समृद्धी महामार्ग घोटाळा उघड न होण्यासाठीच ठाकरे सरकार पाडण्याचा घाट?
– ठाकरे सरकार राहिले तर अनेकांची जेलवारी निश्चित, त्यासाठी सरकार पाडण्यासाठी साधले विधानपरिषदेचे टायमिंग
मुंबई (खास प्रतिनिधी) – मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाची अंतिम अधिसूचना निघण्यापूर्वी या महामार्गालगत, राजकीय नेते, मंत्रालयातील उच्चपदस्थ अधिकारी वा त्यांच्या नातेवाइकांनी केलेल्या जमीन खरेदी गैरव्यवहाराच्या चौकशीची मागणी करून, माजी मुख्यमंत्री व ज्येष्ठ काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी या आधीच भ्रष्टाचारविरोधात वात पेटविली होती. या फटाक्यांचा स्फोट झाला तर अनेक भ्रष्ट नेते, अधिकारी त्यात बेचिराख होतील. या गैरव्यवहाराच्या चौकशीची भीती अनेकांना आहे. त्यामुळेच ठाकरे सरकार पाडण्यासाठी विधानपरिषद निवडणुकीच्या क्रॉस व्होटिंगचे टायमिंग साधण्यात आले आहे, अशी माहिती जाणकार सूत्राने दिली आहे.
मंत्री, अधिकारी वा त्यांच्या नातेवाइकांनी समृद्धीलगत जमिनीची खरेदी केल्यानंतर अंतिम अधिसूचना काढण्यात आली, आणि याच लोकांनी मग शासनाकडून जमिनीचा चौपट मोबदला घेतला. हा घोटाळा मोठा आहे. खुल्या बाजारातून ७.३ टक्के व्याजदराने कर्ज उपलब्ध होत असताना, या प्रकल्पासाठी ९.७५ टक्के अशा वाढीव दराने कर्ज घेण्याची नेमकी कारणे काय?, हा पृथ्वीराज चव्हाण यांचा सवाल होता, त्याचे उत्तर आजही मिळालेले नाही.
जादा मोबदला लाटण्याकरिता जमीन बिगरशेती किंवा औद्योगिक जमीन असल्याचे भासवल्याचे उद्योगही झाले आहेत. भूसंपादन लवकर मार्गी लागावे म्हणून फडणवीस सरकारने जमिनीचा भाव वाढवून दिला होता. महामार्गाचे कामही महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडे दिले व वादग्रस्त अधिकारी त्यावर नेमले होते. सरकारी अधिकारी, स्थानिक दलाल आणि राजकारणी यांच्या भ्रष्ट साखळीने शेतकर्यांची फसणवूक करून कवडीमोल दराने जमिनी खरेदी केली आणि याच जमिनी नंतर चढ्या भावात सरकारला विकल्या आहेत.