सोलापूर (जिल्हा प्रतिनिधी) – ज्या गावांमध्ये स्वतः महिला आर्थिक सक्षम होतात तेव्हाच खर्याअर्थाने त्या गावाची प्रगती होते. त्यामुळे महिलांनी छोटे-मोठे उद्योग सुरू करून आपले गाव व कुटुंब सक्षम करण्याचे आवाहन सोलापूर शहर (मध्य)च्या आमदार प्रणिती शिंदे यांनी केले.
मुळेगाव (ता.दक्षिण सोलापूर) येथे महिला मेळावा तथा औद्योगिक शिलाई मशीन प्रशिक्षण पूर्ण केलेल्या महिलांना प्रमाणपत्र वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी त्या बोलत होत्या. आ. प्रणिती शिंदे म्हणाल्या, की महिलांनी आपला उंबरठा ओलांडून छोटे मोठे व्यवसाय घर खर्चासाठी शिवणकाम सुरू केले तर महिलांची प्रगती होऊ शकते. त्यासाठी महिलांनी जे काही उत्पादन केले आहे ते चांगल्या प्रतीचे असले पाहिजे. त्या उत्पन्नाला बाजारपेठेत चांगली मागणी आहे. त्यामुळे एखाद्या गावात महिला पुढे येत असतील तर खरी प्रगती तिथूनच होते. आज समाजामध्ये महिलांचे प्रश्न मोठ्या प्रमाणात आहेत. परंतु त्या महिला अनेकवेळा व्यक्त करीत नाहीत. त्यामुळे महिलांवरील दिवसेंदिवस अन्याय वाढत आहे. महिलांनी आपल्यावरील अन्याय दूर करायचा असेल तर समोर यायला पाहिजे. तेव्हाच खर्याअर्थाने क्रांती होते. विशेष म्हणजे महिलांवरील विषयावर महिलांनीच बोलावे असे काही नाही, पुरुषांनी देखील समोर येण्याचे आवाहन आमदार प्रणित शिंदे यांनी केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक आयोजक, तंटामुक्त समिती अध्यक्ष नितीन बनसोडे यांनी करताना सांगितले की, हा उद्योग महात्मा गांधी तंटामुक्त समिती मुळेगाव यांच्यावतीने सुरू करण्यात आला आहे. त्यासाठी अनेकांचा हातभार लागला आहे. या उद्योगाच्या माध्यमातून अनेक महिला आत्मनिर्भर होऊन शिवणकामातून चार पैसे मिळवित असल्याचे समाधान असल्याचे सागितले. यावेळी उपसरपंच शिवराज जाधव, ग्रामपंचायत सदस्य गणेश काकडे, किसन नागटिळक, श्रीशैल म्हेत्रे, बालाजी बनसोडे, बसवराज स्वामी, ग्रामपंचायत सदस्य, सीमा बनसोडे, भौरम्मा माळी, शिवगंगा वाघमारे, संध्या दुपारगुडे, फर्जना मुलाणी, माधुरी काकडे आकांक्षा गायकवाड,अरुण पाटील, अमृता बनसोडे, गुलाब शेख, ब्रम्हनाथ बनसोडे,महेश शेंडगे, आदी उपस्थित होते.
—————–