मेहकर (तालुका प्रतिनिधी) – शालेय विद्यार्थी, विद्यार्थिनींसाठी असलेल्या मानव विकास मिशनच्या बसेस मनमानीपणे बंद करून डोणगाव परिसरातील विद्यार्थ्यांना ताटकळत बसायला लावणार्या एसटी महामंडळाच्या अधिकार्यांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आक्रमक पवित्रा घेऊन आज वठणीवर आणले. त्यामुळे तातडीने तीन बसेस उपलब्ध करून देत एसटी महामंडळाने अडकून पडलेले विद्यार्थी, विद्यार्थिनी घरी सोडले. त्यामुळे विद्यार्थ्यांनी व त्यांच्या पालकांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आभार व्यक्त केले आहेत.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने आज डोणगाव परिसरातील खेड्यावरून शिक्षण घेण्यासाठी येणार्या शालेय विद्यार्थी व विद्यार्थिनी यांना दोन तासापासून बस स्टॅन्ड येथे बसची वाट पाहत बसावे लागले. त्यामुळे बस लागत नसल्यामुळे सदर विद्यार्थ्यांनी स्वाभिमानी हेल्पलाइन सेंटर गाठले व ही बाब स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ. ज्ञानेश्वर टाले यांना सांगितली असता, लगेच स्वाभिमानी शेतकरी संघटनेची सर्व टीम घेऊन आगार नियंत्रण कार्यालयावर दाखल झाले. त्या ठिकाणाहून गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी, शिक्षण अधिकारी तसेच तालुक्याचे वाहतूक नियंत्रक, जिल्हा नियंत्रण यांना धारेवर धरत विद्यार्थ्यांना तात्काळ मानव विकासच्या बस उपलब्ध करून द्या, अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन करतो, तर संबंधित अधिकार्यांना निलंबित केल्याशिवाय मागे हटणार नाही, असा आक्रमक पवित्रा घेताच, सदर आगार प्रशासनात एकच गोंधळ उडाला व तात्काळ तीन बस उपलब्ध करून दिल्या. सदर बस स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या समोर शेलगाव, देऊळगाव कनका बु. इसवी, गोहगाव, पांगरखेड, बेलगाव, राजगड येथील विद्यार्थ्यांना बसमध्ये बसून बस रवाना करून दिल्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटना शांत झाली, व यानंतर विद्यार्थ्यांना वेळेवर बस उपलब्ध करून देण्यात याव्यात, जर का मानव विकासच्या बस या रस्त्याने धावल्या नाही तर संबंधित कर्मचारी अधिकार्यांची गय केली जाणार नाही, असा सूचक इशारासुद्धा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ. ज्ञानेश्वर टाले यानी दिला. यावेळी माजी तालुका अध्यक्ष अमोल धोटे, देवेंद्र आखाडे, नीलेश सदावर्ते, भूषण मोरे, रोहित माने, यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच विद्यार्थी, विद्यार्थिंनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. यावेळी सदर विद्यार्थ्यांना बस उपलब्ध करून दिल्यामुळे विद्यार्थ्यांनी एसटी बसमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा विजय असोच्या घोषणा दिल्या व आनंद व्यक्त केला. यानंतर कुठलीही अडचण असल्यास स्वाभिमानी हेल्पलाईन सेंटर येथे संपर्क करावा, असे आवाहनदेखील केले.