Breaking newsHead linesMaharashtraMetro CityPoliticsWorld update

Breaking! सुशीलकुमार शिंदे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार?

  • विरोधक एकमेव उमेदवार देणार, शरद पवार खेळणार निर्णायक खेळी
  • मुंबई सोडून शरद पवारही दिल्लीत पोहोचले, उद्या महत्वपूर्ण बैठक

हेमंत चौधरी

राष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांचा एकमेव उमेदवार देण्याचे जवळपास निश्चित झाले असून, हा उमेदवार निवडून आणण्याची जबाबदारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर सोपाविण्यात आली आहे. यापूर्वी प्रतिभाताई पाटील यांना राष्ट्रपती करण्याचा असाच प्रयत्न पवारांच्या सहमती एक्स्प्रेसने यशस्वी केलेला आहे. काँग्रेसच्यावतीने माजी केंद्रीय गृहमंत्री व राज्याचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांना या निवडणुकीच्या आखाड्यात उतरविण्याचे घाटत असून, त्यासाठी शिंदे हे आज (दि.१९) तातडीने राजधानी दिल्लीला रवाना झाले.
राष्ट्रपती निवडणुकीतून शरद पवार, फारुख अब्दुला यांनी माघार घेतल्यानंतर ही निवडणूक राष्ट्रीय पातळीवर चर्चेची झाली होती. सत्ताधारी भाजपने अद्याप आपले पत्ते खोलले नाहीत. या निवडणुकीत विरोधकांनी काँग्रेसचा एकमेव उमेदवार देण्याचे निश्चित केले आहे. त्यासाठी सर्वसहमती बनविण्याची जबाबदारी शरद पवार यांच्यावर सोपाविण्यात आली होती. या निवडणुकीसाठी काल पवार यांनी सुशीलकुमार शिंदे यांचे नाव पुढे केले. त्यामुळे आज काँग्रेसने सुशीलकुमार शिंदे यांना तातडीने नवी दिल्लीत बोलावून घेतले व शिंदेदेखील सोलापुरातून दिल्लीला गेले आहेत. शरद पवार हेदेखील आजच तातडीने दिल्लीत पोहोचले आहेत. उद्या विधान परिषदेच्या १० जागांसाठी निवडणूक होत असताना, त्याची रणनीती आखण्यासाठी पवार हे मुंबईत थांबणार होते. परंतु, उद्या विरोधी पक्षाच्या प्रमुख नेत्यांची दिल्लीत बैठक असल्याने सुरुवातीला सुशीलकुमार शिंदे व नंतर शरद पवार हे दिल्लीत पोहोचले. राज्यातील निवडणुकीची जबाबदारी अजितदादा पवार, एकनाथ खडसे, बाळासाहेब थोरात यांच्यावर सोपाविण्यात आली असून, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सर्व घडामोडींवर प्रत्यक्ष ठेवून राहणार आहेत. सहाही जागा निवडून येण्याची खात्री झाल्यानंतर पवारांनी मुंबई सोडल्याचे त्यांच्या निकटवर्तीयाने सांगितले आहे. तसेच, सुशीलकुमार शिंदे हे शरद पवारांना आपले राजकीय गुरु मानतात. आता राष्ट्रपती पदासाठीदेखील पवारांनीच त्यांचे नाव पुढे केले आहे. त्यामुळे शिंदे यांना या निवडणुकीत निवडून आणण्याची जबाबदारीदेखील पवार यांच्याच खांद्यावर राहणार असल्याने भाजप व मोदी सरकारची डोकेदुखी चांगलीच वाढली आहे.
राष्ट्रपती निवडणुकीसाठी २९ जून ही नामांकन भरण्याची शेवटची तारीख असून, १८ जुलैरोजी मतदान तर २१ जुलैरोजी निकाल आहे. या निवडणुकीसाठी एकूण १० लाख ८० हजार १३१ मतांची गोळाबेरीज राहणार आहे. ज्या उमेदवाराला ५ लाख ४० हजार ०६५ पेक्षा जास्त मतमूल्य मिळेल, तो उमेदवार राष्ट्रपती बनणार आहे. सद्या खासदार व आमदारांची आकडेवारी पाहाता, भाजपचा उमेदवार राष्ट्रपती बनण्याची शक्यता जास्त आहे. या निवडणुकीसाठी लोकसभेचे ५४० व राज्यसभेचे २२७ खासदार आणि देशातील एकूण ४ हजार ३३ आमदार मतदान करतील. एका खासदाराला ७०० इतके मतमूल्य मिळणार आहे.
या निवडणुकीसाठी शिवसेना व तृणमूल काँग्रेस यांनी शरद पवार यांचे नाव पुढे केले होते. परंतु, पवारांनी स्पष्टपणे नकार दिला. तेव्हाच पवार हे काही तरी खेळी करत असल्याचे सर्वांच्या लक्षात आले होते. अखेर अपेक्षेप्रमाणे त्यांनी त्यांचे राजकीय शिष्य व काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे यांचे नाव पुढे केले. शिंदे हे दलित समाजातील नेते असून, त्यांच्या गृहमंत्रीपदाच्या काळात त्यांनी अत्यंत धाडसी निर्णय घेतले होते. कसाबसह अनेक दहशतवाद्यांना फासावर लटकविण्यात त्यांनी महत्वाची भूमिका बजावली होती. शिंदे यांच्या व्यतिरिक्त नितीशकुमार, मायावती, आरिफ मोहम्मद खान, अमिंदर सिंग या नेत्यांची नावेदेखील पुढे आली होती. परंतु, त्यांनी निवडणूक लढविण्यास नकार दिला आहे.
दुसरीकडे, भाजपने मात्र अद्याप आपला उमेदवार जाहीर केला नसून, पक्षाने पक्षप्रमुख जे.पी. नड्डा आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यावर राजकीय पक्ष आणि खासदारांशी चर्चा करण्याची जबाबदारी सोपावलेली आहे. संसदेत व बहुतांश विधानसभेत भाजपकडे पुरेसे संख्याबळ असल्याने आपलाच उमेदवार राष्ट्रपती बनेल, अशी भाजपला खात्री आहे. परंतु, डावे पक्ष, प्रमुख विरोधी पक्ष, छोटे प्रादेशिक पक्ष यांच्या सर्वसहमती बनविण्यासाठी शरद पवार, ममता बॅनर्जी, सिताराम येंचुरी आदींनी पुढाकार घेतल्याने ही निवडणूक चुरशीची होणार आहे. त्यातच आता शिंदे यांचे नाव पुढे आल्याने भाजपची डोकेदुखी चांगलीच वाढली आहे.

(लेखक हे राज्यातील ज्येष्ठ पत्रकार व ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’चे पश्चिम महाराष्ट्र संपादक आहेत)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!