कर्जत (प्रतिनिधी) – सामाजिक कार्यात रोटरी क्लब ऑफ कर्जत सिटीने पर्यावरणामध्ये उत्तम कार्य उभारले आहे. ज्याचे फलित आगामी काळात कर्जतकर निश्चित अनुभवेल, असे प्रतिपादन पास्ट डिस्ट्रिक्ट गर्व्हनर प्रमोद पारीख यांनी केले. ते रोटरी क्लब ऑफ कर्जत सिटीच्या पदग्रहण समारंभप्रसंगी बोलत होते. रोटरी क्लब ऑफ कर्जत सिटीचे अध्यक्ष म्हणून संदीप गदादे, उपाध्यक्ष म्हणून काकासाहेब काकडे तर सचिव म्हणून सचिन धांडे यांनी पदग्रहण केले.
यावेळी डिस्ट्रिक्ट चेअर रोटरी फाऊंडेशनचे मनीष नय्यर, असिस्टंट गव्हर्नर अड अमित बोरकर यांच्यासह कर्जत रोटरीचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी नूतन सदस्यांना रोटरीची मानाची पिन बहाल करण्यात आली. मार्गदर्शन करताना मनीष नय्यर म्हणाले की, रोटरी क्लब एक सामाजिक संस्था असून, याद्वारे विविध समाजपयोगी उपक्रम राबविले जाते. यात उपलब्ध होणार्या निधीमधून ९५ टक्के रक्कम याच कामासाठी वापरली जाते. ज्याचा प्रत्येक रोटरीयनला अभिमान आहे. कर्जत रोटरी क्लबने याच धर्तीवर काम केले आहे. प्रास्ताविक करताना रोटरीचे अध्यक्ष संदीप गदादे म्हणाले की, सर्व सदस्यांनी दिलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडण्याचा आपला मानस असून, यासाठी सर्वाचे सहकार्य अपेक्षित असंल्याचे म्हटले. यावेळी पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, चार्टर प्रेसिडेंट डॉ संदीप काळदाते, प्रा. विशाल मेहेत्रे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चंद्रकांत राऊत यांनी केले तर आभार सचिव प्रा. सचिन धांडे यांनी मानले.