– दोन्ही गटांनी समजस्यांने निर्णय घेऊन ग्रामपंचायत बिनविरोध करण्याची गरज!
चिखली (एकनाथ माळेकर) – सर्वोत्तम मुलींच्या जन्मदरामुळे राज्यभर चर्चेत आलेल्या मिसाळवाडी गावाची ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता मावळली आहे. सरपंचपदावरून तिढा निर्माण झाला असून, बिनविरोध निवडणुकीला सत्ताधारी व विरोधक अशा दोन्ही बाजूने खीळ बसल्याने ग्रामस्थांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे. विरोधी बाजूला यावेळेस सरपंच पद हवे आहे, तर सत्ताधारी बाजू सरपंच पद सोडायला तयार नाही, यावरून चर्चेच्या फेर्या थांबल्या आहेत. गत पंचवार्षिकला अत्यंत धक्कादायक निकाल लागून ही ग्रामपंचायत तरुण नेतृत्वाच्या हातात आली होती.
मिसाळवाडी हे कर्तृत्ववान लोकांचे गाव म्हणून ओळखले जाते. या गावाने सर्वाधिक शिक्षक, आदर्श सरकारी नोकर, आणि याच गावातून पत्रकारितेत सर्वोत्तम किर्तीमान स्थापन करून ‘पत्रकारितेतील महाराष्ट्र गौरव’ पुरस्काराने गौरविलेले पुरुषोत्तम सांगळे यासारखे ज्येष्ठ पत्रकार, संपादक या गावाने दिलेले आहेत. जिल्हा कोषागार अधिकारी दिनकर बारस्कार साहेब, आदर्श मुख्याध्यापक प्रवीण मिसाळ हेदेखील याच गावाचे सुपुत्र असून, गावाचे मुलींचे लिंग गुणोत्तर सर्वोत्तम असल्याबाबत तत्कालिन ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी या गावाचा गौरव केला होता. अशा या आदर्श गावाची ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी ग्रामस्थांची मागणी आहे. परंतु, सत्ताधारी पक्ष व विरोधी पक्ष या दोघांमध्ये एकमत होत नसल्याने राजकीय पेच निर्माण झालेला आहे.
सत्ताधारी पक्षाने मागील पाच वर्षे सरपंचपद भोगल्याने, हे पद यावेळेस आपणास मिळावे, किंवा गावातील आदर्श व्यक्तिमत्व देवीदास मिसाळ (साधुबुवा) यांना द्यावे, असा काही ज्येष्ठ ग्रामस्थांसह विरोधी पक्षाचा आग्रह आहे. तर सत्ताधारी पक्ष सरपंचपद सोडण्यास तयार नाही. उपसरपंचपद व सदस्यांच्या जागा अर्ध्या अर्ध्या वाटून घेऊ, असा प्रस्ताव सत्ताधारी पक्षाने दिलेला आहे. त्यामुळे बिनविरोध निवडणुकीचे घोडे पुढे सरकण्यास तयार नाही. गावकर्यांचा आग्रह बिनविरोध निवडणुकीचा असताना, सत्ताधारी व विरोधी पक्षाने सरपंच पदासह ग्रामपंचायत बिनविरोध केली नाही तर मात्र, दोन्हीही गटांना या निवडणुकीत ग्रामस्थांच्या रोषाला सामोरे जावे लागू शकते, व ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल धक्कादायक लागू शकतो, असे राजकीय चित्र आहे. त्यामुळे दोन्हीही पक्षांनी एकमेकांचा सन्मान ठेवून सरपंचपदासह ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्यासाठी ग्रामस्थांचा चांगलाच दबाव निर्माण झालेला आहे.
————