कर्जत (आशीष बोरा) – कर्जत तालुक्यात एसटी डेपोचा प्रश्न गेली अनेक वर्ष भिजत पडलेला असताना सर्व सामान्य लोकांच्या प्रवासासाठी आधार असलेल्या एसटी सेवेकडे लक्ष देण्याची गरज असून, याकडे लोकप्रतिनिधी त्याचे कार्यकर्ते अभ्यासपूर्ण पद्धतीने पाहतील का? असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत. महत्वपूर्ण अशा सार्वजनिक प्रवासी सेवेकडे एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करणार्या लोकप्रतिनिधींचे अक्षम्य दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे.
कर्जत हा तालुका गेली काही वर्षात विविध कारणाने गाजतो आहे, सध्या येथील राजकारणाने सर्वाचे लक्ष वेधले असले तरी सर्वसामान्य जनतेच्या अनेक छोट्या छोट्या अडचणीकडे लक्ष देण्यास मात्र कोणालाच वेळ नाही का असा प्रश्न उपस्थित होतो आहे. एसटीची सेवा तशी सर्वसामान्यांसाठी अत्यंत महत्वाची मात्र त्यात अनियमितता, अपुरेपणा, विस्कळीतपणा यामुळे नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत, या प्रश्नाचा बारकाईने अभ्यास करून तो प्रश्न सोडविण्यासाठी कोण पाठपुरावा करणार हा प्रश्न आहे. तालुक्यात अनेक गावात एसटीची प्रवासी सेवा उपलब्ध नाही, कर्जत हे तालुक्याचे गाव पण येथून बाहेर पडायला व रात्री उशीरा यायला सोय नाही, म्हणाव्या अशा लांब पल्ल्याच्या गाड्या नाहीत, गेली अनेक वर्षापासून ज्या गाड्या सुरू आहेत त्या वेळेवर येत नाहीत, यातील अनेक गाड्यामध्ये सातत्य नाही, बसस्थानकात योग्य त्या सुविधा नाही. साधे प्रवाशांना पिण्यासाठी पाणी ही उपलब्ध नाही, तालुक्याच्या ठिकाणी येण्यासाठी व पुन्हा गावी जाण्यासाठी अनेक गावातून योग्य वेळी गाड्या नाहीत, एखादी गाडी असेल तर ती अचानक रद्द केली गेली तर त्या गाडीच्या भरवश्यावर असलेल्या प्रवाशांचे प्रचंड हाल होतात, त्याकडे लक्ष द्यायला यंत्रणा नाही. कर्जतमध्ये शिक्षणासाठी अनेक गावातून विद्यार्थी येतात त्यांना सायंकाळी घरी जायचे असते, मात्र अचानक गाडी रद्द झाली असल्याचे समजते अशावेळी त्या विद्यार्थ्याचे, ज्येष्ठ नागरिकांचे खूप हाल होतात. अनेक गाड्या ठरलेल्या वेळेत येतच नाहीत, अशा अनेक समस्यांच्या विळख्यात कर्जत तालुक्यातील प्रवासी सापडले आहेत व याकडे लोकप्रतिनिधीनी गांभीर्याने पाहणे आवश्यक आहे.
कर्जत तालुक्यातील जनतेला लांब पल्ल्याच्या गाड्यांची आवश्यकता आहे. अनेक विद्यार्थी शिक्षण घेत असलेले लातूर, हायकोर्टात जाण्यासाठी औरंगाबाद, विभागीय आयुक्त कार्यालय असलेले नाशिक, देवस्थान असलेले पंढरपूर, अक्कलकोट, जेजुरी, व्यापारी ठिकाण असलेले सोलापूर, अशा विविध ठिकाणी थेट जाण्यासाठी कर्जत मधून सोय नाही. कर्जतसाठी एसटी आगाराचा प्रश्न अनेक पंचवार्षिक निवडणुका गाजवतो आहे, मात्र तो वरिष्ठ राजकारणात अडकला असून, याबाबत एसटी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकार्यांकडूनच माहिती मिळणे अपेक्षित आहे. माजीमंत्री प्रा. राम शिंदे यांना आपल्या पाच वर्ष मंत्रीपदाच्या कारकिर्दित हा प्रश्न सोडविण्यात यश आले नाही, येथे आगार होऊच शकत नाही असे ते म्हणत असताना त्याच्या नंतर आलेले आ. रोहित पवार यांनी कर्जत आगार (डेपो) मंजूर करून त्याच्या बांधकामाला सुरुवातही केली असल्याचे सांगितले जात आहे, याचा अर्थ काय समजायचा, आगाराच्या प्रश्नावर पोटतिडकीने आवाज उठविणारे, बोलणारे, समर्थन करणारे सर्वच पक्षाचे कार्यकर्ते जनतेच्या अडचणी वर कधी बोलतील का?
कर्जतचे आगार होईल तेव्हा होवो मात्र एसटीच्या सेवेत सुधारणा करण्याची तातडीने गरज आहे. यासाठी कोणता पक्ष व कोणते आमदार पुढाकार घेतील याकडे जनतेचे लक्ष राहणार आहे. यापूर्वी अनेकदा कर्जतसाठी खास गाड्या देण्यात आल्या त्या गाड्याचे पुढे काय झाले त्या का बंद झाल्या हे पाहणेसुद्धा आवश्यक आहे, मात्र कार्यक्रमापुरता देखावा करून जनतेचे प्रश्न सुटत नसतात हे लक्षात घेण्याची गरज असून जनतेनेही आपल्या स्वत:च्या प्रश्नासाठी राजकारणावर दबाव ठेवण्याची ताकद ठेवली पाहिजे, मात्र आज काल ते होत नाही म्हणून अनेक प्रश्न ही सुटत नाहीत ही शोकांतिका आहे.
कर्जत बसस्थानकात आकर्षक इमारत उभी राहिली. मात्र येथील एसटी बसच्या सेवेत सुधारणा होणे बरोबरच बसस्थानकात डांबरीकरण होण्याची गरज असून, तालुक्यातील मिरजगाव बसस्थानकाचे उद्घाटन, राशीन बसस्थानकाचे नूतनीकरन आदी प्रश्नाकडेही तातडीने लक्ष देण्याची गरज आहे.
———————