सुट्ट्या टाका, शेगावला चला!; राज्य जुनी पेन्शन संघटनेचे सरकारी कर्मचार्यांना आवाहन
बुलढाणा (एकनाथ माळेकर) – सत्तेवर आल्यानंतर जुनी पेन्शन योजना (ओपीएस) लागू करण्याची घोषणा काँग्रेसने आज केल्यानंतर राज्य व केंद्र सरकारी कर्मचार्यांत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. सरकारी कर्मचार्यांनी सुट्ट्या टाकाव्यात व शेगाव येथील भारत जोडो यात्रेनिमित्तच्या जाहीर सभेसाठी उपस्थित रहावे, असे आवाहन जुनी पेन्शन योजना संघटनेचे बुलढाणा जिल्हाध्यक्ष नंदू सुसर यांनी केले आहे. या सभेसाठी संयुक्त पुरोगामी आघाडी (यूपीए)च्या अध्यक्षा सोनिया गांधी, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार व काँग्रेस नेते राहुल गांधी हे एकाच व्यासपीठावर येत आहे.
नंदू सुसर यांनी सांगितले, की जुनी पेन्शन योजना लागू करण्याचे काँग्रेसने जाहीर केले आहे. आपली मागणी त्यांनी मान्य केल्याने, सर्व राज्य व केंद्र सरकारी कर्मचार्यांनी शुक्रवारी (दि.१८) सुट्टीचे अर्ज देऊन शेगाव येथील जाहीर सभेला हजर रहावे. सोबत आपले सहकारी बंधूंनासुद्धा घेऊन यावे. जुनी पेन्शन हा लढा आपल्या हक्काचा आहे. मातब्बर मंडळी आपल्या जिल्ह्यात येत आहे. त्या ठिकाणी आपलीसुद्धा गर्दीत जमलीच पाहिजे. येताना, पिवळा टी शर्ट किंवा शर्ट, पेंशनची टोपी, पेंशनच्या घोषपट्ट्या, पिवळा झेंडा घेऊन यावे, असे आवाहनदेखील नंदू सुसर यांनी केले आहे.
नुकत्याच मिळालेल्या राज्य कार्यकरिणीच्या आदेशानुसार, फक्त बुलडाणा जिल्ह्यातील सर्व एनपीएसधारक कर्मचारी बंधू, भगिनींनी शेगाव येथील राहुल गांधी ह्यांच्या सभेला हजारोच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. फक्त बुलढाणा जिल्ह्यातील बांधवांनी पातूर येथे न येता शेगावलाच उपस्थित रहावे. जिल्ह्यातील सर्व विभागाच्या एनपीएसधारक बांधवांनी रीतसर रजा घेऊन शेगावला उपस्थित रहावे, असे आवाहनदेखील बुलढाणा जिल्हाध्यक्ष नंदू सुसर यांनी केलेले आहे.
—————