– जलसंधारण विभागाच्या कर्मचार्याने पाणी सोडण्यासाठी परस्पर ठेवला खासगी व्यक्ती!
किनगावजट्टू, ता. लोणार (प्रतिनिधी) – चिखला खंडाळा धरणाच्या कालव्यातून कार्यालयीन लिपिकाने ठेवलेल्या खासगी व्यक्तीने मनमानीपणे पाणी सोडल्याने, तब्बल लाखो लीटर पाण्याची नासाडी झाली असून, जलसंधारण विभागाचे लाखो रुपयांचे नुकसान तर झालेच, पण लाखो लीटरची जलसंपदा नदीत वाहून ऐन रब्बी हंगामात शेतकर्यांच्या हक्काचे पाण्याची नासाडी झाली आहे. गेल्या ७२ तासांपासून पाण्याची ही नासाडी सुरू असून, जलसंपदा विभागाच्या वरिष्ठांनी तातडीने संबंधित लिपिकाविरुद्ध शासकीय जलसंपदेचे नुकसान प्रकरणी गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी ऐरणीवर आली आहे.
जलसंधारण उपविभागांर्तगत चिखला खंडाळा धरण येते. मागील ऑक्टोबर महिन्यात रब्बी गहू, हरबरा या पिकांना पहिले पाणी पाटचारीतून दिले गेले. दिनांक ५ जानेवारीला पेरणी नंतरचे दुसरे पाणी सोडले गेले आहे. या धरणावर पाणी सोडण्याकरिता या कार्यालयातील लिपिक म्हणून असलेले गजानन लक्ष्मण काळुशे यांना नेमलेले आहे. परंतु, या काळुशे यांनी स्वतः आपली जबाबदारी पार न पाडता, एका खासगी व्यक्तीची धरणावरून पाणी सोडण्याकरिता परस्पर नेमणूक केलेली आहे. कालपासून हे पाणी कालव्यातून अतिरिक्त सोडले गेल्यामुळे संपूर्ण कॅनॉलवरून पाणी नदीत ओसंडून वाहत आहे. यामुळे गेल्या ७२ तासापासून लाखो लीटर पाणी वाहून गेले असून, शासनाच्या पाण्याची तर नासाडी झालीच, पण शेतकर्यांचेदेखील हक्काच्या पाण्याचे नुकसान झालेले आहे. शासनाचे आर्थिक नुकसान व जलसंपदेची नासाडी करणाया करणार्या कर्मचार्यांवर तातडीने गुन्हे दाखल करून कारवाई करावी, अशी मागणी शेतकरीवर्गातून पुढे आली आहे.
——————-