढेरा पोलीस स्टेशन येथे येऊन ठाणेदार यांना निवेदन दिले आहे.
त्यामध्ये त्यांनी नमूद केले आहे की, आपल्या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये असलेले दिग्रस बुद्रुक येथील अवैध देशी दारूचे दुकान बंद करण्यात यावे. बुलढाणा जिल्ह्याचे नव्याने रुजू झालेले जिल्हा पोलीस अधीक्षक सारंग आवड यांनी रुजू झाले त्यावेळेस पत्रकार बांधवांना शब्द दिला होता की, ग्रामीण भागातील अवैद्य धंदे यांना आळा घालण्यात येईल. परंतु जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या आदेशालासुद्धा ग्रामीण भागातील पोलीस स्टेशनमध्ये केराची टोपली दाखवण्यात आली आहे. तेव्हा, अंढेरा पोलिसांनी तातडीने पोलिस अधीक्षकांच्या आदेशाचे पालन करून गावातील अवैध देशीदारूची विक्री तातडीने बंद करावी. अन्यथा, तीव्र आंदोलनाचा इशारादेखील ग्रामस्थांनी दिलेला आहे.
—————