Breaking newsHead linesMaharashtraMumbai

ग्रामपंचायत निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज ऑफलाईन भरण्यास परवानगी, २ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ

मुंबई (प्राची कुलकर्णी) – सद्या राज्यभरात ग्रामपंचायत निवडणुकीची प्रक्रिया सुरु आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवार प्रचंड धावपळ करत आहेत. मात्र, निवडणूक आयोगाची वेबसाईट चालत नसल्याने राज्यभरात गोंधळ उडाला आहे. वेबसाईट डाऊन झाल्याने अर्ज भरण्यात अडचणी येत होत्या. ही बाब पाहाता, निवडणूक आयोगाने ग्रामपंचायत निवडणुकीचे अर्ज ऑफलाईन भरण्याची परवानगी दिली आहे. तसेच नामनिर्देशनपत्र सादर करण्याची मुदत २ डिसेंबर २०२२ रोजी सायंकाळी ५.३० पर्यंत वाढवण्यात आल्याची माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू.पी. एस. मदान यांनी दिली आहे. राज्यातील हजारो उमेदवार काल रात्रीपासून खोळंबले असून, २ डिसेंबर ही उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख होती. एक तर ऑफलाइन अर्ज स्वीकारा किंवा ऑनलाइन अर्जासाठीची मुदत वाढ द्या, अशी मागणी राज्यभरातून करण्यात येत होती. त्यामुळे राज्य निवडणूक आयोगाने मुदतवाढ दिली आहे.

राज्य निवडणूक आयुक्तांनी सांगितले, की विविध जिल्ह्यांतील ग्रामपंचायतींच्या सदस्यपदांसह थेट सरपंचपदाच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याची मुदत २ डिसेंबर २०२२ रोजी सायंकाळी ५.३० पर्यंत वाढवण्यात आली आहे. ग्रामपंचायतींच्या सदस्यपदांसह थेट सरपंचपदाच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी पारंपरिक पद्धतीने (ऑफलाईन) नामनिर्देशनपत्र सादर करण्याची मुभा देण्यात आली आहे. राज्य निवडणूक आयोगाने ९ नोव्हेंबर २०२२ रोजी राज्यातील ७ हजार ७५१ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांची घोषणा केली होती. त्यानुसार दि.२८ नोव्हेंबर २०२२ ते २ डिसेंबर २०२२ (दुपारी ३ वाजेपर्यंत) या कालावधीत संगणक प्रणालीद्वारे नामनिर्देशनत्र सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यात आता अंशत: दुरूस्ती करून नामनिर्देशनपत्र पारंपरिक (ऑफलाईन) पद्धतीने २ डिसेंबर २०२२ रोजी सायंकाळी ५.३० पर्यंत सादर करता येतील, असे राज्य निवडणूक आयुक्तांच्या वतीने सांगण्यात आले आहे.

उद्या, म्हणजेच २ डिसेंबरची अंतिम मुदत असल्याने काल रात्रीपासूनच विविध गावांत नेट कॅफेवर, तसेच सेतु सुविधा केंद्रांवर इच्छुकांचा खोळंबा झालेला दिसून आला. मात्र ऑफलाइन पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार असल्याने उमेदवारांना मोठा दिलासा मिळाला आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उद्या शेवटचा दिवस आहे, मात्र सर्व्हर डाऊन झाल्याने अर्ज भरता येत नसल्याच्या तक्रारी येत आहेत. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज भरण्यासाठी परवानगी द्यावी अशी आशयाचे पत्र राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे यांनी राज्य निवडणूक आयोगाला लिहिले होते. अखेर निवडणूक आयोगाने ऑफलाईन अर्ज भरण्याची परवानगी दिली आहे.


ग्रामपंचायत निवडणूक कार्यक्रम

अर्ज दाखल करण्याची मुदत – २८ नोव्हेंबर ते २ डिसेंबर
अर्ज छाननी – ०५ डिसेंबर
अर्ज मागे घेण्याची तारीख – ७ डिसेंबर
मतदान – १८ डिसेंबर
मतमोजणी आणि निकाल – २० डिसेंबर
—————–

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!