सिंदखेडराजा, देऊळगावराजा तालुक्यांत वाळूतस्करांचा हैदोस सुरूच; तहसीलदाराची नुसती स्टंटबाजी, ग्रामस्थांत चर्चा!
– महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनीच या दोन तालुक्यातील वाळूतस्करीत लक्ष घालण्याची गरज
– खडकपूर्णा नदीपात्रातून सुरु असलेल्या वाळूतस्करीचे व्हिडिओ ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’ देणार महसूलमंत्र्यांना!
चिखली/सिंदखेडराजा (एकनाथ माळेकर) – सिंदखेडराजा व देऊळगावराजा तालुक्यातील महसूल विभागाच्या अधिकार्यांच्या ‘अर्थ’पूर्ण आशीर्वादामुळे वाळूतस्करांनी खडकपूर्णा नदी पोखरली असून, या नदीपात्रातील वाळू थेट, जालना, औरंगाबाद, बुलढाणा, चिखली या शहरापर्यंत पोहोचत आहे. या वाळूतस्करीतून महिनाकाठी तब्बल दीड कोटी रुपयांची अवैध उलाढाल होत असल्याचा संशय असून, एसीबी, ईडी व इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने या दोन्ही तालुक्यांच्या महसूल अधिकार्यांच्या मालमत्तेची चौकशी करण्याची गरज निर्माण झाली आहे. यापूर्वी, ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’ने निमगाव हद्दीतील नदीपात्रातून बोटीद्वारे होणारी वाळूतस्करी उघडकीस आणली होती. (https://breakingmaharashtra.in/khadakpurna_river_sand_mafia/) सुरुवातीला आमची हद्द नाही, असे म्हणणार्या देऊळगावराजा व सिंदखेडराजा तहसीलदारांनी अखेर ही वाळूतस्करी चक्क महसूलमंत्र्यांपर्यंत पोहोचल्यानंतर नदीपात्रात पथक पाठवून वाळूतस्करांची बोट बुडविली होती. (https://breakingmaharashtra.in/sand_boat_distry/) आतादेखील किरकोळ कारवाई करून त्याचा प्रसारमाध्यमांतून उदोउदो करणार्या तहसीलदारांना खडकपूर्णा पात्रातून चालणारी वाळूतस्करी दिसत नाही का?, असा संतप्त सवाल परिसरात उमटत आहे. निमगाव, दिग्रस बुद्रूक, इसरूळ गावांच्या हद्दीसह नदीपात्रातून खुलेआम चोरटी वाळू वाहतूक होत असून, ही वाळूतस्करी सिंदखेडराजा व देऊळगावराजा तहसीलदार रोखणार कधी? असा प्रश्न निर्माण झाला आहे. याबाबतचे व्हिडिओ लवकरच ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’ची टीम राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना देणार आहेत.
‘वाळू तरस्करांनी खडकपूर्णा पोखरून महिन्याकाठी दीड कोटीची वाळू तस्करी; कोणते अधिकारी झाले मालामाल?’ या मथळ्याखाली ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’ने खूप वेळेस आवाज उठवला होता. परंतु मुजोर महसूल विभागाचे अधिकारी यांनी कोणत्याही प्रकारची दाद दिली नव्हती. खडकपूर्णा पात्रातील वाळूतस्करीबाबत ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’ने त्यावेळेस राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनासुद्धा अवगत केले होते. परंतु, सिंदखेडराजा व देऊळगावराजा महसूलचे अधिकारी यांनी सदर वाळूतस्करी आमच्या हद्दीत येत नाही, असे सांगून काखा वर केल्या होत्या. परंतु, देऊळगावराजा व सिंदखेडराजा हद्दीतील शेवटच्या टोकावर असलेल्या निमगाव येथील वाळूपात्रातून तस्करी करणारी एक बोट कर्मचार्यांना पाण्यात बुडवण्यास ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’ने भाग पाडले होते. परंतु दोन्ही महसूलचे अधिकारी यांनी थातूरमातूर कारवाई करून दोन-तीन दिवस वाळूतस्करी बंद झाली होती, व त्यावेळेस एक बोट बुडवण्यापलीकडे कोणतीही कारवाई महसूलच्या कर्मचार्यांनी केले नाही. शेवटी दिग्रस बुद्रुक येथील माजी सरपंच यांनी गावातील वाहतुकीला कंटाळून स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला होता. त्यालाही न जुमानता रेतीमाफियांनी आपली वाळूचोरी सुरूच ठेवलेली आहे. या वाळूतस्करांना कुणाचा वरदहस्त आहे? याची वरिष्ठ पातळीवरून चौकशी करण्याची गरज निर्माण झालेली आहे.
सिंदखेडराजा तहसीलदार यांनी काही दिवसापूर्वी एक ट्रॅक्टर व एक टिप्परवर दंडात्मक कारवाई केली होती. ठरावीक प्रसारमाध्यमातून याबाबत फार मोठा उदोउदो करण्यात आला. परंतु वास्तविक पाहता, सर्वात जास्त वाळूची चोरटी वाहतूकही सिंदखेडराजा, देऊळगावराजा, चिखलीमार्गे बुलढाणा होत आहे. दररोज रात्रीला वाळूचे टिप्पर, डंपर वेगात या मार्गावरून चोरटी वाळू नेत आहेत. महसूलच्या कर्मचार्यांना याची कल्पना नाही का? असा प्रश्न निर्माण होत आहे. सिंदखेडराजाचे तहसीलदार यांनी ज्या ट्रॅक्टरवर कारवाई केली, ते ट्रॅक्टर तर सिंदखेडराजा तहसील कार्यालयाजवळच रेतीची वाहतूक करत होते. त्याची माहिती मिळाल्यानंतर तहसीलदारांनी एक ट्रॅक्टर व एक टिपरवर दंडात्मक कारवाई केली. परंतु रात्रीला होणार्या चोरट्या रेतीवाहतुकीवर हेच तहसीलदार कारवाई कधी करणार? असा प्रश्न आता निर्माण झालेला आहे.
सिंदखेडराजा व देऊळगावराजा तालुक्यात वाळूतस्करांची प्रचंड मुजोरी वाढली असून, हे वाळूतस्कर त्यांच्याविरोधात आवाज उठविणार्यांच्या जीवावर उठतात. आता सिंदखेडराजाचे तहसीलदार आपण वाळूतस्करांवर खूप कारवाई करत असल्याचे दाखवत आहेत. परंतु, त्यांच्या हद्दीतून खडकपूर्णा नदीपात्रातून सुरु असलेली वाळूतस्करी त्यांना दिसत नाही का? रात्रीच्यावेळी जी वाळूचोरी चालते, ती कधी रोखणार आहेत? वाळूतस्करी रोखण्याचा नुसता ‘स्टंट’ नको तर थेट कारवाई हवी आहे. खडकपूर्णा पोखरणार्या वाळूतस्करांच्या मुसक्या आवळून शासनाला कोट्यवधी रुपयांचा चुना लावणार्यांकडून हा पैसा वसूल होणे गरजेचे आहे, अशा प्रतिक्रिया नागरिक बोलून दाखवत आहेत.
—————–