BREAKING NEWS! महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप; शिंदेंसाेबत 19 आमदार!
– मंत्री एकनाथ शिंदे १९ आमदार घेऊन गुजरातमध्ये, गुजरात सरकारचे संरक्षण, जोरदार बडदास्त
– काँग्रेसने बाळासाहेब थोरात यांच्यासह आमदारांना दिल्लीत बोलावले, पाठिंबा काढण्याची शक्यता?
—
ब्रेकिंग महाराष्ट्रच्या हाती आलेल्या माहितीनुसार, हे आमदार एकनाथ शिंदे यांच्या सोबत आहेत…
१. एकनाथ शिंदे (मुंबई)
२. अब्दुल सत्तार (सिल्लोड-औरंगाबाद)
३. शंभुराज देसाई (सातारा)
४. संदीपान भुमरे (पैठण-औरंगाबाद)
५. उदयसिंह रजपूत (कन्नड-औरंगाबाद)
६. भरत गोगावले (महाड-रायगड)
७. नितीन देशमुख (अकोला)
८. स्वप्निल बाबर (सांगली)
९. विश्वनाथ भोईर (ठाणे-पश्चिम)
१०. संजय गायकवाड (बुलडाणा)
११. संजय रायमुलकर (मेहकर-बुलडाणा)
१२. महेश शिंदे (कोरेगाव-सातारा)
१३. शहाजी पाटील (सांगोला, सोलापूर)
१४. प्रकाशराव आंबिटकर (राधापुरी-कोल्हापूर)
१५. संजय राठोड (दिग्रस-यवतमाळ)
१६. ज्ञानराज चौगुले (उमरगा-उस्मानाबाद)
१७. तानाजी सावंत (परंडा-उस्मानाबाद)
१८. संजय सिरसाठ (औरंगाबाद पश्चिम)
१९. रमेश बोरनारे (वैजापूर – औरंगाबाद)
मुंबई (ब्रेकिंग महाराष्ट्र) – विधानपरिषद निवडणुकीत तब्बल २० मते फोडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सरकार अल्पमतात असल्याचे सिद्ध करणार्या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आता हे सरकार पाडण्यासाठी निर्णायक आणि वेगवान हालचाली सुरु केल्याची धक्कादायक माहिती हाती आली आहे. शिवसेनेचे नाराज ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्यासह १९ आमदार काल रात्रीपासून नॉट रिचेबल असून, ते गुजरातमधील सुरत येथे ली मेरिडिअन हॉटेलात मुक्कामी आहेत. या हॉटेलला गुजरात सरकारने कडेकोट बंदोबस्त दिला असून, गुजरातचे गृहमंत्री या सर्व आमदारांची बडदास्त ठेवत आहेत. केंद्रातील एक वरिष्ठ नेता या आमदारांच्या संपर्कात असून, त्यांना राजकीय संरक्षण दिले असल्याची खात्रीशीर माहिती आहे. या राजकीय भूकंपाने हादरलेल्या शिवसेनेने तातडीने दुपारी आमदारांची बैठक बोलावलेली आहे. या १९ पैकी काही आमदारांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी संपर्क केला असल्याची माहिती शिवसेना प्रवक्त्या मनिषा कायंदे यांनी दिली असून, शिंदे यांचे बंड यशस्वी होणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. दुसरीकडे, काँग्रेस हायकमांडनेदेखील महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासह आमदारांना तातडीने दिल्लीला बोलावले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हेदेखील दिल्लीत असून, त्यांनी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक घेतली. दुपारनंतर तेही मुंबईत परत येणार असून, परिस्थिती हाताळणार असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे ठाकरे सरकार कोसळते की शिंदे यांचे बंड उधळून लावले जाते, याकडे राज्याचे लक्ष लागून आहे.
कालच्या विधानपरिषद निडणुकीत पाचही जागा िंजकल्यानंतर भाजपचा कॉन्फिडन्स चांगलाच वाढला असून, सरकार पाडण्यासाठी त्यांनी जोरदार हालचाली चालविल्या असल्याचे वरिष्ठ राजकीय सूत्राचे म्हणणे आहे. कालच्या मतदानानंतर शिवसेनेचे मंत्री व ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे हे अचानक नॉटरिचेबल झाले होते. ते १९ आमदारांना घेऊन गुजरातमधील सुरत येथे निघून गेले. भाजपच्या सूत्राने ब्रेकिंग महाराष्ट्रशी बोलताना सांगितले, की एकनाथ शिंदे यांच्यासह १८ पेक्षा जास्त आमदार सुरतमध्ये आहेत. तर शिवसेनेच्या प्रवक्त्यानुसार, १३ आमदारांना शिंदे यांनी फितवल्याचे दिसते. गुजरात भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष हे राज्यात सीआर पाटील यांच्या संपर्कात आहे. काल रात्रीपासून एकनाथ शिंदे हे गुजरामध्ये असून, सुरतच्या ली मेरिडिअन हॉटेलात ते थांबले आहेत. सुरत एअरपोर्टपासून दोन मिनिटांवर हे हॉटेल आहे.या हॉटेलबाहेर चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून, कोणत्याही पत्रकाराला अथवा मध्यस्थाला आत जाण्यात मज्जाव करण्यात आला आहे. या घटनेचे गांभीर्य पाहाता, दिल्लीकडे शरद पवार यांच्या बैठकीला निघालेले खासदार संजय राऊत यांनी दौरा रद्द करत, मुंबईतच डॅमेज कंट्रोल करणे पसंत केले. राष्ट्रपती निवडणुकीसाठी शरद पवारांनी ही बैठक बोलावली होती.
शिंदेंच्या बंडामागे भाजपचाच हात असल्याचे आता जवळपास उघड होत असून, गुजरातचे गृहमंत्री असलेले सुरतचे भाजप आमदार हर्ष सांघवी हे या आमदारांसाठी सर्व नियोजन करत असल्याचे समोर आले आहे. सांघवी हे पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या निकटवर्तीयांपैकी एक आहेत. ब्रेकिंग महाराष्ट्रने एकनाथ शिंदे यांना फोनवर संपर्क केला असता, गुजराती भाषेतील टोन ऐकू येत असून, ते फोन उचलत नाही. दुसरीकडे, काँग्रेसनेही आपल्या सर्व आमदारांना आज रात्रीपर्यंत दिल्ली येथे तातडीने बोलावले आहे. बुधवारी या सर्व आमदारांची बैठक होणार आहे. बाळासाहेब थोरात यांच्या कार्यालयातून आमदारांना तसे फोन जात आहेत, अशी माहिती देण्यात आली आहे.
आता पुढे काय होणार?
शिवसेनेतील फुटीर आमदारांचा स्वतंत्र गट करायचा तर दोन तृतीयांश आमदार आवश्यक असतील, नाहीतर फुटीर आमदारांचे सदस्यत्व रद्द होऊ शकते. आमदारपदाचा राजीनामा दिला, तर अशा कृतीनंतर पुन्हा जनता निवडून देण्याची शाश्वती नसते. भाजप गोव्यातील फॉर्म्युला वापरेल का? असा प्रश्न असून, गोव्यात काँग्रेस आणि महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षातून आमदारकीचा राजीनामा न देता, १२ आमदार भाजपमध्ये गेले होते. मात्र, उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने पक्षाच्या विधीमंडळ गटातून फुटून दुसर्या पक्षात गट विलीन करण्याचा निर्णय वैध ठरवला. या आमदारांना पक्षांतरबंदी कायदा आणि घटनेच्या १० व्या परिशिष्टातील तरतुदींचा भंग केल्यावरून अपात्र ठरवावे, अशी मागणी करणारी याचिका फेटाळली गेली होती. घटनेच्या १० व्या परीशिष्टात राजकीय पक्षाचा विधीमंडळ गट स्वतंत्रपणे दोन तृतीयांश बहुमताने दुसर्या पक्षात विलीन करण्याची तरतूद नाही. फूट पडली तर ती विधीमंडळ गट आणि मूळ पक्षात पडावी लागते. पक्ष विलीन करण्यासाठी मूळ पक्ष संघटनेने ठराव करणे आवश्यक आहे. अनेक तांत्रिक मुद्दे आहेत आणि दुसरीकडे, भाजपचे न्यायालयात लढण्याचे विशेष कौशल्य आहे. किंवा, आता तातडीने राज्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विधानसभेत बहुमत सिद्ध करण्याचे आव्हान देऊ शकतात. राज्यपालही ही मागणी मान्य करू शकतात. तसे, झाले तर शिवसेनेचे हे २० आमदार बहुमतासाठी गैरहजर राहतील. परिणामी, मुख्यमंत्री ठाकरे हे अल्पमतात गेल्याने सत्तेतून पायउतार होतील, असाही राजकीय सूत्राचा कयास आहे.