– रिपब्लिकन सेनेकडून उद्याचे आंदोलन तूर्तास स्थगित
चिखली (शहर प्रतिनिधी) – चिखली कृषी उत्पन्न बाजार समितीमधील बोगस हमाल कामगारांवर कारवाई करून त्यांचे परवाने रद्द करण्यात यावे, यासह विविध मागण्यांसदर्भात रिपब्लिकन सेनेच्यावतीने जिल्हाधिकारी व जिल्हा दुय्यम निबंधक सहकारी संस्था यांच्या निवेदन देण्यात आले होते. अन्यथा, आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यानुसार, जिल्हा दुय्यम निबंधकांनी बाजार समितीच्या सचिवांना हे प्रकरण निकाली काढण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार, सचिवांनी रिपब्लिकन सेनेच्या मागण्या एका महिन्यात निकाली काढल्या जातील, असे लेखी आश्वासन दिले आहे. त्यामुळे बाजार समितीमधील बोगस हमालांचे चांगलेच धाबे दणाणलेले आहे.
रिपब्लिकन सेनेच्यावतीने बोगस हमाल कामगारांवर कारवाई करुन त्यांचे परवाने रद्द करण्यात यावे, यासह विविध मागण्यांसंदर्भात जिल्हाधिकारी व जिल्हा दुय्यम निबंधक सहकारी संस्था बुलढाणा यांना दिनांक १८/११/२०२२ व २५/११/२०२२ रोजी निवेदन दिले होते. या निवेदनाची दखल घेत जिल्हा दुय्यम निबंधक सहकारी संस्था बुलढाणा यांनी कृषी उत्पन्न बाजार समिती सचिव यांना तत्काळ प्रकरण निकाली काढण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार, सचिवांनी रिपब्लिकन सेनेच्या संभाव्य आंदोलनाचा धसका घेऊन बोगस हमाल कामगारांचा परवाना रद्द करणे, नवीन हमाल कामगारांचे अनुज्ञापतीसाठी आलेले अर्ज निकाली काढणे, या मागण्या मान्य करुन एका महिन्यात निकाली काढण्याचे लेखी आश्वासन दिले आहे. त्यामुळे रिपब्लिकन सेनेचे आंदोलन तात्पुरते मागे घेण्याचे पत्र रिपब्लिकन सेनेचे जिल्हा अध्यक्ष भाई विजयकांत गवई यांनी सचिवांना दिले आहे.
रिपब्लिकन सेनेचे जिल्हा अध्यक्ष भाई विजयकांत गवई यांनी सांगितले की, न्यायव्यवस्थेवर आमचा पूर्ण विश्वास असून, कृषी उत्पन्न बाजार समिती सचिव यांनी २८/११/२०२२ ला होणार्या आंदोलनाचा धसका घेऊन बोगस हमाल कामगारांवर चौकशी करून कारवाई सह इतर मागण्या मान्य करण्याचे लेखी आदेश दिल्याने तूर्तास आंदोलनाला स्थगिती देण्यात येत आहे. कृषी उत्पन्न बाजार समिती सचिव यांनी दिलेल्या लेखी आश्वासनावर दिलेल्या कालावधीत कारवाई न झाल्यास रिपब्लिकन सेनेच्यावतीने उग्र आंदोलन छेडण्यात येईल, असा तोंडी इशारा कृषी उत्पन्न बाजार समिती सचिव व मुख्य प्रशासक यांना आदेशाची प्रत घेतांना दिलेला आहे. यावेळी रिपब्लिकन सेनेचे जिल्हा अध्यक्ष भाई विजयकांत गवई, जिल्हा महासचिव सलीम भाई, जिल्हा उपाध्यक्ष ब्रम्हाभाऊ साळवे, जिल्हा कामगार अध्यक्ष रहेमान खान, चिखली तालुका उपाध्यक्ष सोहेल सौदागर, दीपक गवईसह इतर पदाधिकारी उपस्थित होते.
—————-