मुंबई (प्रतिनिधी) – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविरोधात अवमानकारक उद्गार काढले. त्याचे तीव्र पडसाद अद्यापही उमटत असून, शरद पवार यांच्यापाठोपाठ माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही भगतसिंह कोश्यारी यांच्यावर हल्लाबोल केला आहे. तसेच ठाकरे यांनी महाराष्ट्र बंदचे संकेतही दिले. दोन चार दिवसात हे पार्सल राज्यातून नाही गेले तर आम्ही महाराष्ट्र बंद करू किंवा विराट मोर्चा काढू, असा इशाराच उद्धव ठाकरे यांनी दिला.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला. ‘महाराष्ट्रात ईडी, खोके, मिंधे सरकार आहे. या सरकारमध्ये मुख्यमंत्री आहेत का, ते कळतच नाही. त्यांना विचारले तर ‘ते सांगितील, मी पंतप्रधानांना सांगितलेले आहे, ते म्हणाले, त्यांनी चाळीस गावे मागितले ते द्या, आपण पाकव्याप्त काश्मीर जिंकल्यानंतर शंभर गावे देऊ’, अशा शब्दांत ठाकरे यांनी शिंदेंची खिल्ली उडविली. ‘मुख्यमंत्री भाजपच्या वरिष्ठांच्या आज्ञेशिवाय चालत नाही. त्यांना खुर्चीला चिपकून बसायचे आहे. ते लाचार आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचा हा महाराष्ट्र आहे आणि या महाराष्ट्राचे आपण मुख्यमंत्री आहोत, असे त्यांना वाटतंच नाही’, अशी टीकादेखील यावेळी उद्धव ठाकरेंनी केली.
दरम्यान, राज्यपाल या पदावर बसणार्या व्यक्तीने जबाबदारीने बोलणे गरजेचे असते. सध्याच्या राज्यपालांनी अनेकवेळा अशी वक्तव्ये केली, त्यावेळी आम्ही त्या पदाची गरिमा राखण्यासाठी काही बोललो नव्हतो. मात्र, आता शिवाजी महाराज यांच्याबाबत वक्तव्य करणे योग्य नसल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीदेखील आज ठणकावले आहे. राज्यपालांच्या वक्तव्याबाबत आता राष्ट्रपती आणि पंतप्रधानांनी याची दखल घ्यायला हवी, असेही पवार म्हणाले.
———————