चिखली (विशेष प्रतिनिधी) – पीकविम्याची आधीच तुटपुंजी रक्कम जमा झाली असताना, ती बँकेतून काढण्यावरही स्टेट बँकेच्या साखरखेर्डा येथील शाखेने प्रतिबंध घातले होते. पैसे ‘होल्ड’ केल्याने शेतकर्यांत तीव्र संताप व्यक्त होत होता. त्यामुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी या बँकेत जाऊन पैसे काढण्यावरील निर्बंध हटविण्यास सांगितले. अन्यथा, तीव्र आंदोलनाचा इशारा दिला. त्यामुळे बँकेने तत्काळ होल्ड काढण्याचे आश्वासन दिले, व शेतकरीवर्गाने समाधान व्यक्त केले आहे.
स्टेट बँक साखरखेर्डा येथे शेतकर्यांच्या खात्याला लावलेले होल्ड काढण्यासाठी महाविकास आघाडीच्यावतीने नेत्यांनी भेट दिली. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) जिल्हा संपर्कप्रमुख प्रा.नरेंद्र खेडेकर यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शिवदास रिंढे, शिवसेना जिल्हा उपप्रमुख बद्रीभाऊ बोडखे, शिवसेना तालुकाप्रमुख महेंद्र पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष अनिल पाटील, खरेदी-विक्री संघाचे संचालक गजानन तुपकर, माजी पंचायत समिती सदस्य नारायण खरात, प्रदीप तुपकर, विनोद बेंडमाळी आदी नेत्यांचा या शिष्टमंडळात समावेश होता. या नेत्यांनी बँक अधिकार्याची भेट घेतली. फिल्ड अधिकारी गव्हाळे यांनी शेतकर्यांच्या खात्याला लावलेले होल्ड तात्काळ काढण्याचे आश्वासन दिले. पीकविम्याचे पैसे जमा झाल्यामुळे शेतकर्यांना थोडा का होईना दिलासा मिळाला होता, पण बँकेने खात्याला लावलेल्या होल्डमुळे शेतकर्यांमधे नाराजी होती. आता बँकेच्या अधिकार्यांनी दिलेल्या आश्वासनामुळे उपस्थित शेतकर्यांमधे आनंदाचे वातावरण तयार झाले आहे.