‘उठ दुपारी अन घे सुपारी’!; सुषमा अंधारेंची राज ठाकरेंवर बोचरी टीका
मुंबई (प्रतिनिधी) – ‘आमच्याकडे एक असा माणूस आहे पठ्ठ्या.. उठ दुपारी अन् घे सुपारी असा त्यांचा कार्यक्रम असतो. याला थोडं बोलेन, त्याला थोडं बोलेन, काही वेळासाठी विचारवंत होईल, मध्येच मिमिक्री कलाकार होईल असा त्यांचा कार्यक्रम असतो.’ अशा शब्दांत शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांच्यावर नामोल्लेख टाळून बोचरी टीका केली. राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या टीकेला अंधारे यांनी जशास तसे प्रत्युत्तर दिले. त्यांची महाप्रबोधन यात्रेची सभा मुलुंडमध्ये झाली. यावेळी त्यांनी भाजप, शिंदे गटासह मनसेवर टीका केली. मनसे धारावी पॅटनबाबत का बोलत नाही? अंगावर केस नसली तरी काही फरक पडत नाही. फक्त वाया गेलेली केस असू नये, असा हल्लाही त्यांनी राज ठाकरेंवर नाव न घेता चढवला.
मुंबईतल्या नेस्को मैदानावर गटाध्यक्षांच्या मेळाव्यात बोलताना राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या आजारपणावरून तसेच अकार्यक्षमतेवरून निशाणा साधला होता. राज ठाकरेंनी केलेल्या त्या टीकेला सुषमा अंधारे यांनी उत्तर दिले आहे. अचानक गुहेतून बाहेर येतात, अचानक सभा घेतात. त्यानतंर पुन्हा पुढच्या निवडणुकीलाच येतात. दोनच मुद्दे मांडा पण व्यवस्थीत मांडा असा खोचक सल्लाही सुषमा अंधारे यांनी दिला. मी यालाही थोडं बोलेन, त्यालाही बोलेन, मधेच मी विचारवंत होईल, मिमिक्री आर्टिस्ट होईन, मधेच पेंटर होऊन आणि त्यावरून मी कुणीतरी मोठा आहे, असे लोक समजतील. भावाच्या आजारपणावर बोलणार्या आणि चेष्टा करणार्या नेत्यावर काय बोलू, अशा शब्दांत सुषमा अंधारे यांनी राज ठाकरे यांच्यावर टीकास्त्र डागले. राज ठाकरे यांचे टोलचे आंदोलन म्हणजे कावळा बसायला आणि फांदी तुटायला असं होतं. सब मॅनेज किया. वडापाव गाडी, गरीबांवर जोर जबर दाखवत आहेत. पण इमारतीत व्यवसाय करणाऱ्यांवर कधी जोर दाखवणार? असा सवाल सुषमा अंधारे यांनी केला. यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही निशाणा साधला. महिलांचे प्रश्न ऐरणीवर असताना देखील देवेंद्र फडणवीस लक्ष घालत नाही. त्यावेळी तुमच्या पदाचा राजीनामा देऊन तुम्ही घरी बसा, अशी टीका त्यांनी केली.
——————