Breaking newsHead linesMaharashtraWorld update

अंबरनाथच्या साईभक्तांच्या बसला नाशिक जिल्ह्यात भीषण अपघात, १० ठार

– २५ ते ३० साईभक्त गंभीर जखमी, सिन्नर, शिर्डी येथे उपचार सुरू!

नाशिक (जिल्हा प्रतिनिधी) – सिन्नर तालुक्यातील वावी-पाथरे गावांच्या दरम्यान सिन्नर-शिर्डी राज्य मार्गावरील ज्ञानेश्वर मंदिराजवळ पहाटेच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात १० साईभक्तांचा मृत्यू झाला असून, २५ ते ३० भाविक गंभीर जखमी झालेले आहेत. खासगी आराम बस आणि ट्रकची समोरासमोर धडक झाल्याने हा भीषण अपघात घडला. या अपघातात खासगी बस आणि ट्रकचा चक्काचूर झाला आहे. अपघातग्रस्त बसमध्ये ठाण्यातील अंबरनाथमधील ५० भाविक होते. जखमींवर सिन्नर येथील ग्रामीण रुग्णालयात तसेच शिर्डी येथील साई सुपरस्पेशालिटी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. अपघात एवढा भीषण होता की, बसचा चुराडा झाला असून, एका बाजूने बसचा सांगाडाच बाहेर पडल्याचे चित्र घटनास्थळावर दिसून आले. एकूणच नाशिक शहरासह जिल्ह्यातील आपघातांचे सत्र सुरूच असून, यंदाच्या वर्षांतील सर्वात भयानक अपघात म्हणावा लागणार आहे.

या अपघातातील मृतांमध्ये दोन पुरुष, ६ महिला तर दोन चिमुकल्याचा समावेश असल्याची पोलिसांनी माहिती दिली. या अपघातानंतर एकच आक्रोश आणि किंकाळ्या सुरू झाल्या. प्रवाश्यांच्या ओरडण्याचा आणि रडण्याचा आवाज ऐकून ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेऊन त्यांना तातडीने मदत केली. अपघाताप्रकरणी वावी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी पंचनामा केला असून अधिक तपास सुरू आहे.
उल्हासनगर येथून १५ बस साई दर्शनासाठी शिर्डीकडे निघालेल्या होत्या, त्यातील एका बसला हा भीषण अपघात झाला. मुंबई येथून शिर्डीकडे जाणारी खाजगी आराम बस क्रमांक एमएच ०४ एसके २७५१ व शिर्डीकडून सिन्नर बाजूकडे जाणारा मालट्रक क्रमांक एमएच ४८टी १२९५ यांची समोरासमोर धडक होऊन ही भीषण दुर्घटना घडली होती. अपघाताचे वृत्त कळताच मुख्यमंत्र्यांनी नाशिक विभागीय आयुक्त तसेच जिल्हाधिकार्‍यांशी चर्चा करून याविषयी अधिक माहिती घेतली. जखमी प्रवाशांना तातडीने शिर्डी नाशिक या ठिकाणी हलवून त्यांच्यावर योग्य ते उपचार सुरू करावेत, तसेच हा अपघात नेमका कशामुळे झाला त्याची चौकशी करावी, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.


मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाखांची मदत

दरम्यान, या दुर्देवी अपघातप्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. अपघातातील मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाख रुपये देण्याचे आणि जखमींवर शासकीय खर्चाने आवश्यक ते उपचार करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला दिले आहेत.


ज्यांनी हे दृश्य अगदी जवळून पहिले त्यातील एका अपघातग्रस्ताने आपल्या जीवावर बेतलेला भयंकर प्रसंग सांगितला.  तो म्हणाला, रात्री बारा साडेबारा वाजेच्या सुमारास अंबरनाथहून आम्ही शिर्डी साईबाबांच्या दर्शनासाठी बसने निघालो होतो. बस चालक हा वेगात गाडी चालवत होता. बस हळू चालवण्यासाठी आम्ही त्याला ३ वेळा बोललो. तरीही त्याने आमचं ऐकलं नाही. त्यानंतर रस्त्यात पहाटे ३ वाजता आम्ही चहा, नाष्ट्यासाठी थांबलो होतो. तेव्हाही चालकाला बस हळू चालवण्यासाठी आम्ही बस आम्ही काही लोकांनी सांगितलं होतं. तरीही चालकाने बस वेगात चालवली, असं अपघातातून बचावलेले आणि प्रत्यक्षदर्शी विनोद राठोड यांनी सांगितलं. बसला अपघात सकाळी सहा साडेसहा वाजेच्या सुमारास झाला. ज्यावेळी अपघात झाला त्यावेळी आम्हाला काहीही कळलं नाही. कोण कुठे, तर कोण कुठे पडलेलं होतं. इतकी भयंकर परिस्थिती होती की ती सांगताही येत नाही, प्रवासी विनोद राठोड म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!