अलंकापुरीत माऊलींचे संजीवन समाधीदिन सोहळ्याची सांगता
आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : संत ज्ञानेश्वर महाराज यांचे ७२७ व्या संजीवन समाधी दिन सोहळ्या अंतर्गत आळंदी कार्तिकी वारीची सांगता श्रींचे पालखी छबिना मिरवणुकीने हरिनाम गजरात झाली. या सोहळ्यासाठी प्रमुख विश्वस्त योगेश देसाई, विश्वस्त अॅड. विकास ढगे पाटील, पालखी सोहळ्याचे मालक राजेंद्र बाळासाहेब आरफळकर , व्यवस्थापक माउली वीर, श्रीधर सरनाईक, संजय रणदिवे, सेवक चोपदार बाळासाहेब रणदिवे, मानकरी माजी नगराध्यक्ष राहुल चिताळकर पाटील, योगिराज कुऱ्हाडे, योगेश आरु, माऊली जळगावकर, अनिल कुऱ्हाडे, विनायक घुंडरे, सचिन कु-हाडे, प्रियेश रानवडे, महेश केदारी,लेखन घाडगे, विनायक घुंडरे, कचदेव कुऱ्हाडे, पोलिस नाईक मच्छिंद्र शेंडे, पुजारी अमोल गांधी, श्रींचे सेवक पुजारी, कर्मचारी, सुरक्षा रक्षक अधिकारी आदी उपस्थित होते.
सांगता दिनी श्रींचे पहाट पूजेत पवमान अभिषेक व दुधारती नंतर भाविकांचे महापूजा व दर्शनास श्रींचा गाभारा खुला करण्यात आला. दुपारी परंपरेने नैवेद्यास श्रींचे दर्शन बंद ठेवण्यात आले.महानैवेद्या नंतर भाविकांना संजीवन समाधी दर्शनास गाभारा खुला झाला. अभिषेख महाराज मोझे यांचे वतीने विना मंडपात ह.भ.प. चैतन्य महाराज देगलूरकर यांची मंत्रमुग्ध करणारी कीर्तन सेवा झाली. यास भाविकांनी गर्दी केली. परंपरेने माऊलींचे पालखीची नगरप्रदक्षिणा हरिनाम गजरात झाली. मानकरी, फडकरी यांना नारळ प्रसाद व समाधी दर्शन होवून यात्रेची सांगता झाली. मंदिरात दही हंडी काल्याचे कीर्तन सेवा उत्साहात झाली.
श्रींचे पालखीचे दर्शनास भाविकांनी रस्त्यांचे दुतर्फा गर्दी केली. भाविकांची दर्शनबारी भक्ती सोपान पुलावर दुपार पर्यंत होती. त्यानंतर मात्र दर्शनबारी मंडपात कायम राहिली. कमी वेळेत जास्तीत जास्त भाविकांना सुलभ दर्शनाचे व्यवस्थेचे नियोजन करण्यात आल्याचे व्यवस्थापक माउली वीर यांनी सांगितले. या मुळे भाविकांनी समाधान व्यक्त केले. धूपार्तीनंतर श्रींचा छबिना पालखीतून नगरप्रदक्षिणा मिरवणूक हरिनाम गजरात निघाला .रात्री उशिरा श्रींची छबिना मिरवणूक हरिनाम गजरात मंदिरात प्रवेशली. श्रींची पालखी मंदिरात आल्यानंतर सोहळ्याचे मानकरी, पदाधिकारी यांना नारळ प्रसाद वाटप देवस्थान तर्फे परंपरेने झाले. शेजारतीने सोहळ्याची सांगता रात्री उशिरा झाली. सोहळा यशस्वी करण्यास आळंदी देवस्थांनचे प्रमुख विश्वस्त योगेश देसाई, आळंदी नगरपरिषद मुख्याधिकारी अंकुश जाधव, आळंदी ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. उर्मिला शिंदे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील गोडसे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक गुन्हे रमेश पाटील, वरिष्ठ पोलिस निरीक्षक वाहतूक विभाग शहाजी पवार, वीज वितरण चे अभियंता सुभाष धापसे यांनी विशेष परिश्रम घेतले. खेडचे उपविभागीय अधिकारी प्रांत विक्रांत चव्हाण, तहसीलदार तथा आळंदी नगरपरिषद प्रशासक वैशाली वाघमारे यांचे नियंत्रणात जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांचे मार्गदर्शनात आळंदी कार्तिकी यात्रेचे प्रभावी नियोजन करण्यात आल्याने यात्रा सुरळीत पार पडली. यासाठी महसूल तर्फे तहसिलदार वैशाली वाघमारे, मंडलधिकारी स्मिता जोशी यांनी कामकाज पाहिले.
यात्रा काळात शांतता, सुव्यवस्था यासाठी पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयाचे आयुक्त यांचे मार्गदर्शनात प्रभावी पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. यासाठी विशेष सहकार्य आळंदी पोलिस त्यांचे वतीने करण्यात आले. स्वकाम सेवा मंडळाच्या वतीने अध्यक्ष सुनील तापकिर, महिला विभाग अध्यक्षा आशा तापकीर यांचे मार्गदशनात मंदिर परिसरात स्वच्छता विषयक कामकाज करण्यात आले.
दर्शन रांगेत भाविकांना मोफत प्रसाद सेवा!
माऊली देवस्थानच्या वतीने कार्तिकी यात्रा काळात दर्शनबारीचे रांगेतील भाविकांना मोफत खिचडी प्रसाद वाटप सेवा देण्यात आली. पिण्याचे शुद्ध पाणी वाटप सेवा करण्यात आली. श्री पांडुरंगराय, श्री नामदेवराय व श्री पुंडलिकराय पादुका पालखी सोहळ्याचे श्री क्षेत्र आळंदी येथून प्रथा परंपरांचे पालन करीत हरिनाम गजरात पंढरीकडे सोहळे मार्गस्थ झाले. कैवल्य साम्राज्य ज्ञानचक्रवर्ती श्री संत ज्ञानेश्वर माऊलींच्या संजीवन समाधी सोहळ्यासाठी श्री क्षेत्र पंढरपूरहून श्री पांडुरंगराय, श्री नामदेवराय व श्री भक्त पुंडलिकराय पादुका पालखी भाविक, भक्तांसह सोहळे आळंदीत आले होते. श्रींचा छबिना मिरवणुकीने आळंदीत फटाक्यांचे आतिषबाजीसह हरिनाम गजरात ७२७ व्या संजीवन समाधी दिन सोहळ्याची सांगता झाली.