फडणवीसांचा ठाकरेंना पुन्हा चेकमेट!
– काँग्रेसचे भाई जगताप, भाजपचे प्रसाद लाडही विजयी, चंद्रकांत हंडोरेंचा ‘गेम’ झाला!
– राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, भाजपचे सर्व उमेदवार जिंकले, काँग्रेसचाच एक पडला
मुंबई (ब्रेकिंग महाराष्ट्र) – विधानपरिषद निवडणुकीत महाविकास आघाडीची तब्बल २१ मते फोडत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील उद्धव ठाकरे सरकारला सरळ सरळ चेकमेट दिला. काँग्रेसचे भाई जगताप व भाजपचे प्रसाद लाड यांच्यात पाचव्या जागेसाठी सामना होईल, असे चित्र असताना, दोघेही निवडून आले आणि काँग्रेसचे चंद्रकांत हंडोरे यांचा गेम झाला. हंडोरे पडल्याने भाजप, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व उमेदवार विजयी झाले आहेत. तर काँग्रेसचा दोन पैकी फक्त एकच उमेदवार विजय झाला. हा काँग्रेसला मोठा धक्का मानला जात आहे. राज्यसभेपाठोपाठ विधानपरिषदेतही काँग्रेसला झटका बसला आहे.
विधानपरिषदेतील विजयानंतर भाजप कार्यकर्त्यांनी आणि नेत्यांनी एकच जल्लोष केला. विधानपरिषद जिंकल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. हा विजय म्हणजे महाराष्ट्रात परिवर्तनाची नांदी होय, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. आम्ही राज्यसभेच्या निवडणुकीत १२३ मते घेतली होती. आता आम्ही १३४ मते घेतली आहेत. महाविकास आघाडीमध्ये प्रचंड नाराजी आहे, समन्वय नाही, हे मी पहिल्यापासून सांगत होतो. सरकारवर आमदारांचा विश्वास नाही. म्हणूनच आमच्या पाचव्या उमदवाराला विजयी केले. पाचव्या उमदवारासाठी आमच्याकडे एकही मत नव्हते. तरिही आम्ही काँग्रेसच्या दोन्ही उमदवारांपेक्षा जास्त मते घेतली. उर्वरित चारही उमदवाराने जास्त मते घेतली. त्यामुळेच प्रचंड मोठा विजय झाला, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. मुक्ता टिळक आणि लक्ष्मण जगताप यांनी अडचणीत असतानाही त्यांनी विजयाला हातभार लावला, त्यांचेही फडणवीस यांनी आभार मानले.
विधानपरिषदेच्या १० जागांच्या निवडणुकीसाठी २८५ आमदारांचे ५ वाजता मतदान पूर्ण झाले. नाराज असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे तीनही आमदार मतदानाला आले. त्यासाठी अजित पवार यांनी स्वतः संपर्क साधून, या आमदारांची नाराजी दूर केली. दुसरीकडे, राष्ट्रवादीचे आमदार अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांना अंतरिम आदेश देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला. त्यामुळे अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांना मतदान करता आले नाही. काँग्रेसकडून चंद्रकांत हांडोरे आणि भाई जगताप हे दोन उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. महाविकास आघाडीचे संख्याबळ पाहता, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रत्येकी दोन उमेदवार सहज जिंकून आले. खरी लढत भाई जगताप आणि प्रसाद लाड यांच्यात होती. शेवटच्याक्षणी फडणवीस यांनी लाड यांना सेफ केले व काँग्रेसचे चंद्रकांत हंडोरे यांचा गेम झाला. फडणवीस यांनी महाआघाडीचे तब्बल २१ मते फोडल्याचे दिसून आले.
नाथाभाऊ अखेर विधिमंडळात पोहोचले; कार्यकर्त्यांनी ‘टरबूज’ फोडले!
प्रचंड राजकीय विरोध आणि रचण्यात आलेले षडयंत्रे उधळून लावत, खान्देशचा वाघ म्हणून ज्यांना ओळखले जाते, व ज्यांनी महाराष्ट्रात स्व. गोपीनाथ मुंढेंच्या बरोबरीने भाजप हा पक्ष वाढवत, त्याची शेठजी-भटजीचा पक्ष ही ओळख बुजवली ते एकनाथ खडसे अखेर पहिल्या फेरीच्या निकालातच विधिमंडळात पोहोचले आहेत. त्यांच्या या विजयाबद्दल त्यांच्या समर्थकांनी टरबूज फोडून जल्लोष केला.
विधानपरिषद निवडणुकीच्या पहिल्या फेरीत भाजपला १३३ मते मिळाली आहेत. म्हणजेच, भाजप आणि अपक्षांच्या संख्याबळाच्या व्यतिरिक्त भाजपला २० मते जास्त मिळाली आहेत. ही जास्तीची मते भाजपने महाविकास आघाडीकडून फोडली आहेत. काँग्रेसचे संख्याबळ ४४ आहे, प्रत्यक्षात पहिल्या फेरीत चंद्रकांत हंडोरेंना २२ तर भाई जगताप यांना २० मते पडली. याचा अर्थ त्यांना केवळ ४२ मते पडली. म्हणजे, काँग्रेसची दोन मते फुटली आहे. दुसर्या फेरीत भाई जगताप हे निवडून आले तर हंडोरे पडले. शिवसेने खरेच काँग्रेसला मते दिली का, हा प्रश्न असून, ती मते मिळाली असल्यास काँग्रेसची पाच मते फुटली, हे उघड होते.
———————-