मुख्यमंत्रीपद सोडा, फडणवीसांना मुख्यमंत्री करा!
– काँग्रेसचा सरकारला धक्का, बाळासाहेब थोरातांचा विधीमंडळ पक्षनेतेपदाचा राजीनामा?
मुंबई (खास प्रतिनिधी) – राज्यातील महाविकास आघाडी सरकार अखेर शेवटच्या घटका मोजत असल्याचेच स्पष्ट होत आहे. शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांच्यासह महाविकास आघाडीतील वरिष्ठ नेत्यांनी समजावून सांगूनही, बंडखोर नेते एकनाथ शिंदे हे ऐकायला तयार नाहीत. या उलट भाजपसोबत सरकार स्थापन करा, देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करा, व एकनाथ शिंदे यांना उपमुख्यमंत्री करा, असा प्रस्ताव शिंदे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवला असल्याची खात्रीशीर माहिती वरिष्ठस्तरीय सूत्राने दिली आहे. आमदार संजय राठोड यांनी ठाकरे यांच्याशी संपर्क साधत, हा प्रस्ताव दिला असल्याचेही सूत्र म्हणाले. दुसरीकडे, काँग्रेसचे आमदार दिल्लीला रवाना झाले असतानाच, पक्षाचे विधीमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असल्याची माहिती हाती आली आहे. हा राजीनामा ठाकरे सरकारला मोठा धक्का ठरणार आहे. काँग्रेस सरकारचा पाठिंबा काढून घेण्याची शक्यता वर्तविली जात असताना, थोरात यांचा राजीनामा येत असल्याने शरद पवार यांनी दिल्लीत काँग्रेस श्रेष्ठींशी चर्चा करून, काँग्रेसच्या भूमिकेची चाचपणी केली. पवार हे मुंबईकडे निघाले असून, थोड्याच वेळात ते मुंबईत पोहोचतील, असे सांगण्यात आले. दुसरीकडे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईत बाेलावलेल्या आमदारांच्या बैठकीत फक्त 35च आमदार पाेहाेचले हाेते. त्यामुळे शिवसेनेत उभी फूट पडल्याचे निदर्शनास येत आहे. मुंबईत वेगवान राजकीय घडामाेडी सुरु असून, तिकडे नवी दिल्लीतही राजकीय घडामाेडींना वेग आलेला आहे. एक केंद्रीय मातब्बत मंत्र्यांच्या इशार्यावरून हा घडामाेडी सुरु असल्याचे सांगण्यात येत आहे.
(सविस्तर माहिती फक्त ब्रेकिंग महाराष्ट्रवर थोड्याच वेळात…)