नवी दिल्ली (विशेष राजकीय प्रतिनिधी) – केंद्रीय रस्ते व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांना पुन्हा एकदा भाषणादरम्यान स्टेजवरच चक्कर आली आणि ते खाली कोसळता कोसळता राहिले. त्यांना तातडीने सिलिगुडी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, रक्तातील साखर कमी झाल्याने हा प्रकार घडल्याचे सांगितले गेले. गडकरी हे दिल्लीकडे रवाना झाला असून, आता त्यांची प्रकृती स्थिर आहे. यापूर्वी दोनवेळा असा प्रकार घडला आहे. राहुरी येथील कृषी विद्यापीठाच्या कार्यक्रमात तर ते स्टेजवरच चक्कर येवून कोसळले होते.
सिलिगुडी येथे एका कार्यक्रमात नितीन गडकरी यांचे भाषण सुरु असताना आजचा हा प्रकार घडला. यावेळी भाषण सुरु असताना नितीन गडकरी यांना भोवळ आली. त्यामुळे नितीन गडकरी व्यासपीठावरील खुर्चीवर जाऊन बसले. त्यानंतर त्यांना तातडीने व्यासपीठावरून खाली नेण्यात आले. नजीकच्या रुग्णालयातील डॉक्टरांना याठिकाणी पाचारण करुन नितीन गडकरी यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले. शरीरातील साखरेची पातळी कमी झाल्यामुळे नितीन गडकरी यांची प्रकृती खालावली असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले.
नितीन गडकरी हे पश्चिम बंगालच्या दौर्यावर आहे. आज सिलिगुडी येथे एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमादरम्यान नितीन गडकरींच्या शुगरचे प्रमाण अचानक कमी झाले. त्यामुळे त्यांना चक्कर आली. गडकरी यांना भाजपचे स्थानिक खासदार राजू बिस्टा यांच्या निवासस्थानी नेण्यात आले. त्यानंतर त्यांना बरे वाटू लागले. आता त्यांना दिल्लीला परत आणण्यात येत होते. दरम्यान, सिलीगुडीच्या आयुक्तांनी गडकरींवर उपचार करण्यासाठी सर्व सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत.
————-