Breaking newsHead linesKOLHAPURMaharashtraMumbaiPachhim MaharashtraPolitical NewsPoliticsWorld update

राज्यपालांना हटविले नाही तर महाराष्ट्रात उठाव; संभाजीराजे छत्रपती यांनी ठणकावले!

कोल्हापूर (शिवानी प्रभावळे) – छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी अवमानकारक वक्तव्य करूनदेखील राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर अजूनही कोणती कारवाई झालेली नाही. ”कारवाई होत नाही याचा अर्थ त्यांनी केलेल्या विधानांशी राज्यकर्ते सहमत आहेत का?”, असा संतप्त सवाल संभाजीराजे छत्रपती यांनी केला आहे. राज्यपाल कोश्यारी यांच्याविरुद्ध राज्यभर संतापाची लाट उसळलेली असताना, भाजप व मुख्यमंत्री शिंदे गटाकडून मात्र सारवासारव केली जात आहे. आठ दिवस उलटले तरी कोश्यारी यांच्यावर राज्य सरकारकडून कोणतीही कारवाई केली गेली नाही. त्यामुळे संताप व्यक्त होत असतानाच, आता संभाजीराजे छत्रपती यांनी राज्यपालांच्या विधानावरून पुन्हा एकदा सरकारला इशारा दिला आहे.

छत्रपती संभाजीराजे यांनी भगतसिंह कोश्यारी यांचा राज्यपालपदाचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी केली असून, या मागणीची दखल घेतली जात नसेल, तर राज्यात उठाव होणार असा इशारा त्यांनी ट्वीटरच्या माध्यमातून दिला आहे. ‘भगतसिंह कोश्यारी यांच्यावर अजूनही कोणती कारवाई झालेली नाही. कारवाई होत नाही याचा अर्थ त्यांनी केलेल्या विधानांशी राज्यकर्ते सहमत आहेत का ? महाराष्ट्राच्या जनतेला कुणीही गृहीत धरू नये. शिवभक्तांच्या भावना सरकारला समजत नसतील तर उठाव होणारच’, असे संभाजीराजे आपल्या ट्विटमध्ये म्हणाले आहेत. दुसरीकडे, परवाच छत्रपती उदयनराजे भोसले यांनीदेखील पंतप्रधान व राष्ट्रपतींना पत्र पाठवून राज्यपाल कोश्यारींना तातडीने हटविण्याची मागणी केलेली आहे. त्यानंतर आता, ‘छत्रपती शिवाजी महाराज हे जुने आदर्श आहे’ असे म्हणून राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारींनी वादाला तोंड फोडले होते. पण, आठवडा उलटला तरीही राज्यपालांनी साधी दिलगिरीसुद्धा व्यक्त केली नाही. त्यामुळे छत्रपती संभाजीराजे यांनी शिंदे सरकाराला कडक इशारा दिला आहे.


स्वराज्य संघटना राज्यपालांचे कार्यक्रम उधळणार!

छत्रपती शिवाजी महाराजांच्या विषयी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलेल्या वादग्रस्त विधानासंदर्भात छत्रपती संभाजीराजे यांनी नुकतीच पत्राद्वारे भूमिका जाहीर केली. पंतप्रधान, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना पत्र लिहून राज्यपालांना हटविण्यात यावे, अशी मागणी छत्रपती संभाजीराजे यांनी केल्यानंतर कार्यवाही झाली नसल्याने संभाजीराजेंनी पुन्हा सरकारचे कोशारींच्या वक्तव्याला समर्थन आहे का, हा प्रश्न उपस्थित केल्यानंतर स्वराज्य संघटना मैदानात उतरली आहे. ‘कोश्यारी हटवा, दिल्लीला परत पाठवा’ म्हणत राज्यभरातील पदाधिकारी कोश्यारी यांच्याविरोधात निदर्शने करुन निवेदने देण्यात येतील, तसेच राज्यपालांचे राज्यभरातील कार्यक्रम स्वराज्य संघटना उधळून लावेल, असा इशारा स्वराज्याचे प्रवक्ते डॉ. धनंजय जाधव यांनी दिला आहे.


छत्रपती शिवरायांच्या अपमानानंतरही महाराष्ट्र थंड, लोळागोळा होऊन पडला – दैनिक सामनातून टीकास्त्र

शिवाजी राजांविषयी चुकीची विधाने पंडित नेहरू ते मोरारजी देसाईंनी केली. तेव्हा खवळलेल्या महाराष्ट्राने त्यांना माफी मागायला भाग पडले. तोच महाराष्ट्र आज थंड, लोळागोळा होऊन पडला आहे, अशी खंत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केली आहे. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या मुखपत्रातील अग्रलेखात संजय राऊत म्हणाले की, प्रेषित मुहम्मद पैगंबर यांच्याबाबत वादग्रस्त विधान केल्यावर इस्लामी व अरब राष्ट्रांनी निषेध करताच भाजपच्या प्रवत्तäया नूपुर शर्मा यांची पदावरून व पक्षातून हकालपट्टी करण्यात आली, पण छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी करणार्‍यांचे मात्र समर्थन केले जाते. बदनामी करणार्‍यांचा केसही वाकडा झाला नाही. ते त्यांच्या पक्षात आणि पदावर कायम आहेत! राऊत म्हणाले, वीर सावरकरांच्या अपमान प्रकरणात भाजपने जो जोश व जोर दाखवला, तो छत्रपती शिवाजी महाराजांच्या अपमान प्रकरणात दाखवला नाही. उलट छत्रपतींचा अपमान करणार्‍या प्रवृत्तीचे समर्थन केले. ‘महाराष्ट्र बंद’ची हाक देऊन जनमताचा उठाव घडविण्याची संधीही विरोधकांनी या प्रश्नी गमावली. शिवरायांचे चरित्र विसरले जात आहे. महाराष्ट्राला नामर्द बनविण्याचे कारस्थान यशस्वी होत आहे काय?, असा सवाल राऊत यांनी उपस्थित केला आहे.
———————

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!