Breaking newsHead linesMaharashtraMarathwadaPolitics

विनायक मेटे अपघाती मृत्यूप्रकरणी चालकाविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा

– सीआयडी तपासानंतर रायगड जिल्ह्यातील रसायनी पोलिसांत गुन्हा दाखल

मुंबई (विशेष राजकीय प्रतिनिधी) – शिवसंग्राम पक्षाचे नेते विनायक मेटे यांच्या संशयास्पद अपघाती मृत्यूप्रकरणी तब्बल तीन महिन्यांनंतर त्यांच्या कार चालकाविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हे अन्वेषण विभाग अर्थात सीआयडीने हा गुन्हा दाखल केला असून, रायगड जिल्ह्यातील रसायनी पोलीस स्थानकात विनायक मेटे यांचे कारचालक एकनाथ कदम यालाच आरोपी करण्यात आले आहे.

विनायक मेटे यांच्या गाडीला १४ ऑगस्ट २०२२ रोजी पहाटे पाच वाजता मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात झाला होता. त्यांना नवी मुंबईतील एमजीएम रुग्णालयात दाखल केले असता, मृत घोषित करण्यात आले. त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रुग्णालयात जाऊन परिस्थितीची माहिती घेतली होती. तेव्हा प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी मेटे यांच्या मृत्युची सखोल चौकशी करण्यात येईल, असे जाहीर केले होते. या अपघातात मेटे यांच्या डोक्याला आणि पायाला गंभीर दुखापत झाली होती. अपघातानंतर जवळपास एक तासभर मेटे यांना कुठलीही मदत मिळाली नव्हती. त्यानंतर पोलिसांनी त्यांना नवी मुंबईतील एमजीएम रुग्णालयात दाखल केले होते. उपचारादरम्यान डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले होते.

दिवसांनी राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांना या मृत्यूची सीआयडी चौकशी करुन आपला निष्कर्ष सादर करण्याचे आदेश दिले होते. विनायक मेटे यांची कार ज्या ज्या मार्गावरुन गेली होती तिथल्या सीसीटीव्ही कॅमेर्‍याचे फूटेज सीआयडी तपासत होती. याशिवाय, आयआरबीचे इंजिनिअर्स आणि टेक्निकल अभियंते यांचे एक पथक तयार करुन त्यांचे मत जाणून घेण्यात आले होते की, यामध्ये कोणाची चूक तुम्हाला दिसते? सीआयडीने पाहिलेल्या फूटेजमध्ये हा चालक ताशी १२० ते १४० किलोमीटर वेगाने गाडी चालवत होता.

दरम्यान, लेन कटिंग आणि ओव्हरटेक करण्याच्या नादात विनायक मेटे यांच्या कारचा अपघात झाला होता. ड्रायव्हरचे ओव्हरटेकिंग करताना जजमेन्ट चुकल्याने हा अपघात घडल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहातही तशी माहिती दिली होती. ज्या ठिकाणी अपघात झाला, त्याच्या थोडावेळ आधी चालक एकनाथ कदमने उजवा टर्न घेऊन ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला होता. आपल्याला ओव्हरटेक करता येणार नाही, हे माहित असूनही त्याने ओव्हरटेक केला, आणि त्याचा परिणाम डाव्या बाजूला झाला, व अपघात घडला. सीआयडीच्या तपासात या बाबीसमोर आल्यानंतर त्यांनी रसायनी पोलिसांमध्ये चालकाविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला. लवकरच, चालकाला ताब्यात घेऊन न्यायालयासमोर हजर केले जाईल, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
——————

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!