चिखली (महेंद्र हिवाळे) – २६ नोव्हेंबर अर्थात भारतीय संविधान गौरव दिनाचे औचित्य साधून अखिल भारतीय संघर्ष संघटना महाराष्ट्र राज्यच्यावतीने संविधान उद्देशिका चिखली शहरामध्ये घरोघरी वाटप करण्याचा उपक्रम राबविला जात आहे. एकता बंधुता प्रथम, आणि अंततः भारतीय हा विचार, ऊर्जा देशातील नागरिकांना देत, आज देशातील प्रत्येकाला अधिकार देत, महिलांना सन्मान व अधिकार प्रदान करत, भारतीय संविधानाने देशात खर्याअर्थाने समतामुलक समाजनिर्मिती केली. आपण जो मुक्त श्वास घेतो हेही संविधानाची देण आहे, नाही तर श्वासोश्वास घेण्यासाठीसुद्धा कर भरावा लागला असता, अशाप्रकारे जनजागृती करत संविधान उद्देशिकेचे महत्व काय आहे, असे सांगत संघर्ष संघटनेच्यावतीने घरोघरी संविधान उद्देशिका वितरित केली जात आहे.
आम्ही, भारताचे लोक, भारताचे सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकास, सामाजिक, आर्थिक व राजनैतीक न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य, दर्जाची व संधीची समानता, निश्चितपणे प्राप्त करुन देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता व एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत २६ नोव्हेंबर १९ ४९ रोजी याव्दारे हे संविधान अंगिकृत आणि अधिनियमित करून स्वतः प्रत अर्पण करीत आहोत, असा देशाच्या महत्वपूर्ण समाजरचनेचा, वाटचालीला पथदर्शक अशा मजकूर या संविधान उद्देशिकेत आहे. देशाची राज्यघटना अथक परिश्रम मेहनत घेऊन देशाला बहाल करणारे भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे आहेत, याची सर्वांनी जनजागृती करणे जरूरीचे आहे, असे प्रतिपादन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रशांत भटकर यांनी याप्रसंगी केले. यावेळी सय्यद इम्रान उपाध्यक्ष, राम अवसरमोल सचिव, नागेश म्हस्के सहसचिव, आकाश साळवे, गौतम सोनटक्के, आकाश बनसोड, नितीन जाधव, गौतम घेवंदे, रोहीत हाडे, सुशील जाधव, शेख जमशेद, शुभम जाधव, सुमित गवई, आतिष काळे, सुमित खंडारे, गजानन मघाडे आदींचे सहकार्य लाभले आहे. आणखी काही दिवस घर घर संविधान पोहोचवण्याचा प्रयत्न सुरु राहणार आहे.
————–