जिजाऊ मॉसाहेबांचे आशीर्वाद घेऊन गद्दारांना मातीत गाडायला आलोय!
– चिखली तालुका क्रीडा संकुलाच्या मैदानात उद्धव ठाकरे यांची रेकॉर्डब्रेक सभा, तब्बल एक लाखापेक्षा जास्त उसळला जनसमुदाय
शिवसेना (ठाकरे) पक्षाच्या सर्वच नेत्यांनी या सभेतून बंडखोरांवर तुफान टीकास्त्र डागले. उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, की काही लोक ४० रेडे घेऊन गुवाहाटीला गेले. त्यांच्याच मंत्र्याने म्हटले आमचे ४० रेडे तिकडे गेले आहे. मी मुख्यमंत्री झालो तेव्हा मी एकविरा देवीचे दर्शन घेतले. नंतर अयोध्येला गेलो होतो. हे गेल्या आठवड्यात हात दाखवायला गेले होते. ज्याचं भविष्य त्याला माहीत नाही तो आपलं भविष्य काय ठरवणार? यांचे मायबाप दिल्लीत आहेत. त्यांचं भविष्य ठरविणारे दिल्लीत बसलेत. हे हिंदुत्व वाचवण्यासाठी शिवसेना सोडून गेले होता का? ‘इथल्या गद्दारांना तुम्हीच आमदार आणि खासदार केलं. या ताईंना (भावना गवळी यांचा नामोल्लेख टाळून) धमक्या दिल्या. मुंबईवरून दलाल पाठवले जायचे. त्यांच्यावरील आरोप वाचले जायचे. त्यांच्या आजूबाजूच्या दलालांना अटक केली. पण ताई हुशार. ताईंनी थेट पंतप्रधानांना राखी बांधली. भैय्या मेरे राखी के बंधन को निभाना, तो फोटो छापून आणला. सीबीआय आणि ईडीची हिंमत आहे का मग अटक करायला? ही चालूगिरी आपल्याला समजत नाही का?’, असा सवाल उद्धव ठाकरेंनी केला.
बुलडाण्यात मला काही जुने चेहरे दिसत नाहीत, असे म्हणत ठाकरे यांनी जिल्ह्यातील बंडखोरांना पैâलावर घेतले. कारण ते जुने होते ते फसवे होते, गद्दार निघाले. त्यांना वाटलं बुलडाणा म्हणजे त्यांची खासगी मालमत्ता आहे. पण इथं जमलेले मर्द मावळ्यांचा उत्साह बघितल्यांवर असं वाटतंय की अन्याय जाळायला निघालेल्या या पेटत्या मशाली आहेत. जुने होते ते फसवे होते, गद्दार निघाले. मी नव्या जोशाने उभा आहे, पुन्हा जिंकणार म्हणजे जिंकणारच. भाजप हा आयात पक्ष झाला आहे. भाजप हा पक्ष आहे की चोरबाजार आहे? यांच्या पक्षात आयात केलेले नेते आहेत. भाजप भाकड पक्ष आहे, असे टीकास्त्र त्यांनी भाजप व बंडखोरांवर डागले. संविधान आज सुरक्षित आहे का?, असा सवाल ठाकरे यांनी यावेळी उपस्थित केला. लोकशाही वाचवण्याच्या दिशेने आपली वाटचाल असली पाहिजे. काहीजण चाळीस रेडे घेऊन गुवाहटीला गेले आहेत, असा खोचक टोला उद्धव ठाकरे यांनी आज गुवाहाटीला गेलेल्या मुख्यमंत्र्यांसह चाळीस बंडखोर आमदारांना लगावला आहे.
दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी मराठा सेवा संघाचे संस्थापक शिवश्री पुरुषोत्तम खेडेकर यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. यावेळी खेडेकर यांनी त्यांचे कौटुंबीक स्वागत केले. शिवसेना नेते खा. संजय राऊत यांनी तर खेडेकर यांना कडकडाडून मिठी मारत गळाभेट घेतली. यावेळी ठाकरे व खेडेकर यांच्यात बराचवेळ खासगीत चर्चा झाली. या चर्चेचा तपशील अद्याप हाती आला नाही.
गद्दारांनो, भाजपच्या तिकीटावर निवडून येणार नाही, हे जाहीरपणे सांगा!
मी शेतकर्यांना कर्जमुक्त करून दाखवले होते, असे ठामपणे सांगून उद्धव ठाकरे म्हणाले, माझं उघड आव्हान आहे; मी या ४० रेड्यांना, गद्दारांना विचारतोय, आम्ही भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढविणार नाही, हे यांनी जाहीरपणे सांगावे. जेव्हापासून हे खोके सरकार महाराष्ट्राच्या गादीवर बसलं तेव्हापासून पनवती सुरू झालीय. हजारो शेतकर्यांनी आत्महत्या केल्या आहेत. मी शेतकर्यांची कर्जमुक्ती केली होती. पश्चिम विदर्भातील काही जिल्ह्यांची कर्जमुक्ती राहिली होती. ती करणार होतोच, पण तोपर्यंत या चाळीस रेड्यांनी शेण खाल्लं. या खोके सरकारने शेतकर्यांचे वीजबिल माफ केले नाही. शेतकर्यांना पीकविम्याचे पैसेदेखील दिले नाहीत. पीकविमा कंपन्यांची मस्ती पुन्हा उतरविल्याशिवाय राहणार नाही, असा इशारादेखील उद्धव ठाकरे यांनी दिला.
‘देवेंद्रजी, जनाची नाही तर मनाची तरी लाज बाळगा’; उद्धव ठाकरे यांचा वीज बिल माफीवरून फडणवीस यांच्यावर जोरदार हल्ला
उद्धव ठाकरे यांनी या सभेमध्ये बोलतानां वीजबील माफीवरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आसूड ओढले. ठाकरे यांनी फडणवीसांचा एक ऑडिओ क्लिप ऐकवत फडणवीसांचा दुटप्पीपणा समोर आणला. “मध्य प्रदेश सरकारने 6500 कोटी रूपये स्वत: देऊन शेतकऱ्यांची वीजबील माफ केली आहेत. मात्र महाराष्ट्रामध्ये रोज सावकारी पद्धतीने वीजबील वसूल केली जात आहेत, असं फडणवीस ऑडिओ क्लिपमध्ये बोलत आहेत. यावर, काय बोलत होते त्यावेळी मी मुख्यमंत्री होतो. देवेंद्र जनाची नाहीतर मनाची बाळगा…. या ठिकाणी आम्हाला आनंद होत आहे की मध्य प्रदेशने शेतकऱ्यांचे वीज बील भरले आहेत. माझं खुलं आव्हान आहे, मी या ठिकाणी आहे तुम्ही त्या ठिकाणी करून टाका वीजबील माफ करा. मात्र वरती बसलं की वेगळी भाषा आणि खाली आलो की वेगळी भाषा असं म्हणत ठाकरेंनी फडणवीसांवर निशाणा साधला.
४० रेडे नवस फेडण्यासाठी गुवाहाटीला गेले – संजय राऊत
मुख्यमंत्री आज नवस फेडण्यासाठी गुवाहाटीला गेले आहेत. महाराष्ट्राचे देव संपले का? आज महाराष्ट्राची सर्वात मोठी देवता राष्ट्रमाता जिजाऊ याच बुलढाणा जिल्ह्यात आहे, आणि ४० रेडे गुवाहाटीला नवस फेडण्यासाठी गेले, अशा शब्दांत शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटावर टीकास्र सोडले. ‘सर्वांत जास्त खोके बुलढाण्यात आले आहे. एक फुल, दोन हाफ. एक खासदार दोन आमदार. आज ते नवस फेडण्यासाठी गुवाहाटीला गेले आहेत. महाराष्ट्राचे देव संपले का? ‘हा महाराष्ट्र संतांची भूमी आहे. बाजूला शेगाव आहे. आमच्याकडे ज्ञानेश्वरांनी रेड्याकडून वेद म्हणवून घेतले होते आणि मुख्यमंत्री ४० रेड्यांचे बळी द्यायला गुवाहाटीला गेले. हे या राज्याचे दुर्देव आहे. एकही खोकेवाला पुन्हा निवडून येता कामा नये, अशी शपथ आपण घेतली पाहिजे’, असेही ते म्हणाले. ‘मी जवळजवळ ११० दिवस तुरुंगात होतो. जाताना माझ्या हातात भगवा दुपट्टा होता. हा भगवा शेवटच्या श्वासापर्यंत माझ्याबरोबर असेल. येत्या निवडणुकीत शिवसेनेचे २५ खासदार आणि किमान ११५ आमदार आपण निवडून द्यायला हवे, शिवसेनेचा स्वबळावर मुख्यमंत्री निर्माण करून या रेड्यांचा राजकीय बळी आपण घेतला पाहिजे, तेव्हाच आपण स्वत:ला शिवसैनिक म्हणू शकू’, असेही खा. राऊत यांनी नीक्षून सांगितले.
———————