२६ तारखेला उद्धव ठाकरेंची तोफ चिखलीत धडाडणार!
– ‘मातोश्री’तून घेतला जात आहे सभेच्या नियोजनाचा आढावा
– ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’ करणार सभेचे ‘लाईव्ह प्रक्षेपण’!
चिखली/मुंबई (एकनाथ माळेकर/प्राची कुलकर्णी) – शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख तथा राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे हे २६ नोव्हेंबररोजी चिखली येथे विराट जाहीर सभा घेणार असून, या सभेकडे बुलढाणा जिल्हाच नव्हे तर संपूर्ण विदर्भाचे लक्ष्य लागलेले आहे. शिवसेनेचे बंडखोर नेते तथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर ठाकरे हे पहिल्यांदाच मुंबईबाहेर पडत असून, आपल्या दणकेबाज सभांचे ते मोहोळ उठविणार असून, त्याची सुरूवात चिखलीतून होत आहे. बुलढाणा जिल्ह्यातून आमदार संजय गायकवाड, आणि संजय रायमुलकर यांनी केलेली बंडखोरी व खासदार प्रतापराव जाधव यांनी शिंदे गटात केलेला प्रवेश या बाबी उद्धव ठाकरे यांना जिव्हारी लागलेल्या आहेत. चिखलीतील सभेतून ते बंडखोरांवर आपली तोफ डागणार आहेत. या सभेची शिवसेनेकडून जय्यत तयारी सुरू असून, पोलिसांनीदेखील या सभेला सशर्त परवानगी दिली आहे. दरम्यान, या सभेचे ब्रेकिंग महाराष्ट्र लाईव्ह प्रक्षेपण करणार असल्याची माहिती डिजिटल संपादक संताेष थाेरहाते यांनी दिलेली आहे.
यापूर्वी ७ नोव्हेंबरला शिवसेनेचे युवा नेते तथा माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी बुलढाणा व मेहकर येथे दौरा करत तुफान सभा घेतल्या आहेत. मेहकर येथील सभा तर प्रचंड गाजली. खासदार प्रतापराव जाधव व डॉ. संजय रायमुलकर यांना मेहकरात जाऊन त्यांनी पुन्हा निवडून येण्याचे आव्हान दिलेले आहे. आदित्य यांच्या बुलढाणा दौर्यानंतर आता पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हेदेखील जिल्ह्यात येत आहेत. त्यांची २६ नोव्हेंबरला चिखली येथील तालुका क्रीडा संकुलात सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेला पोलिसांनी परवानगी दिली आहे. पक्षाचे पदाधिकारी कपिल खेडेकर यांना तसे लेखी कळविण्यात आले आहे. मात्र, त्यातही प्रवेशद्वारसह अनेक अटींची मेख पोलिसांनी मारून ठेवलेली दिसते आहे.
उद्धव ठाकरे यांना राज्य सरकारची ‘झेड प्लस’ दर्जाची सुरक्षा व्यवस्था असून, सभास्थळ असलेल्या चिखलीतील क्रीडा संकुलात एकच प्रवेशद्वार आहे. त्यामुळे सुरक्षेच्या कारणावरून व्यासपीठच्या अगदी जवळून दुसरे प्रवेशद्वार असणे आवश्यक असल्याचे परवानगीत नमूद करण्यात आले आहे. दुसरे प्रवेशद्वार तयार करू असे ना हरकत प्रमाणपत्र द्यावे, असे पोलिसांनी सूचित केलेले आहे. याशिवाय, ‘बाळासाहेब ठाकरे अमर रहे, उद्धव ठाकरे आगे बढो’ या दोनच घोषणा द्याव्यात व मशाल जाळण्यासाठी स्फोटक-ज्वलनशील पदार्थ बाळगू नये, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. सभेत कोणाच्याही भावना दुखावतील असे फलक लावू नये, कोणत्याही व्यक्ती-जाती धर्माच्या भावना दुखविणारी वक्तव्ये करू नये, वत्तäयांची व बाहेरून येणार्या नेत्यांची माहिती पोलिसांना द्यावी, ध्वनिप्रदूषण होणार नाही व ‘आवाज’ ५० डेसीबलपेक्षा जास्त नको, आदी अटींवर पोलिसांनी सभेला परवानगी दिली आहे.
वास्ताविक पाहाता, उद्धव ठाकरे हे राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारच्या विरोधात चिखलीतील सभेतून रणशिंग फुंकणार आहेत. सहाजिकच ते सरकारवर टीकास्त्र डागणार असून, बंडखोरांचा समाचार घेणार आहेत. शिवाय, चिखली येथील ही सभा शेतकरी मेळावा म्हणून आयोजित केली जात असल्याने ते शेतकरी प्रश्नावरदेखील सरकारला लक्ष्य करणार आहे. तसेच, या सभेत कार्यकर्ते खोक्यांसंदर्भात घोषणाबाजी करण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे परवानगी देतानाच पोलिसांच्या माध्यमातून ठाकरे यांची कुणी कोंडी करण्याचा प्रयत्न तर करत नाही ना, असा सवालही निर्माण झालेला आहे. चिखलीतील सभेच्या नियोजनाचा आढावा थेट मातोश्रीवरून घेतला जात असून, संपर्कप्रमुख प्रा. नरेंद्र खेडेकर, जिल्हाप्रमुख जालिंधर बुधवत हे शिवसेना नेते मिलिंद नार्वेकर यांच्या संपर्कात आहेत. तसेच, उद्धव ठाकरे हेदेखील जिल्हावार आणि विभागवार बैठका घेत आहेत.
——————