दोन संजयांचे बंड; मग पालकमंत्री कोण?
समजा फडणवीसांचे सरकार आल्यास बुलडाण्याचे पालकमंत्री कोण, रायमुलकर की गायकवाड?
– डॉ. संजय रायमुलकरांची नाराजी एकनाथ शिंदेंनी बरोबर हेरली
– संजय गायकवाड यांच्यासारखा कट्टर शिवसैनिक फसला कसा?
– डॉ. रायमुलकर, गायकवाड यांना परत आणण्याची जबाबदारी खासदार प्रताप जाधव यांच्यावर
बुलडाणा (ब्रेकिंग महाराष्ट्र) – राज्यातील उद्धव ठाकरे सरकार पाडून भारतीय जनता पक्षाचे सरकार स्थापन करण्यासाठी राजकीय षडयंत्रांना राजधानी नवी दिल्लीत व मुंबईत जोरदार उधाण आले आहे. गुजरातमधील सुरत येथे जाऊन बसलेले व नॉट रिचेबल असलेले बुलडाण्यातील शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड व मेहकरचे आमदार डॉ. संजय रायमुलकर यांना परत आणण्याची जबाबदारी शिवसेनेने खासदार प्रतापराव जाधव यांच्यावर सोपावली आहे. कारण, हे दोन्हीही आमदार केवळ त्यांचेच ऐकू शकतात. मंत्रिपद हुकल्याने डॉ. रायमुलकर हे शिवसेनेत नाराज होतेच, त्यांनी नाराजी बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी बरोबर हेरली. परंतु, संजूभाऊ हे शिंदे यांच्या जाळ्यात कसे अडकले, असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. उद्या देवेंद्र फडणवीस यांचे सरकार आलेच तर मंत्रिपद आणि बुलडाण्याचे पालकमंत्रीपद कुणाला मिळणार? रायमुलकर की गायकवाड? असा प्रश्नही आता निर्माण झाला आहे.
राज्यात २०१९ मध्ये महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होत असताना, वरिष्ठ नेतृत्वाने डॉ. संजय रायमुलकर यांना मंत्रिपदाचा शब्द दिला होता. मेहकर विधानसभा मतदारसंघातून आमदारकीची हॅटट्रीक करणारे डॉ. रायमुलकर हे खरे तर मंत्रिपदाचे दावेदार होतेच. त्यांना शपथविधीसाठी तयार राहण्याचा निरोपही मिळाला होता. त्यानुसार, त्यांनी नवे कपडे शिवूनही घेतले होते व कुटुंब, मित्रपरिवारासह मुंबईकडे निघण्याची तयारीही केली होती. परंतु, ऐनवेळी रायमुलकर यांना डावलून उद्धव ठाकरे यांनी त्यांचे सुपुत्र आदित्य ठाकरे यांना मंत्रिपदाची संधी दिली. तेव्हा नाराज झालेले रायमुलकर हे आजही नाराजच आहेत. त्यांची ही नाराजी दूर करण्यासाठी त्यांना पंचायतराज समितीचे अध्यक्षपद देण्यात आले होते. परंतु, आता बंडखोरांच्या गोटात सामिल होऊन आपली नाराजी कायम असल्याचे डॉ. रायमुलकर यांनी दाखवून दिले. ते काल रात्रीच एकनाथ शिंदे व इतर आमदारांसोबत सुरत येथे गेले असून, त्यांचा फोन नॉटरिचेबल आहे. तथापि, ते कुणाच्या तरी संपर्कात असून, ते नाव पुढे येऊ शकले नाही. दुसरीकडे, संजय गायकवाड यांना शिवसेनेकडून पहिल्यांदाच आमदारकी भेटली होती. ते नाराज असावे, असे काहीही कारण नव्हते. काल-परवा जेव्हा खासदारकीची निवडणूक होती, तेव्हा ते हॉटेल सोडून आमदार निवासात गेले होते. त्यांनी शरद पवार यांच्याशीही चर्चा केली होती. परंतु, त्यांच्या मनाचा थांग कुणाला लागला नव्हता. बुलडाण्यात भाजपचे नेते विजयराज शिंदे व संजय गायकवाड यांच्यातील हाडवैर सर्वश्रुत आहे. गायकवाड हे एकनाथ शिंदे यांच्या नांदी लागून शिवसेनेच्या विरोधात गेले तर त्यात त्यांचे राजकीय नुकसान आहे. कारण, उद्या त्यांची शिवसेनेतून हकालपट्टी झाली तर बुलडाण्यात शिवसेनेकडे दुसरे नेतृत्व तयार आहे. शिवाय, कट्टर शिवसैनिक असलेल्या व थेट उद्धव ठाकरे यांच्या गळ्यातील ताईत बनलेला हा नेता एकनाथ शिंदे यांच्या गळाला कसा लागला? असा प्रश्न आता निर्माण झाला आहे.
उद्या, या बंडखोरांचे बंड यशस्वी झाले आणि देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री बनले तर, बुलडाण्यातून मंत्रिपद आणि पालकमंत्रीपद कुणाला मिळेल? असा प्रश्न आहे. कारण, डॉ. संजय रायमुलकर हे सीनिअर असून, ते मंत्रिपदाचे दावेदार आहे. खास सूत्राच्या माहितीनुसार, तसा त्यांना शब्दही मिळालेला आहे. मग गायकवाड यांना काय मिळणार? हा प्रश्न निर्माण होतो. दरम्यान, शिवसेनेच्या वरिष्ठ सूत्राच्या माहितीनुसार, बुलडाण्याचे खासदार प्रतापराव जाधव यांना या दोन्हीही आमदारांना परत बोलाविण्याचे व मन वळविण्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे प्रतापरावांची शिष्टाई यशस्वी होते की हे दोन्ही आमदार बंडावर ठाम राहतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
———–