शेतकरी पुत्र संस्थेतर्फे रक्तदान व नेत्ररोग तपासणी शिबीर
सोलापूर (प्रतिनिधी) – वाढदिवसाचा व्यर्थ खर्च टाळून सामाजिक बांधिलकी जपत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा जिल्हाध्यक्ष विजय रणदिवे व त्यांचे बंधू नवनाथ रणदिवे यांच्या वाढदिवसानिमित्त शेतकरी पुत्र बहुउद्देशीय सामाजिक संस्था तुंगत यांच्यावतीने तुंगत ता पंढरपूर येथे विविध सामाजिक उपक्रम राबविले. यामध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात ७५ रक्तदात्यांनी रक्तदान केले. तसेच नेत्ररोग तपासणी शिबीर संपन्न झाले.
या शिबिरात तु़ंगत व परिसरातील ३६० नागरिकांनी सहभाग घेतला यापैकी १७० नागरिकांना संस्थेचे वतीने नंबर चे चष्मे मोफत देण्यात आले. तर या पैकी ३८ जणांना मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्याची गरज आहे असे डॉक्टरांनी सांगितले त्या सर्व पेशंटना मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यासाठी संस्थेच्या वतीने जबाबदारी घेऊन लवकरच पुढील नियोजन करण्यात येईल, असे विजय रणदिवे यांनी सांगितले.
या शिबिरासाठी पंढरपूर येथील नेत्र चिकित्सक डॉ खांडेकर, सोलापूरचे डॉ शिंदे व अकलूजचे डॉ कल्याणी यांनी सर्वांची नेत्र तपासणी केली. हे शिबीर यशस्वी करण्यासाठी नवनाथ रणदिवे, सागर रणदिवे, प्रदिप माने , औदुंबर चौधरी, नवनाथ गायकवाड, संतोष वाघमारे, भास्कर पवार, सचिन राऊत यांनी परिश्रम घेतले.