BULDHANAChikhaliHead linesMaharashtraUncategorizedVidharbha

चिखलीत खासदार प्रतापराव जाधवांचे पोस्टर्स फाडले!

– ठाकरेंच्या सभेने शिवसैनिकांत अभूतपूर्व जोश, राजकीय वातावरण तापण्याचे संकेत!

चिखली (विशेष प्रतिनिधी) – शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची चिखलीतील तालुका क्रीडा संकुलात अतिविराट जाहीर सभा पार पडल्यानंतर, सभेतून बाहेर आलेल्या उत्साही शिवसैनिकांनी खासदार प्रतापराव जाधव यांचे शहरातील रस्त्याच्या कडेला लावलेले पोस्टर फाडल्याचे दिसून आले. ही सभा रेकॉर्डब्रेक तर झालीच, पण शिवसैनिक व उपस्थित जनसमुदयात सळसळता उत्साह निर्माण करणारी ठरली. त्यामुळे जिल्ह्यातील शिंदे गटाविरोधात जोरदार वातावरण तयार झाल्याचे दिसून आले. त्याच उत्साहाच्या भरात काही युवकांकडून खासदारांचे पोस्टर फाडले गेल्याचे दिसून आले आहे.

बुलढाण्याचे खासदार प्रतापराव जाधव यांचा कालच वाढदिवस साजरा झाला. त्यानिमित्त चिखलीत त्यांचे पोस्टर लावण्यात आले होते. या पोस्टरद्वारे खा. जाधव यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. हेच पोस्टर उद्धव ठाकरे यांच्या सभेतून बाहेर आलेल्या काही शिवसैनिकांनी व युवकांनी फाडले, व ते पायदळी तुडवले. क्रीडा संकुलातून बाहेर आलेल्या काही युवकांनी आपला मोर्चा बसस्थानक परिसरात वळवला. तेथे लागलेल्या पोस्टर्सला फाडून व पायदळी टाकून आपला राग शिवसैनिकांनी व्यक्त केला. ठाकरे यांची सभा चांगलीच राजकीय वातावरण तापविणारी ठरणार असल्याचे संकेत प्राप्त होत आहेत. तसेच, कट्टर शिवसैनिकांतदेखील अभूतपूर्व जोष संचारलेला दिसून आला आहे.
—————–

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!