काळजी करू नका, सरकार पडणार नाही : शरद पवार
– आताची बंडाळी हा शिवसेनेचा अंतर्गत मामला आहे
– एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री व्हायचे हे कधी सांगितले नाही
नवी दिल्ली (खास प्रतिनिधी) – राज्यातील महाविकास आघाडी सरकार पाडण्याचे प्रयत्न यापूर्वी झाले नाही, असे नाही. त्यामुळे आता जरी तसे प्रयत्न होत असले तरी हे सरकार कोसळणार नाही. सरकार पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल, असा विश्वास व्यक्त करत, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा महाविकास आघाडी सरकारचे शिल्पकार शरद पवार यांनी फक्त ११ मिनिटांच्या पत्रकार परिषदेत राज्य सरकारला धोका नसल्याचे नवी दिल्लीत सांगितले.
आपण एकनाथ शिंदे यांच्यासोबत चर्चा केली का, असा प्रश्न यावेळी ब्रेकिंग महाराष्ट्रच्या प्रतिनिधीने पवार यांना केला असता, त्यांनी आपण शिंदे किंवा कुणाशीही चर्चा केली नाही. परंतु, आता जे काही सुरु आहे, ते शिवसेनेचा अंतर्गत मामला आहे, त्यात आपण पडू इच्छित नाही. परंतु, सरकार पाडण्याचे इरादे यशस्वी होणार नाहीत. आम्ही भाजपसोबत जाण्याचा प्रश्नच नाही, असेही पवारांनी स्पष्ट केले. एकनाथ शिंदे हे नाराज असल्याचे त्यांनी आमच्यापैकी कुणाला कधी सांगितले नाही. तरीही सरकारमध्ये काही बदल करण्याची आम्हाला गरज वाटत नाही. मुख्यमंत्री कुणाला बनवायचे, हा त्यांचा (शिवसेनेचा) अंतर्गत प्रश्न असल्याने आपण त्यावर काही बोलणार नाही. परंतु, विधान परिषदेच्या निवडणुकीत क्रॉस व्होटिंग झाल्याने काहींना हे सरकार अल्पमतात असल्याचे वाटत असावे. पण, तसे काही नाही, असेही पवारांनी स्पष्ट केले.
शिवसेनेचे नार्वेकर, भाजपचे आमदार कुटे सुरतकडे रवाना
राज्यात सरकार बनविण्यासाठी १४४ हा जादुई आकडा आहे. एकनाथ शिंदे यांना बंडखोरी करायची असेल तर त्यांना ३७ आमदारांचा पाठिंबा हवा आहे. अन्यथा, पक्षांतर बंदी कायद्यानुसार त्यांच्यासोबत बंडखोरी करणारे सर्व आमदार अपात्र ठरू शकतात. सद्या एकनाथ शिंदे यांच्यासोबत ३० आमदार असल्याचे सांगण्यात येते. त्यापैकी १५ जण हे शिवसेनेचे आहेत तर उर्वरित काँग्रेस-राष्ट्रवादीचे आहेत. या आमदारांशी चर्चा करण्यासाठी शिवसेना नेते तथा उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहाय्यक मिलिंद नार्वेकर हे सुरतला निघाले आहेत. तत्पूर्वी, नार्वेकर व शिंदे यांच्यात फोनवर चर्चा झाली. त्यावर एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चेची तयारी दाखवली आहे. दुसरीकडे, देवेंद्र फडणवीस यांचा निरोप घेऊन जळगाव जामोदचे आमदार डॉ. संजय कुटे हेदेखील सुरतकडे निघालेले आहेत. ते चार वाजेपर्यंत सुरतला पाेहाेचतील. तत्पूर्वी त्यांनी शिंदे यांच्याशी फाेनवर चर्चा केली.