आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : येथील कार्तिकी यात्रा आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांचा ७२७ वा संजीवन समाधी दिन सोहळ्यासाठी पोलीस प्रशासनाने कंबर कसली असून, भाविकांचे स्वागत आणि सुरक्षितता यासाठी प्राधान्य देत तयारीत लगबग वेगात सुरु आहे. गुरुवार ( दि. १७ ) ते बुधवार ( दि.२३ ) कालावधीत अलंकापुरी नगरीत संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळ्या होणार आहे. या सोहळ्यात रविवारी ( दि.२० ) कार्तिकी एकादशी आणि मंगळवारी ( दि. २२ ) श्रींचा ७२७ वा संजीवन समाधी दिन सोहळा साजरा होत आहे. यावर्षी सोहळ्यास मोठ्या प्रमाणात भाविक यात्रेस येणार असल्याची शक्यता पोलीस प्रशासनाने गृहीत धरून त्याप्रमाणे भाविक, नागरिकांच्या सुरक्षिततेस प्राधान्य प्रशासनाने तयारीत दिले आहे.
या यात्रेसाठी पोलीस बंदोबस्त, पास व्यवस्था, पाणी व्यवस्था, दर्शनबारी, आरोग्य सुविधा यांची तयारी सुरु असून शहरातील विविध प्रमुख चौकांमध्ये पोलिस मदत केंद्रे ( मनोरे ) यावर्षी ८ बाय ८ या कमी आकारात उभारण्यात आले आहेत. मंदिरात भाविकांना माऊलींच्या दर्शनाची व्यवस्था दर्शनबारी अंतर्गत नियोजन सुरु करण्यात आले आहे. नागरिकांच्या आरोग्यासाठी शहरात सर्वत्र जंतुनाशक फवारणी, धुरीकरण करण्यात येणार आहे. देखभाल दुरुस्तीचे काम शहरात विविध ठिकाणी सुरु असून कामे उरकण्याची लगीनघाई सुरु आहे. आळंदीतील विविध दुकाने टाळ, पखवाज, फुल-प्रसादाची दुकाने थाटली असून परिसर गजबजू लागला आहे. शहरात ठिकठिकाणी दुकाने, तात्पुरती हाॅटेल्स उभारणी सुरु असून यावर्षी कोणत्याही परिस्थितीत फुटपाथ हे फक्त भाविक,नागरिकांच्या रहदारीस खुले ठेवण्याचा चंग प्रशासनाने बांधला असून त्या प्रमाणे आळंदी नगरपरिषद प्रशासनास तंबी ठेण्यात आली आहे. यासाठी पोलीस प्रशासनाने नियोजन बैठकीत लक्ष वेधले होते.
आळंदीत कार्तिकी यात्रेस मोठा पोलिस बंदोबस्त होणार तैनात
अलंकापुरीतील कार्तिकी यात्रेसाठी पिंपरी-चिंचवड पोलीसांकडून मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. यामध्ये ८ सहायक पोलीस आयुक्त, ५० पोलिस निरीक्षक, १९३ उपनिरीक्षक, १२५० अंमलदार, २५० वाहतूक अंमलदार, ६५० होमगार्ड यांचा समावेश आहे. तसेच एसआरपीएफच्या ३ कंपन्या, एनडीआरएफच्या २ तुकड्या, बीडीडीएसचे २ पथक मदतीला पाचारण करण्यात येणार आहेत. शहरातील प्रमुख चौकांमध्ये आणि आवश्यक त्या ठिकाणी पोलिस मदत केंद्रे उभारण्यात येत आहेत. सुरक्षेच्या दृष्टीने शहरात २३५ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येत आहेत. अनाउसिंग सिस्टीमद्वारे भाविकांना सुचना मिळणार आहे. यात्रेनिमित्त आलेल्या दिंड्यांच्या ठिकाणी पोलीस पेट्रोलिंग साठी तैनात रहाणार आहेत. ६ हाॅकर्स स्काॅडच्या माध्यमातून शहरातील फुटपाथ भाविकांसाठी खुले राहतील यांची व्यवस्था पाहणार आहेत.
भाविकांच्या वाहनांना पास देणार
भाविकांच्या वाहनांस पिवळ्या रंगाचा व स्थानिकांचे वाहनां करिता गुलाबी रंगाचा असे वेगवेगळे पास तयार करण्यात देण्यात येणार आहेत. भाविक आणि स्थानिक नागरिकांना पाससाठी आळंदी पोलीस स्टेशनमध्ये अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. १९,२०, २१, २२ या तारखेस रस्त्यांवर भाविकांची गर्दी राहत असल्याने गैरसोय हणार नाही याची दक्षता घेतली जाणार आहे. स्थानिक व भाविकांनी आपली वाहने १९ तारखेपूर्वी पार्किंगचे ठिकाणी लावल्या नंतर शक्यतो यंत्रे नंतर बाहेर आणण्यास सूचना आळंदी पोलिसांचे वतीने वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील गोडसे, शहाजी पवार, रमेश पाटील यांनी केल्या आहेत. यात्रा काळात १७ ते २३ नोव्हेबर या काळात भाविकांची वाहने आणि अत्यावश्यक सेवेतील वाहनां शिवाय इतर वाहनांना प्रवेश देण्यात येणार नाही . इतर वाहनांनी पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन वाहतूकपोलीस निरीक्षक शहाजी पवार यांनी केले आहे. यासाठी पर्यायी मार्ग जाहीर करण्यात आले असून लोणीकंद-मरकळ-आळंदी रस्ता वाहतुकीस बंद ठेवण्यात येत आहे. देखभाल दुरुस्ती आणि धोकादायक मरकळ पूल असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे भाविकांनी दिंड्यांची वाहने इतर पर्यायी मार्गाने आळंदीत प्रवेशवीत असे आवाहन आळंदी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील गोडसे यांनी केले आहे.