७२ तासांत दुसरा खोटा गुन्हा दाखल, जितेंद्र आव्हाडांचा आमदारकीचा राजीनामा देण्याचा इशारा!
– राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, कार्यकर्ते, पदाधिकारी, महिला आमदार, खासदार आक्रमक, सरकारचा निषेध
ठाणे (जिल्हा प्रतिनिधी) – राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी आपण आपल्या आमदारकीचा राजीनामा देत असल्याची घोषणा केली आहे. माझ्याविरुद्ध पोलिसी अत्याचार सुरु असल्याचा दावा करत आव्हाड यांनी ही घोषणा केली. ‘पोलिसांनी माझ्याविरुद्ध ७२ तासात दुसरा खोटा गुन्हा दाखल केला आहे. मी या पोलिसी अत्याचाराविरुद्ध लढणार,’ असे म्हणत आव्हाड यांनी आमदारकीचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतल्याचं ट्विटरवरुन जाहीर केले. तर, आव्हाड यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल होऊ शकत नाही. या प्रकरणी आपण कोर्टात जाणार आहेत, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवत्तäया विद्या चव्हाण यांनी दिला. महाविकास आघाडीच्या महिला खासदार व आमदारांनी आज राज्यपालांची भेट घेतली. त्यानंतर चव्हाण यांनी माध्यमांशी संवाद साधला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून गृहखात्याचा गैरवापर सुरू आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या खात्याचा कारभार स्वतःकडे घ्यावा, अशी मागणीही त्यांनी केली.
दरम्यान, राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात असून, त्याला मोठा जनप्रतिसाद मिळत आहे. या यात्रेवरून प्रसारमाध्यमे व जनता यांचे लक्ष विचलित करण्यासाठी ‘एक कपटी व कावेबाज नेता’ गृहखात्याच्या माध्यमातून आव्हाडांना टार्गेट करत असल्याची चर्चा महाराष्ट्रात खासगीमध्ये रंगते आहे.
राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. मुंब्रा पोलीस स्टेशनबाहेर कार्यकर्त्यांनी रास्ता रोको करत आंदोलन केले. आव्हाड यांच्या पत्नी ऋता सामंत-आव्हाड यांनी कार्यकर्त्यांसोबत रास्ता रोको आंदोलन केले. मुंब्रा पोलिसांकडे तक्रारदार महिलेविरोधात त्या तक्रार दाखल करणार आहेत. तसेच मुंब्रा बायपासवरही राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी टायर जाळून निषेध व्यक्त केला. जितेंद्र आव्हाडांच्या समर्थनार्थ महाविकास आघाडीच्या महिला खासदार या मैदानात उतरल्या आहेत. या महिला खासदारांसह आमदारांचे शिष्टमंडळ आज राज्यपालांच्या भेटीला गेले होते. यावेळी त्यांनी आव्हाडांचे समर्थन केले. या शिष्टमंडळाच्या नेत्या खा. विद्या चव्हाण म्हणाल्या की, जितेंद्र आव्हाडांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल होऊ सकत नाही. या प्रकरणी आम्ही कोर्टात जाणार आहोत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून गृहखात्याचा गैरवापर सुरू आहे. त्यांच्याकडील गृहखाते मुख्यमंत्र्यांनी आपल्या हाती घ्यावे, अशी मागणी त्यांनी केली.
फौजिया खान म्हणाल्या, विनयभंगाचा प्रश्नच येत नाही. तिथे कुठे विनयभंग झाला. आव्हाडांनी राजीनामा देण्याची घोषणा करणे ही महाराष्ट्राची शोकांतिका आहे. लोकप्रतिनीधींवर या प्रकारचे हल्ले सरकारकडून होतायत याचा आम्ही निषेध करतो, असेही फौजिया खान म्हणाल्या आहेत. या शिष्टमंडळात राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्ष विद्या चव्हाण, राज्यसभा खासदार प्रियंका चतुर्वेदी, खासदार जया बच्चन तसेच मविआच्या इतर महिला आमदार आणि महिला खासदार यांचा समावेश होता.
मर्द असाल तर कामातून उत्तर द्या, नामर्दासारखं बाईला पुढे करुन लढाई लढू नका : आव्हाड
“कुठल्याही गुन्ह्याच्या काही गाईडलाइन्स असतात. कोणत्या दृष्टीने तो विनयभंग वाटतो? मग एवढीच जर काळजी होती तर गर्दीत यायचं नव्हतं. एक तर मुख्यमंत्र्यांच्या कालच्या कार्यक्रमाला भाजपचं कुणीही उपस्थित नव्हतं. त्या एकट्याच बाई आल्या होत्या. याआधीही त्यांनी आव्हाडसाहेबांवर अश्लाघ्य टीका केलीये. ज्यावेळी खासदार आणि आव्हाडसाहेबांमध्ये तू तू मैं मैं झालं, त्याचवेळी माझ्या मनात शंकेची पाल चुकचुकली. अन् शेवटी रात्री जे व्हायचं ते झालं… खोटा गुन्हा दाखल करणाऱ्यांना मला सांगायचंय, मर्द असाल तर कामातून उत्तर द्या, नामर्दासारखं बाईला पुढे करुन लढाई लढू नका”, असं थेट आव्हानाच राष्ट्रवादीचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी विरोधकांना दिलं.
नेमके प्रकरण काय?
जितेंद्र आव्हाड यांनी रविवारी सायंकाळी माझा विनयभंग केला, असा आरोप भाजपच्या महिला पदाधिकार्याने केला आहे. याच आरोपावरुन जितेंद्र आव्हाडांविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला. रविवारी सायंकाळी मुंब्रा येथील उड्डाणपुलाच्या लोकार्पण सोहळ्यातच ही घटना घडल्याचा या महिलेचा दावा आहे. या घटनेचा व्हिडिओही आता समोर आला आहे. व्हिडिओमध्ये जितेंद्र आव्हाड आणि भाजपच्या महिला पदाधिकारी गर्दीत समोरासमोर आले, तेव्हा जितेंद्र आव्हाडांनी त्यांना बाजुला केल्याचे दिसत आहे. यावरुनच या महिलेने पराचा कावळा करत, आव्हाडांविरोधात मुंब्रा पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. विशेष म्हणजे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोरच ही घटना घडली होती. विनयभंग झाला असता तर, मुख्यमंत्री शांत बसले असते का, असा प्रश्न निर्माण झालेला आहे.
——————-