नांदुरा/बुलढाणा (प्रतिनिधी) – नांदुरा शहरातील रेल्वे स्थानक चौक ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यादरम्यान सुस्साट जाणार्या चारचाकी गाडीने चार ते पाच दुचाक्यांना ठोकारत आणि कट मारत चांगलाच थरार निर्माण केला. मंगळवारी (दि.१७) सायंकाळी साडेपाच वाजेदरम्यान ही घटना घडली. संतप्त जमावाने ही गाडी शिताफीने अडवत, त्यातील तिघांवर हल्ला करण्याच्या तयारीत असताना, वेळीच पोलिसांनी धाव घेऊन गाडीतील तिघांना ताब्यात घेत, त्यांची जमावाच्या तावडीतून सुटका केली.
मंगळवारी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास सुझुकी कंपनीची (क्रमांक केए २० एमए ८८७३) ही चारचाकी गाडी सुस्साट वेगात शहरातील रस्त्यावर धावत होती. रेल्वे स्थानक चौक ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापर्यंत तिने चार ते पाच दुचाक्यांना ठोकारले तसेच अनेक वाहनांना जीवघेणे कट मारले. त्यामुळे रस्त्यावर एकच थरार निर्माण झाला होता. परंतु, काही तरुणांनी मोठ्या शिताफीने ही गाडी अडवली व या गाडीतील तिघांना बाहेर काढले. जमाव या तिघांवर हल्ला करण्याच्या मानसिकतेत होता, तसेच गाडीची तोडफोडही करणार होता. परंतु, वेळीच पोलिसांनी धाव घेऊन या तिघांना जमावाच्या तावडीतून सोडवत, ताब्यात घेतले. गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू होती. हे तिघे नशेत असल्याचे समजत असून, त्यांची पोलिस कसून चौकशी करत होते.
————-