चिखली (शहर प्रतिनिधी) – दीड वर्षाच्या चिमुकलीसाठी त्याने मोठ्या आनंदाने भाड्याच्या खोलीत झोका बांधला. परंतु, त्याच झोक्याच्या दोरीने त्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याने चिखली शहरात हळहळ व्यक्त होत आहे. या आत्महत्येचे कारण अद्याप पुढे आले नसून, विष्णू संजय चिंचोले, चिखली असे मृतकाचे नाव आहे.
चिखली शहरातील राऊतवाडी परिसरात भाड्याच्या खोलीत पत्नी व दीड वर्षाच्या मुली सोबत राहणार्या विष्णू चिंचोले याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. पोलीस सूत्रानुसार, विष्णू (२८ वर्ष) हा मागील सहा सात महिन्यांपासून पत्नी व दीड वर्षाच्या मुलीसोबत चिखली येथे राऊतवाडी परिसरात घर भाड्याने घेऊन राहत आहे. मूळचा मालगणी येथील असलेल्या विष्णू यांच्याकडे एक ते दीड एकर शेती आहे. आधी चिखली ते मालगणी असा रिक्षा चालवून तो आपला उदरनिर्वाह करायचा. परंतु रिक्षा चालवून घर चालत नसल्या कारणाने तो चिखली येथील एका रेडिमेड कापडाच्या दुकानात सहा महिन्यांपूर्वी तो कामाला लागला होता. त्यामुळे पत्नी व चिमुकल्या मुलीसह राऊतवाडीत रहायला आला होता.
१९ डिसेंबर रोजी चिखलीचा बाजाराचा दिवस असल्याने त्यांची पत्नी मुलीला घेऊन बाजार आणण्यासाठी बाहेर गेलेली होती. घरी कोणीच नसतांना दुपारी साडेपाच वाजेच्या दरम्यान घराचा दरवाजा आतून बंद करून मुलीसाठी बांधलेल्या झोक्याच्या दोरीने गळफास घेऊन त्याने आत्महत्या केली. घटनास्थळी दाखल झालेल्या चिखली पोलिसांनी पंचनामा केल्यावर मृतकाचे शव विच्छेदनासाठी चिखली ग्रामीण रूग्णालय येथे नेण्यात आले होते. रात्री नऊ वाजेदरम्यान मालगणी गावात शोकाकुल वातावरणात त्यांचा अंत्यविधी पार पडला असून, आत्महत्या करण्याचे नेमके कारण काय? हे समजू शकलेले नाही.
—————