Breaking newsHead linesMaharashtraNagpurPolitical NewsPolitics

फोन टॅपिंगप्रकरणी विधानसभेत ‘राडा’; ‘आयपीएस’ रश्मी शुक्ला यांना कोण वाचवतय?

– नाना पटोले भिडले, अजित पवार अध्यक्षांना नडले!

नागपूर (विशेष राजकीय प्रतिनिधी) – फोन टॅपिंग प्रकरणात पुणे पोलिसांनी सादर केलेला केलेला क्लोजर रिपोर्ट न्यायालयाने फेटाळल्यानंतर विरोधी पक्षाने आक्रमक पवित्रा घेत, विधानसभा दणाणून सोडली. फोन टॅपिंगप्रकरणी आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्यावर गुन्हे दाखल झाले. पण सरकार बदलल्यानंतर त्यांना पाठीशी घालण्याचे प्रकार सुरु झाले आहेत. प्रश्नोत्तराचा तास बाजूला ठेऊन फोन टॅपिंगविषयी चर्चा करावी, या मागमीसाठी विरोधकांनी वेलमध्ये येऊन जोरदार घोषणाबाजी केली. पण कामकाज नियमाप्रमाणेच चालेल. नियमाप्रमाणे एक तास आधी सूचना येणे आवश्यक आहे, त्यामुळे ही सूचना नाकारण्यात येत असल्याचे सांगून विधानसभा अध्यक्षांनी यावर चर्चा घेण्यास नकार दिला. त्यावर विधानसभेचे अध्यक्ष सरकारला पाठीशी घालत आहात, त्यामुळे आम्ही वॉक आउट करतो, असे म्हणून विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी महाविकास आघाडीच्या आमदारांना घेऊन विधानसभेतून सभात्याग केला. विरोधी पक्षनेते अजित पवार आणि काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी राज्य सरकावर जोरदार हल्लाबोल चढवला. सरकार पळ काढत असल्याने आम्ही निषेध करत आहोत, असे पवार, पटोले म्हणाले. आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांनी भाजप सरकारच्या कालावधीत विधीमंडळातील सदस्यांसह अनेक मान्यवरांचे फोन बेकायदेशीरपणे टॅपिंग केले. यामुळे विधीमंडळाच्या सदस्यांच्या स्वातंत्र्याचा संकोच झाला असून, लोकशाहीला धोका निर्माण झाला आहे. या फोन टॅपिंग प्रकरणाचा मास्टर माईंड कोण आहे ? कोणाच्या आदेशाने हे फोन टॅपिंग करण्यात आले ? आता रश्मी शुक्ला यांना वाचविण्याचा कोण प्रयत्न करत आहे ? ही माहिती सभागृहाच्या समोर आणण्याची आग्रही मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सभागृहात केली. याकडे दुर्लक्ष करत अध्यक्षांनी कामकाज पुढे रेटण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे संतप्त झालेल्या विरोधी पक्षाच्या सदस्यांनी विधानसभा अध्यक्ष सरकारला पाठीशी घालत असल्याचा आरोप करत सभात्याग केला.

विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले, ‘आयपीएस’ अधिकारी रश्मी शुक्ला यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा या सभागृहाचे सदस्य नाना पटोले, माजी मंत्री बच्चू कडू, माजी खासदार संजय काकडे, माजी आमदार आशीष देशमुख, खासदार संजय राऊत, माजी मंत्री व विद्यमान विधान परिषद सदस्य एकनाथराव खडसे यांच्यासह अनेक मान्यवरांचे फोन बेकायदेशीरपणे टॅप केले. महाविकास आघाडी सरकारच्या काळात या प्रकरणाच्या चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती नियुक्त केली, समितीचा अहवाल देखील सरकारला मिळाला, अहवालानुसार पुण्याच्या बंड गार्डन पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला. कुलाब्यातल्या गुन्ह्यात तर ७५० पानांचे आरोपपत्र देखील दाखल झालेले आहे. ज्या गुन्ह्याचा तपास झालेला आहे, ज्या गुन्ह्याबाबत उच्चस्तरीय समितीचा अहवाल आलेला आहे, जो सभागृहाच्या सदस्यांच्या संदर्भातील गुन्हा आहे, त्या गुन्ह्याचा खटला चालविण्याला २० ऑक्टोबरला (२०२२) सरकारने परवानगी नाकारली? दुसरीकडे, बंडगार्डन पोलीस स्टेशनमध्ये दाखल गुन्ह्यात सरकारने क्लोजर रिपोर्ट कोर्टात दाखल केला. रश्मी शुक्लांना वाचवण्यामागे नेमके काय कारण आहे? कुणाच्या आदेशाने रश्मी शुक्ला फोन टॅप करीत होत्या? खटला चालला तर सूत्रधार कोण ? या प्रश्नांची उत्तरे सभागृहाला मिळाली पाहिजे, अशी आग्रही मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली.


भूखंडाचा श्रीखंड खाणार्‍या मुख्यमंत्र्यांचा धिक्कार!; चौथ्या दिवशीही महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानभवनाचा परिसर दणाणून सोडला!

घेतले खोके, भूखंड ओके… दिल्लीचे मिंधे, एकनाथ शिंदे… राज्यपाल हटाव, महाराष्ट्र बचाव… धिक्कार असो, धिक्कार असो, मिंधे सरकारचा धिक्कार असो… बेळगाव, कारवारसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे… राजीनामा द्या, राजीनामा द्या मुख्यमंत्री राजीनामा द्या…महापुरुषांचा अपमान करणार्‍या भाजप सरकारचा धिक्कार असो…भूखंडाचा श्रीखंड खाणार्‍या सरकारचा धिक्कार असो… भूखंडाचा श्रीखंड खाल्ला कुणी, मुख्यमंत्री मुख्यमंत्री…गुजरातला फॉक्सकॉन, महाराष्ट्राला पॉपकॉर्न अशा जोरदार घोषणा देत महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानभवनाचा परिसर आजही दणाणून सोडला. महाविकास आघाडीच्या आमदारांनी भूखंडाचा श्रीखंड वाटून मिंधे सरकारचा निषेध केला. विरोधी पक्षनेते अजित पवार आणि अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली आज महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानभवनाच्या पायर्‍यांवर येत ईडी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.


फोन टॅपिंग प्रकरणावरुन विधानसभेत विरोधक आक्रमक!

फोन टॅपिंग प्रकरणावरुन विधानसभेत आज विरोधक आक्रमक झाले. सभेत वेलमधून येऊन विरोधकांनी घोषणाबाजी केली. रश्मी शुक्ला फोन टॅपिंग विषयी चर्चा करण्याची मागणी विरोधकांनी केली. प्रश्नोत्तराचा तास रद्द करून आज फोनटॅपिंग प्रकरणावर चर्चा करण्याची मागणी विरोधकांनी केली. नाना पटोले यांनी हा मुद्दा उपस्थित केला. मात्र चर्चेची माग्ाणी फेटाळल्यामुळे वेलमध्ये येत विरोधी पक्षांनी घोषणाबाजी केली आणि सभात्याग केला. सत्ताबदल झाल्यावर रश्मी शुक्ला यांच्याबाबत क्लोजर रिपोर्टवरून नाना पटोलेंनी गृहमंत्र्यांचा यात सहभाग असल्याचा आरोप केला. तर पोलीस अधिकार्यांना पाठिशी घालण्याचे कारण काय, असा सवाल अजित पवारांनी केला. दरम्यान, दिशा सालियान मृत्यू प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले आणि भाजप आमदार नीतेश राणेंनी केली. दिशाच्या मृत्यूपूर्वीच्या पार्टीत कोण कोण होतं? पार्टीत मंत्री कोण होता? आणि हा तपास कुणाच्या राजकीय दबावामुळे थांबला? याची चौकशी करण्याची मागणी केली.


दिशा सालियन प्रकरणांची एसआयटीमार्फत चौकशी करणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी  विधानसभेत केली आहे. सध्या ही केस पोलिसांकडे असून कुणाकडे काही पुरावे असतील तर ते द्यावेत, असंही देवेंद्र फडणवीस म्हणालेत. देवेंद्र फडणवीस म्हणाले, दिशा सालियन मृत्यू प्रकरणी पोलिसांकडे केस सुरु आहे. या प्रकरणाची एसआयटी मार्फत चौकशी करण्यात येणार आहे.  ज्यांच्याकडे याचे  पुरावे आहेत त्यांनी ते द्यावे. दिशा सालियन केस कधीही सीबीआयकडे गेली नाही. सुशांतसिंग यांची केस सीबीआयकडे होती. नविन पुरावे आले असतील तर त्यांची चौकशी केली जाईल.  विरोधी पक्ष नेते अजित पवार  म्हणाले, दिशा सालियन हयात नसताना त्याबद्दल आणखी बोलून बदनाम करायचे नाही. तिच्या आई वडिलांनी हात जोडून विनंती केली, आम्हाला आता जगू द्या, दिशाला बदनाम केले जात आहे.  ती आम्हाला सोडून गेली आहे. दिशा सालियनची चौकशी करायचं असेल तर पुजा चव्हाणची देखील चौकशी करा. चौकशी करायची असेल तर सर्वच चौकशी करता येईल. फक्त राजकारण करु नका. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!